computer

रिक्षाचालकाच्या मुलीने मिस इंडिया २०२० चे उपविजेतेपद मिळवलं आहे...वाचा तिचा संघर्ष तिच्याच शब्दात !!

तुम्ही कितीही आर्थिक परिस्थितीमुळे झगडत असलात तरी तुमची मेहनत करायची तयारी असेल, तुमच्यात तो आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय तुम्ही गाठू शकाल. हे शब्दशः खरं करून दाखवलंय मान्या सिंह या उत्तर प्रदेशमधील एका रिक्षाचालकाच्या मुलीने.

मान्याने मुंबई-व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२० मध्ये उपविजेतेपद जिंकले आहे. अगदी थोडक्यात तिचे विजेतेपद हुकले आहे. तरीही सध्या प्रत्येकाच्या तोंडी तिचंच नाव आहे. कारण अतिशय खडतर परिस्थितीत तिने हा प्रवास केला आहे. आज वाचूया तिचा हा प्रवास तिच्याच शब्दांत.

मान्याच्या खडतर प्रवासाबद्दलची पोस्ट नुकतीच सोशल मीडियावर शेयर झाली आहे त्या मुलाखतीत तिने सांगितलं आहे की, 'मी आणि माझ्या कुटुंबाने बर्‍याच रात्री उपाशी पोटी आणि न झोपता घालवल्या आहेत. रिक्षाला, बसला पैसे नसायचे म्हणून कितीतरी किलोमीटर मी पायी चालले आहे. इतके वर्ष गाळलेला घाम, केलेलं अथक परिश्रम याचं चीज झालं. हा विजय खूप मोलाचा आहे. रिक्षाचालकाची मुलगी असल्याने पैसे मिळवणे खूप महत्वाचे होते म्हणून मी अगदी लहान वयातच नोकरी करायला लागले.'

मान्या पुढे म्हणाली की, 'मला पुस्तकांची आवड होती. पण नशिबाने कधी साथ दिली नाही. माझ्या आई- वडिलांचे काही दागिने गहाण ठेऊन माझ्या परीक्षेची फी भरावी लागली. पैसे कमी असल्याने शिक्षण घेणे खूप कठीण जायचं.तरीही पदवी मी यशस्वीपणे पूर्ण केली. माझ्यासाठी माझ्या आई-वडिलांनी खूप त्रास सहन केला. मी १४ वर्षांची असताना घरातून पळाले होते. मी दिवसा अभ्यास करायचे. संध्याकाळी भांडी घासायला जायचे आणि रात्री कॉल सेन्टरमध्ये काम करायचे. रिक्षाचं भाडं वाचवण्यासाठी मी तासन्तास चालून घरी पोहोचायचे. कॉलेजेमध्येही रिक्षाचालकाची मुलगी असल्याने खूप हिणवले जायचे. आज मी फेमिना मिस इंडियाच्या मंचावर आहे. माझे पालक आणि भावाला आज माझा अभिमान आहे. मी फक्त एवढंच सांगेन की, जर आपल्या स्वप्नांवर आपला विश्वास असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असाल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.'

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरनेही मान्याच्या या प्रवासाचं आणि तिच्या धैर्याचं भरभरून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कारण मान्याने ज्या जिद्दीने तिचे ध्येय गाठलं ते अनेकांना प्रेरणादायी आहे.

व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२० चा ग्रँड फिनाले मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला वाणी कपूर, नेहा धुपिया, चित्रांगदा सिंह, अपारशक्ति खुराना आणि पुलकित सम्राट यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मिस इंडिया २०२० चे विजेतेपद मानसा वाराणसीने जिंकले आहे. उत्तर प्रदेशची मान्या सिंह उपविजेती ठरली तर मानिका श्योकंद तिसऱ्या स्थानावर आहे.

मान्याचे जुने फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मान्याने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे दाखवून दिले आहे. तिचे खूप अभिनंदन आणि तिच्या पुढच्या प्रवासाला बोभाटाकडून खूप खूप शुभेच्छा.

सबस्क्राईब करा

* indicates required