computer

५५००कोटींची उलाढाल करत भारतीय कापड उद्योगाला जगभरात पोचवणाऱ्या बाईंची गोष्ट!! कोणती कंपनी आहे ही?

महिला उद्योजकांच्या यशोगाथा फारच कमी ऐकायला/वाचायला मिळतात. आज आम्ही अशाच एका अज्ञात महिला उद्योजकाची गोष्ट घेऊन आलो आहोत. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर अत्यंत खडतर परिस्थितीतून आपल्या कंपनीला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून दिलं आहे. त्यांचा प्रवास वाचून आपल्यालाही नक्कीच शिकायला मिळेल.

दिपाली गोएंका या वेलस्पन ग्रुपचे मालक बाळकृष्ण गोएंका यांच्या पत्नी. २००२ साली त्यांनी कंपनीत काम करायला सुरुवात केली. मालकाची बायको आहे म्हणून ती ऑफिसमध्ये आहे एवढीच त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या कामाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जायचं.

स्वतःची ओळख निर्माण  करण्यासाठी त्यांनी ‘स्पेसेस’ नावाचा नवीन ब्रँड तयार केला. स्पेसेस अंतर्गत चांगल्या प्रतीचे टॉवेल्स आणि चादरी बाजारात आणण्यात आल्या. लवकरच या नव्या ब्रँडचा बाजारात जम बसला. २०११ साली त्यांनी पूर्ण कंपनीचं कामकाज पाहण्यास सुरुवात केली. २०१३ साली त्या वेलस्पन कंपनीच्या जॉईन्ट मॅनेजिग डायरेक्टर झाल्या.

ज्यावेळी भारतातील कापड उद्योग बांगलादेशी आणि व्हिएतनामी कंपन्यांमुळे डबघाईला आला होता त्यावेळी  दिपाली यांनी वेलस्पन कंपनीला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. ही भारतीय उद्योगक्षेत्रासाठी  महत्त्वाचीबाब आहे. गेल्यावर्षी वेलस्पन कंपनीची वार्षिक उलाढाल ही ५५०० कोटी रुपये एवढी होती. सध्या पूर्ण वेलस्पन इंडिया कंपनीची  उलाढाल ४५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. कंपनीच्या कमाईतला बदल हा दिपाली यांनी कंपनीचा भार सांभाळल्यानंतर वाढला आहे. दिपाली यांना ठाम विश्वास आहे की पुढच्या वर्षभरात एकट्या स्पेसेस आणि वेलहोम ब्रँडच्या माध्यमातून कंपनीचा बाजार भाव ३५०० कोटी एवढा होईल.

वेलस्पन उद्योगाला एवढं मोठं रूप देणं कठीण काम होतं. एक महिला म्हणून त्यांना पाण्यात बघितलं जायचंच, पण व्यवसायातली आव्हानही कमी नव्हती. २०१६ साली वेलस्पन कंपनीची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी ‘टार्गेट कॉर्प’ने वेलस्पनची उत्पादनं ही हलक्या दर्जाची आहेत अशी आवई उठवली.

या अफवेमुळे वेलस्पनच्या शेअर्समध्ये ५४ टक्क्यांनी घसरण झाली. कंपनीचं भांडवल १०४.३४ बिलियनवरून ४६.९७ बिलियनवर आलं. ही घसरण ११ दिवसात झाली होती. याखेरीज युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठेत जाणाऱ्या उत्पादनाला फटका बसला होता. हे नुकसान दिपाली गोएंका यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलं.

सर्व प्रयत्न करूनही २०१७-२०१८ वर्षांमध्ये कंपनीची विक्री ९ टक्क्यांनी  कमी  झाली. पण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर दिपाली गोएंका यांनी कंपनीला पूर्वपदावर आणलंच. आज वेलस्पनची उत्पादनं ३२ देशांमध्ये विक्रीसाठी जातात. यात अमेरिका, इंग्लंड, कॅनेडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशांचाही समावेश होतो.

दर्जेच्या बाबतीत हिणवली गेलेली कंपनी जागतिक बाजारपेठेत नावाजली गेली आहे. नुकतंच वेलस्पनच्या वार्षिक उलाढालीत ५५ टक्क्यांनी वाढ झाली. दिपाली गोएंका यांनी हे यश कसं साजरं हे तुम्ही पाहा.

५५०० कोटी  उलाढाल असलेल्या कंपनीच्या मालकीण सामान्य कर्मचाऱ्यांसोबत नाचत आहेत, हे चित्र क्वचितच पाहायला मिळतं.

तर मंडळी, दिपाली गोएंका यांनी वेलस्पन कंपनीला जी उंची मिळवून दिली आहे ती भारतीय उद्योगक्षेत्रासाठी एक महत्त्वाची बाब म्हणता येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required