'जिओ ग्लास' म्हणजे नेमकं काय? तो कसा काम करेल? सगळं काही जाणून घ्या...
रिलायन्सच्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानींनी अनेक मोठ्या आणि घोषणा केल्या आहेत. भारतात स्वतःचं 5G तंत्रज्ञान लॉन्च करण्याबरोबरच त्यांनी 'जिओ टिव्ही प्लस' आणि 'जिओ ग्लास' या उपकराणांबद्दलही माहिती दिलीय. यातलं हे जिओ ग्लास म्हणजे नेमकं काय असणार आहे काय आणि तो काम कसा करेल, हे कुतूहल आता गॅजेट प्रेमींना सतावतंय. चला तर मग जाणून घेऊया...
'जिओग्लास' हा एक मिक्स्ड रिॲलिटी तंत्रज्ञानानं युक्त असा स्मार्ट चष्मा आहे. आपल्या नेहमीच्या चष्म्याप्रमाणे दिसणारा, तितकाच हलका, पण किंचीत जाड आणि हेडसेटच्या आकाराचा हा चष्मा जिओची उपकंपनी 'टेसरॅक्ट'नं डिझाईन केलाय. याआधी असंच एक गॅजेट स्नॅपचॅटनंदेखील बनवलं होतं.
Mixed Reality मध्ये आभासी आणि वास्तव दृष्यांचं एकत्रीकरण करूण एक नवं दृष्य निर्माण केलं जातं. ज्यात भौतिक आणि डीजीटल स्वरूपातल्या गोष्टी एकत्रित अनुभवता येतात. या जिओग्लासच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या संपर्कातील व्यक्तींशी 3D होलोग्राफीक स्वरूपात Live संवाद साधू शकता. त्यामुळं ग्लास परिधान करणाऱ्या व्यक्ती एकमेकांना 3D अवतारात पाहू शकतात, बोलू शकतात, आणि डॉक्यूमेन्ट, प्रेझेन्टेशन, डिझाईन्स अशा गोष्टींची होलोग्राफीक स्वरूपात एकमेकांशी देवाणघेवाण करू शकतात. म्हणजेच आतापर्यंत स्मार्टफोनवरती व्हिडीओ कॉलमध्ये दिसणारी व्यक्ती या ग्लासच्या माध्यमातून तुमच्यासमोर वास्तवात उभी असल्याचा आभास होईल.
हा ग्लास हाय रिझोल्यूशन डिस्प्ले आणि ऑडिओ क्वॉलिटीसोबत येईल. केबलच्या माध्यमातून तो तुमच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटला कनेक्ट होईल. इथं कॉल लावण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या आवाजाद्वारे सुचना द्यायच्या आहेत आणि हा ग्लास जवळपास २५ मिक्स्ड रिॲलिटी ॲप्सना सपोर्ट करतो. त्यामुळं एखादा व्हिडीओ किंवा चित्रपट तुम्हाला अगदी थिएटरमध्ये बसल्याच्या थाटात बसून पाहाता येईल.
कोरोनानंतरचं जग बघता पुढील काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण पध्दतीचा अवलंब वाढणार हे नक्की आहे. त्यामुळं इथं हा ग्लास अत्यंत महत्वाची भुमिका बजाऊ शकतो. व्हर्चुअल मिटींग्ज किंवा व्हर्च्युअल क्लासरूम्सच्या संकल्पना या ग्लासच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्षात आणता येतील. पण जिओनं या ग्लासच्या किंमतीबाबत, किंवा तो बाजारात कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.