भारतातील या 7 सुंदर स्थळांना तुम्ही एकदातरी भेट द्यायलाच हवी..
शीर्षक वाचून तुम्हाला जर वाटत असेल की ही स्थळं म्हणजे ताजमहाल, कुतुबमिनार, म्हैसूर गोवा इ. असतील तर तुम्ही चुकताय.. ही आहेत ती सुंदर स्थळं जी तुम्ही अजूनही पाहिलेली नाहीत...
1. कोलुक्कमलाई (केरळ)
हे आहेत जगातील सर्वात उंचीवरील सुंदर चहाचे मळे. केरळच्या मुन्नार भागात असणार्या या चहांच्या मळ्यात तुम्ही मनमोहक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. घ्या मस्त जीपची सवारी आणि सोबत चवीला आहे इथला स्पेशल आणी विविध फ्लेवरचा चहा !
2. लडाख (जम्मू - काश्मीर)
बर्फाळ वातावरण, गोठलेली सरोवरे, रंगीबेरंगी गार्डन्स आणि प्राचिन बौद्ध लेण्यांचा खजिना म्हणजे लेह आणी लडाख. वसंत ऋतूमध्ये इथलं वातावरण तुम्हाला एक सुखद अनुभव देईल. येथील मॅग्नेटिक हिल तर निसर्गाचा एक चमत्कार आहे.
3. लक्ष्मी-नारायण सुवर्ण मंदिर (तामिळनाडू)
तामिळनाडूमधील वेल्लोर येथे डोंगर रांगांच्या पायथ्याशी असलेलं हे श्री लक्ष्मी नारायणी मंदिर संपुर्ण सोन्याने बनवलं आहे. सभोवती पाणी आणि रात्रीच्या अंधारात हजारो दिव्यांनी उजळून निघणारं हे सुवर्णमंदिर अत्यंत नेत्रदीपक वाटतं. अध्यात्मिक समाधान आणि मनःशांती देणार्या या रमणीय मंदिराला नक्की भेट द्या.
4. होगनकाल धबधबा (तामिळनाडू)
'भारताचा नायगारा' म्हणून ओळखला जाणारा हा भव्य धबधबा तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यात आहे. कावेरी नदीच्या प्रवाहातून निर्माण होणारा हा धबधबा मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करतो. जर तुम्हाला बोटिंगची आवड आहे, तर इथे तीही मजा लुटता येईल.
5. ऐझवाल (मिझोरम)
मिझोरमची राजधानी असलेलं हे ठिकाण डोंगरमाथ्यावर वसलेलं सुंदर शहर आहे. थंड हवा, मिझोरम संस्कृती, म्युझियम, सरोवर, डोंगरदऱ्या, हे सगळं काही तुम्हाला इथेच भेटेल. डोंगराळ भागात वसलेलं हे शहर रात्री पाहाणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे.
6. दुधसागर धबधबा (कर्नाटक)
कर्नाटक - गोवा सिमेवर असलेला हा सुंदर धबधबा 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटात दिसला होता. जंगलांनी वेढलेल्या या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक विशेष गर्दी करतात. सोयीसुविधांची कमतरता असली तरी इथले सौंदर्य तुम्हाला विसरता येणं शक्य नाही. धबधब्याच्या अगदी जवळून जाणारी रेल्वे एक वेगळंच दृश्य समोर उभं करते.
7. संडकफू (दार्जिलिंग)
पश्चिम बंगाल आणी नेपाळ च्या सीमेवर असणारं हे एक सुंदर पर्वतशिखर आहे. इथुन एव्हरेस्ट, कांचनगंगा या पर्वंताची शिखरे सहज दिसतात. निसर्गरम्य असं हे ठिकाण धाडसी लोकांना ट्रेकींगसाठी उत्तम पर्याय आहे. \
तर मग निवडा आपलं आवडतं ठिकाणं आणि सुरू करा तयारी.. हॅप्पी जर्नी !!