इंटरनेटवर व्हायरल होणारे कलोरोफिल काय आहे? ते शरीरासाठी फायदेशीर आहे का?
फिटनेस प्रेमी आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी नेहमीच काही ना काही नवीन शोधत असतात. त्यामुळे दर काही दिवसांनी एक नवीन गोष्टीचे फॅड येत असते. त्यातही कोणत्या फिल्मस्टारने फोटो पोस्ट केला की लगेच ते व्हायरल होते आणि सगळेजण त्याचा शोध घेतात. तर, सांगायचं इतकंच आहे की आता सध्या क्लोरोफिल पाण्याचा ट्रेंड आलाय.
हिरव्या रंगाचे हे पाणी पिऊन अनेक फायदे आहेत असे म्हटले जातेय. वनस्पतीमध्ये आढळणारे क्लोरोफिल काय आहे आणि ते आपल्याला कसे फायदेशीर आहे याची माहिती करून घेऊयात.
क्लोरोफिल वनस्पतींमध्ये आढळणारे हिरवे रंगद्रव्य आहे. हे सूर्याच्या किरणांपासून प्रकाश शोषून वनस्पतींचे पोषण करते. हे सूर्यप्रकाशाच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे वनस्पतींना स्वतःचे अन्न तयार करण्यास मदत करते. क्लोरोफिलमुळे वनस्पतींना हिरवा रंग मिळतो. क्लोरोफिलचा वापर अनेक वैद्यकीय कारणांसाठी केला जातो. हे क्लोरोफिल पाणी सेवन करण्याचे फायदे आहेत असा दावा केला जातोय. सकाळी उठल्यावर हे पाणी घ्यायचे असे सांगितले जातेय.
याचे फायदे असे सांगितले जात आहेत:
क्लोरोफिल पाणी हे त्वचा आणि शरीरावर खूप उपयुक्त ठरते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आहेत जी आपली त्वचा साफ करण्यास, रंग सुधारण्यास आणि आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. हे नैसर्गिक दुर्गंधीनाशक म्हणून देखील कार्य करते आणि शरीराची दुर्गंधी दूर करते.
क्लोरोफिल पाण्यात व्हिटॅमिन बी, डी आणि ई, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. हे पोषक घटक निरोगी केस आणि नखांची वाढ राखण्यास मदत करतात. केसांच्या वाढीव्यतिरिक्त हे मेलानिन तयार करतात त्यामुळे केस पांढरे होण्याचा वेग मंदावतो.
क्लोरोफिलमुळे उत्साही वाटते. शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या वाढवण्यास मदत होते.
क्लोरोफिलचा वापर त्वचेच्या जखमा भरण्यासाठीही होतो. जखमा साफ करून आणि त्वचेवर असताना बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करून हे जंतू संसर्ग कमी करते.
डाएटिंगसाठी म्हणजे वजन कमी होण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. क्लोरोफिलचे पाणी घेतल्याने तुम्हाला भूक कमी लागते. पोट भरल्यासारखे वाटते.
क्लोरोफिलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे संधिवात असलेल्या रुग्णांमध्ये जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि आराम देतात. संधिवातावर औषधे तयार करण्यासाठी क्लोरोफिलचा वापर केला जातो.
क्लोरोफिल पाण्याचे इतके सगळे फायदे असल्यामुळे फिटनेस प्रेमी इकडे वळले तर आश्चर्य वाटायला नको. तसेही या क्लोरोफिलची चव ही कडू नसते, खरंतर याला चवच नसते त्यामुळे ते कशातही मिसळून घेता येते.
हॉलीवूडच्या काही सेलिब्रिटींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचे फोटो टाकल्यामुळे हा ट्रेंड सुरू झाला आहे. हे फॅड आपल्याकडेही सुरु झाले तर आश्चर्य वाटायला नको.
लेखिका: शीतल दरंदळे