मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

१९५२च्या या धुरक्याने ४००० लोकांचे बळी घेतले होते....दिल्लीचंही असंच होईल का?

3 मिनिट वाचन
शेअर करा:
१९५२च्या या धुरक्याने ४००० लोकांचे बळी घेतले होते....दिल्लीचंही असंच होईल का?

स्रोत

आज जी चित्रकथा आम्ही सांगणार आहोत ती घडली लंडनमध्ये ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर १९५२ च्या कालावधीत ! या पाच दिवसात लंडनला वेढलेल्या स्मॉग म्हणजे धुरक्याने  ४००० हून अधिक लोकांचे बळी घेतले. हा अधिकृत आकडा होता. पण काहीजणांच्या मते ही संख्या १२००० च्या आसपास होती.

हे घडले तरी काय आणि कसे?

हे घडले तरी काय आणि कसे?

स्रोत

त्यासाठी आधी स्मॉग महणजे काय ते समजून घ्यावे लागेल. स्मॉग म्हणजे माणासांनी निर्माण केलेला प्रदूषणाचा धूर आणि नैसर्गिक धुक्याचे मिश्रण! त्या काळी औद्योगिक क्षेत्रात इंधन म्हणून प्रामुख्याने कोळशाचा वापर  केला जात असे. हिवाळ्याच्या दिवसात घरे उबदार ठेवण्यासाठी कोळशाच्या भट्टीचाच वापर होत असे. शतकानुशतके कोळशाचाच वापर होत असताना त्याच कालावधीत स्मॉगने इतक्या मोठ्या प्रमाणात बळी कसे घेतले हे आता समजून घेऊया.

स्रोत

दुसर्‍या महायुध्दाच्या शेवटी ब्रिटनची आर्थिक परिस्थिती अत्यंत खिळखिळी झाली होती. भारतासारख्या अनेक देशांतून त्यांचे अधिपत्य  संपुष्टात आल्यने  तिजोरी हलकी झाली होती. ही कमतरता भरून काढण्यासाठी ब्रिटन उत्तम दर्जाचा कोळसा परदेशी विकत असे आणि स्वतःसाठी हलक्या दर्जाचा कोळसा वापरत असे. या कोळशात सल्फरचे (गंधकाचे) प्रमाण अतिरिक्त होते. त्यामुळे कोळसा जाळल्यावर निर्माण झालेल्या धुरात कार्बन डाय ऑक्साइडसोबत सल्फर डाय ऑक्साइड मोठ्या प्रमाणात हवेत फेकले जायचे. ते हवेतल्या बाष्पासोबत मिसळले की हवेत सल्फ्युरीक अ‍ॅसिडची वाफ आणि कार्बनचे कण धुक्यासोबत मिसळून तपकिरी धुरके लंडनला घेरून टाकायचे. लंडनला स्मॉग हा प्रकार नवीन नव्हता. असा स्मॉग हवा वाहती झाली की मोकळा होऊन पुढे निघून जायचा. पण ५ डिसेंबरला जे घडले ते काही वेगळेच!

स्रोत

लंडनच्या वातावरणात वार्‍याची हालचाल मंदावली. तयार झालेला स्मॉग पुढचे पाच दिवस तसाच डोक्यावर स्थिर राहिले. थंड हवेच्या थराखाली हा उबदार स्मॉग अडकून राहिले. त्यात रोज भरच पडत गेली. हा परिणाम इतका भयानक होता की रस्त्यावर काही फुटांच्या पलीकडे काही दिसेनासे झाले. वरून बघितले तर स्वतःची पाऊले पण दिसेनाशी झाली. वाहतूक मंदावली. जागोजागी पोलीस टॉर्च  हातात घेऊन मार्गदर्शनासाठी उभे राहिले.

स्रोत

आज नाही तर उद्या फरक पडेल या आशेवर लंडन चालत होते. प्रत्यक्षात परिस्थिती फारच भयानक होत चालली होती. वयोवृध्द नागरीक आणि लहान मुलांना श्वास घेणे अशक्य व्हायला लागले. ज्यांना आधीच श्वसन विकार होते ते मृत्यूपंथाला लागले. जे सशक्त होते ते आजारी पडले.हे असे घडते आहे हे कळेपर्यंत फारच उशीर झाला होता. मृतांची संख्या वाढत गेली आणि दफनविधीचे साहित्य कमी पडायला लागले तेव्हा सरकारला काय घडते आहे हे लक्षात आले. पण लक्षात येऊन काही फायदा नव्हता.  जे जायचे होते ते तोवर गेलेच होते. पुढच्या आठवड्यात हवामान बदलले. स्मॉग वाहून दूर झाले. पण तोपर्यंत बळींची संख्या  ४०००च्या पुढे गेली होती. क्राऊन मालिका पाहिली असेल तर हे त्यात तुम्ही पाह्यले असेलच. 

या प्रकरणातून पुढे ब्रिटनमध्ये क्लिन एअर अ‍ॅक्ट आला. काळजी घेतली गेली. पुन्हा असे घडले नाही. पण आजची दिल्लीच्या वातावरणाची अवस्था बघून राहून राहून एक भिती मनाला भेडसावतेच- दिल्लीचे लंडन होणार नाही ना?

संबंधित लेख