गणपती बाप्पा मोरया: १७७९ पासून चालत आलेला तासगांवचा रथोत्सव. तुम्ही कधी पाह्यलाय का?
लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र यावा म्हणून सार्वजनिक गणशोत्सव १८८५मध्ये चालू केला. पण तासगांव नगरीत त्याहूनही १०६वर्षे आधीपासून रथोत्सवाची परंपरा चालू आहे. तासगांव तसं दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, एक म्हणजे द्राक्षं आणि दुसरी म्हणजे गणपती मंदिर.
हे मंदिर श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सन १७७९मध्ये बांधलं. या मंदिराची खासियत अशी, की उत्तरेकडचं गोपूर पद्धतीचं बांधकाम असलेलं हे शेवटचं मंदिर. तासगांवपासून जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ, तसतशी गोपूर पद्धतीची मंदिरं दिसू लागतात. तासगांवच्या मंदिराला शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेलं सातमजली गोपूर आहे. या मंदिरात प्रवेशदाराच्या वरच्या बाजूस नगारखाना आहे, पुढं प्रशस्त अंगण, खुला मंडप, सभामंडप आणि गाभारा अशी इथली रचना आहे. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. रस्त्याच्या एका टोकाला आहे गणेशमंदिर, तर दुसर्या टोकाला आहे काशी विश्वेश्वर. सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनात जाताना काशी विश्वेश्वराच्या खिडकीतून येणारी सूर्याची किरणे म्हणे गणेशमंदिरात येतात. आजही एका मंदिराच्या गाभार्यासमोर उभं राहिलं की समोरच्या मंदिराचा गाभारा दिसतो. अर्थात तिथलं शिवलिंग दिसत नाही, कारण दोन मंदिरांमध्ये अंतर बरंच आहे.
तर तासगांवचा रथोत्सव असतो ऋषिपंचमीच्या दिवशी. मंदिरातली पंचधातूची मूर्ती आणि संस्थानचा दीड दिवसाचा गणपती रथारूढ होतात. हो, संस्थानं खालसा झाली असली तरी आजच्या दिवशी पटवर्धनांना राजेपदाचा मान अजूनही मिळतो. दरबारातले मानकरी, विश्वस्त मंडळ असे सगळे रथात बसतात. सध्याचा रथ लोखंडी आहे आणि त्याला दिशा देण्यासाठी स्टिअरिंग व्हीलदेखील आहे. यापूर्वीचा रथ तीन मजली लाकडी होता. १९७१मध्ये तो पडला आणि दुष्काळ पडला. त्यामुळं रथाला काही होणं ही संकटाची चाहूल मानतात. रथाला लांबच लांब काढण्या बांधल्या जातात आणि त्यांना धरून भाविक रथ ओढतात. दुपारी बारा वाजता म्हणजे इंडियन ष्टांडर्ड टायमाप्रमाणे १ वाजता ही रथयात्रा चालू होते ती बापलेकाची भेट घडवायला. एका टोकाच्या गणेशमंदिरापासून ते दुसार्या टोकाच्या काशी विश्वेश्वरापर्यंत. हा रथ ओढल्यानं मनोकामना पूर्ण होतात अशी समजूत आहे. अगदीच ते नाही, तर रथाच्या चाकाला हात लावून नमस्कार केल्याशिवाय कुणी पुढे जात नाही. रथाला पाच, अकरा, पंचवीस, अशी नारळांची तोरणं बांधली जातात. लगेच ते नारळ सोलून दिवाणजी आणि रथावरचे इतरजण खोबरं , लाडू आणि पेढे प्रसाद म्हणून रथ ओढणार्या भाविकांवर उधळतात. समोर हजारोंनी लोक असतात, काय बिशाद तो प्रसाद रस्त्यावर पडायची!! खरंतर रथ ओढणं हा भक्तीचा भाग आणि चार-दोन मीटर रथ ओढून लगेच "दिवाणजी खोबरं.. " म्हणत रथयात्रेची मजा लुटणं हा अधिक आनंदाचा भाग आहे.
रथाच्या दिवशी नातेवाईकांना आमंत्रणं जातात, इतर गांवी असणारे तासगांवकर आवर्जून गणेशोत्सवाला गावी येतात, आजूबाजूच्या गावांतले लोक रथोत्सव पाहायला, रथ ओढायला आणि गावच्या यात्रेला म्हणून येतात. आजच्या दिवशी तासगांव नुसतं फुलून जातं. घरात गणपती बसत नाही, असं घर तासगांवात सहसा सापडायचं नाही. त्यामुळं गणपती आणताना चालू झालेला "मोरया.."चा गजर दुसर्या दिवशी रथोत्सव संपेपर्यंत चालूच असतो.