रक्तरंजित सूडाची कहाणी...भाग एक !!!
सोबतच्या फोटोत दिसणारे हे पेराच्या आकाराचे, जुळे असावेत असे वाटणारे हिरे इंदूर पिअर्स या नावानी प्रसिध्द आहेत. इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांनी ही हिर्यांची जोडी त्यांच्या नविन पत्नी अॅनी मिलरला विवाहात भेट दिली होती. १९२८ साली महाराज युरोपच्या दौर्यावर असताना त्यांची आणि नॅन्सी अॅनी मिलरची ओळख झाली. महाराज अॅनीच्या प्रेमात पडले. त्यांनी तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला.महाराज अॅनीच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की वेळ पडल्यास धर्म बदलायची तयारी पण त्यांनी केली होती .पण तसे काही झाले नाही. अॅनीनी हिंदू धर्म स्विकारला. त्यांचे नविन नाव राणी शर्मीष्ठादेवी झाले.
तजेलदार सुंदर स्वच्छ आणि जराही ऐब नसलेले हे हिरे साधारण सेहेचाळीस कॅरेट वजनाचे आहेत. आपल्या नूतन पत्नीला इतकी सुंदर भेट देणारे तुकोजीराव १९२६ साली युरोपात का आले याचे कारण कळल्यावर कदाचीत हिर्याकडे बघण्याचा आनंदच नाहीसा होण्याची शक्यता आहे.एका खूनाच्या प्रकरणातून चौकशीला सामोरे जायला नको म्हणून सोयीस्कररीत्या महाराज इंदूर सोडून युरोपात फिरत होते. ज्या खुनाच्या प्रकरणात त्यांना चौकशीला तोंड द्यावं लागलं असतं ते प्रकरण मुंबईच्या हाय कोर्टात आजही 'मुमताझ केस' म्हणून प्रसिध्द आहे. सूडाच्या भावनेनी पछाडलेला माणूस कसा पशुत्वावर उतरतो ह्याची ही कथा आहे.
****************
बारा जानेवारी एकोणीसशे पंचवीसची मुंबईतली एक संध्याकाळ. साधारण सात साडे सात वाजता विलींग्डन क्लबातून खेळून बाहेर पडलेल्या तीन ब्रिटीश अधिकार्यांना कुलाब्यातल्या बराकीत वेळेत पोहचायचं होतं .बोलण्याच्या नादात पेडर रोडवरून खाली उतरल्यावर गाडी चालवणार्या लेफ्टनंट सेगर्टनी ह्युजीस रोड कडे न जाता चुकून गाडी गिब्ज रोडवर घेतली तोपर्यंतही त्यांना कल्पना नव्हती की एका खळबळजनक ऐतिहासीक घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होणार आहेत.
एका बाईच्या किंकाळीने हे शिलेदार भानावर आले आणि पाठोपाठ बंदूकीच्या बाराचे आवाजही आले. दुसर्या क्षणी हातात गोल्फक्लब्ज घेऊन सेगर्ट-बेटली स्टीफन पुढे धावले.
अंदाजे आठ दहा माणसांच्या टोळक्यानी एका मोटारीला वेढा घातला होता. त्यांच्या हातात तलवारीसारखी तीक्ष्ण हत्यारे होती .दोघांच्या हातात पिस्तूलं होती. तिघांचेही लष्करी प्रशिक्षण वेळीस कामाला आले. दुसर्या क्षणी त्या ब्रिटीश अधिकार्यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला. हल्लेखोरांचे उद्दीष्ट मोटरमधल्या एका मुलीला जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढण्याचा असावा पण पुढच्या काही क्षणात हल्लेखोरांनी तिच्या साथीदारावर गोळ्या चालवल्या आणि त्या बाईला वाचवणारा तिचा साथीदार पुरुष जखमी होऊन खाली पडला.
आता हल्लेखोर आणि या शिलेदारांची हातघाईची मारामारी सुरु झाली. हल्लेखोरांपैकी एकाने बाईच्या चेहेर्यावर वार केला. तोपर्यंत कर्नल व्हिकरी नावाचे आणखी एक लष्करी अधिकारी दुसर्या मोटारीतून खाली उतरले होते.
लष्करी अधिकार्यांचे वाढते बळ पाहून हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तिघांना नि:शस्त्र करण्यात त्यांना यशही आलं पण तोपर्यंत सेगर्टच्या खांद्यावर चाकूचा वार झाला. एक पिस्तूलाची गोळी पण चाटून गेली. दोन हल्लेखोरांना काबूत घेण्यात या अधिकार्यांना यश आलं .बाकीचे हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. झटापट संपेपर्यंत ज्या पुरुषाच्या अंगावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तो मात्र जागीच गतप्राण झाला होता.
********************
त्या बाईचं नाव होतं मुमताज आणि मृताचं नाव होतं अब्दुल कादेर बावला.ती एक नाचणारी आणि तो मुंबईचा एक श्रीमंत व्यापारी. पुढच्या काही दिवसात सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आलं. सगळे हल्लेखोर इंदूरहून मुंबईत आले होते आणि इंदूर संस्थानातचे आणि इंदूरच्या लष्कराचे नोकर होते. हल्ल्यात वापरलेली लाल मॅक्सवेल गाडी पण इंदूरचीच होती.
मुंबई हायकोर्टात खटला सुरु झाला आणि प्रेमाच्या प्रतिशोधाची एक भयानक कहाणी जगासमोर आली. मुमताज इंदूरच्या महाराजांच्या जनान्यातली एक नाचणारी. महाराज तुकोजीरावांच्या खास आवडीची . काहीजण म्हणतात की महाराजांनी तिला मुंबईच्या कोठ्यावरून पळवून इंदूरला नजरकैदेत ठेवलं होतं. पण तिचं मन गुंतलं होतं मुंबईतल्या अब्दुल कादेर बावलामध्ये. इंदूरच्या त्या जबरदस्तीच्या वास्तव्यात महाराजांपासून तिला एक मुलगी पण झाली पण त्या मुलीला जन्मानंतर एका नर्स करवी मारून टाकण्यात आलं.
महाराजांनी अत्याचाराची सिमा ओलांडल्यावर मुमताज धाडस करून इंदूरहून पळून जाण्यात यशस्वी झाली . दिल्ली-अमृतसर नागपूर मग मुंबई असा प्रवास करत अब्दुल कादेर बावलाकडे आली.
मुंबई तेव्हा ब्रिटीश इंडीयाचा भाग होती आणि त्यामुळेच बावला गाफील राहीला. महाराज सूड घेतील अशी शंका पण कदाचीत त्याच्या मनाला शिवली नसावी पण एका नाचणारीच्या बंडानी महाराजांच्या मनात सूडाचा वणवा पेटला.
क्रमश: