व्हॉट्सऍपच्या जन्मदात्यानेच सिग्नल तयार केलाय? कोण आहे ब्रायन ऍक्टन?
व्हॉट्सऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला विरोध म्हणून लोक सिग्नल ऍपकडे वळत आहेत. सिग्नल ऍप डाउनलोड करण्याचा वेग देखील प्रचंड वाढला आहे. सिग्नल ऍप काय आहे आणि त्याचे काय फायदे आहेत याबद्दल आपण बोभाटावर सविस्तर वाचलंच आहे. आजच्या लेखातून आपण अशा माणसाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने कधीकाळी व्हॉट्सऍप तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, पण आता त्यानेच सिग्नल ऍप तयार केले आहे.
त्याचे नाव आहे ब्रायन ऍक्टन!!
ब्रायन ऍक्टनचा जन्म १९७२ साली अमेरिकेतील मिशिगन येथे झाला होता. त्यांनी १९९४ साली स्टॅनफर्ड विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले होते. सिग्नल याच नावाची त्यांची संस्था देखील आहे. २००१८ साली त्यांनी सिग्नल ऍपची निर्मिती केली होती.
पण त्याही पूर्वी फेसबुक आणि ट्विटरमध्ये नोकरीचा अर्ज केला होता. पण त्यांना नोकरी मिळाली नाही. पुढे नशिबाचे फासे फिरले. ऍक्टन यांनी जॅन कौम यांच्या सोबत मिळून व्हॉट्सऍपची सुरुवात केली होती. शेवटी त्यांनी आपल्याला नोकरी नाकारणाऱ्या फेसबुकलाच १९०० कोटी डॉलर्सना व्हॉट्सऍप विकले होते. आज ऍक्टन यांचे मत आहे की सर्वांनी फेसबुक डिलीट करायला हवं. त्यासाठी त्यांनी #deletefacebook मोहीम सुरु केली आहे.
व्हॉट्सऍप विकल्यावर देखील ते व्हॉट्सऍपमध्येच काम करत होते. पण २०१७ साली काहीतरी नविन करण्याच्या इच्छेने त्यांनी व्हॉट्सऍप सोडून सिग्नल फाउंडेशनची स्थापना केली होती. एकेकाळी ऍक्टन यांनी बनवलेल्या व्हॉट्सऍपला जगाने डोक्यावर घेतले. आता पुन्हा त्याच ऍक्टन यांनी बनवलेल्या सिग्नल ऍपला जग डोक्यावर घेऊ पाहत आहे. एखाद्या ऍप डेव्हलपरसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली असेल?