मध्यप्रदेशमध्ये आढळली आहेत पिवळी बेडकं...या बेडकांबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी माहित आहेत का ?
तुम्ही कधी पिवळी बेडकं पाहिली आहेत का ? मध्यप्रदेशाच्या नरसिंगपूर जिल्ह्यात पिवळी बेडकं आढळली आहेत. भारतीय वनाधिकारी प्रवीण कास्वान यांनी पिवळ्या बेडकाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
या पिवळ्या बेडकांना बुलफ्रॉग म्हणतात. आपल्याला वाटेल की हे बुलफ्रॉग दुर्मिळ असतात, पण बुलफ्रॉग भारत, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात आढळून येतात. कास्वान यांनी माहिती दिल्याप्रमाणे ही बेडकं आपला रंग बदलू शकतात. मान्सूनमधे नर बेडकं मादी बेडकांना आकर्षित करण्यासाठी स्वतःला गडद पिवळ्या रंगात बदलतात. हा व्हिडीओ पाहा.
Have you ever seen Yellow frogs. Also in this number. They are Indian #bullfrog seen at Narsighpur. They change to yellow during monsoon & for attracting the females. Just look how they are enjoying rains. @DDNewslive pic.twitter.com/Z3Z31CmP0b
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 13, 2020
आज विषय निघालाच आहे तर या पिवळ्या बेडकांबद्दल आणखी थोडी माहिती जाणून घेऊया.
भारतीय बेडकांचा रंग फिकट पिवळा असतो पण नर बेडकांचा रंग मान्सूनमध्ये गडद पिवळा होतो. बेडकं स्वतः रंग बदलू शकतात. या बेडकांचं एक वैशिष्ट्य त्यांना इतर बेडकांपासून वेगळं करतं. ते म्हणजे ही बेडकं खादाड म्हणून ओळखली जातात. त्यांच्या तोंडात मावेल असं सगळं काही खाण्याची क्षमता त्यांच्यात असते. उंदीर, पक्षी इतर प्रजातीतील बेडकं आणि वेळ आलीच तर ते सापही फस्त करतात. याच कारणाने बेडकांची ही प्रजाती जगाच्या ज्या इतर भागांमध्ये गेली तिथे तिने स्थानिक प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण केला. असं म्हणतात की बुलफ्रॉग प्रजातीतील लहान बेडकं आपल्याच प्रजातीतील लहान बेडकांना खातात.
पिवळ्या बेडकांना बघणं मजेशीर वाटू शकतं पण ती दिसतात तेवढी मजेशीर नाहीत. पण त्यांना बघणं नक्कीच गमतीदार आहे.