computer

रशिया सर्वात खतरनाक नेमबाज- 'वाली'च्या मृत्यूच्या अफवा पसरवत आहे. जाणून घ्या हा वाली आहे तरी कोण?

रशिया-युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. लवकरच हे युद्ध थांबावं आणि जगावरील तिसऱ्या महायुद्धाचं संकट टाळावं अशी अनेकांची इच्छा असताना, या युद्धात परदेशी योद्धेही आपले योगदान देण्यासाठी उतरले आहेत.

रशियासारख्या बलाढ्य आणि ताकदवान राष्ट्रापुढं युक्रेनचा निभाव लागणं कठीण दिसत आहे. एकीकडे युक्रेन रशियाशी शांती प्रस्तावावर चर्चा करण्यास उत्सुक असला तरी, रशिया इतक्यात युद्धाला पूर्णविराम देईल अशी चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी देशोदेशीच्या योद्ध्यांना आपल्या लष्करात सामील होऊन आपल्याला या युद्धात सहकार्य करावं अशी विनंती केली होती.

युक्रेनमधील हाहाकार पाहून जगभरातील अनेक योद्धे झेलेन्स्कींच्या विनंतीचा मान राखत या युद्धात सहभागी होत आहेत. या सगळ्यात सध्या जोरात चर्चा सुरू आहे ती नेमबाज वालीची. नेमबाज वाली हा कॅनडियन सैनिक आहे आणि नेमबाजीत सध्या तरी त्याचा हात कुणीच धरू शकत नाही. वालीसारखा एक निष्णात नेमबाज युक्रेनच्या बाजूने या युद्धात उतरल्याने युक्रेनला थोडाफार दिलासा नक्कीच मिळाला असेल. पण म्हणूनच युक्रेनचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्याच्या मृत्यूच्या बातम्याही रशियन सूत्रांकडून काही दिवसांपूर्वी प्रसारित केल्या होत्या. अजून यातलं खरं-खोटं काही सिद्ध झालं नसलं तरी आज जगातल्या सर्वात खतरनाक म्हणून ओळखला जाणाऱ्या या वाली नेमबाजाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

वाली हा कॅनडियन नेमबाज आहे. या आधी त्याने अफगाणिस्तानमधल्या मसूलच्या युद्धात आपल्या नेमबाजीची झलक दाखवलेली होती. ३.५ किमी अंतरावरून शत्रूचा अचूक वेध घेण्याची क्षमता वालीच्या नेमबाजीत आहे. यावरूनच वाली जगातील सर्वश्रेष्ठ नेमबाज म्हणून का ओळखला जातो हे तुमच्या लक्षात आलं असेल. कॅनडाच्या कॅनडियन रॉयल २२ रेजिमेंटमध्ये तो नेमबाज आहे.

‘वाली’ हे त्याचं लष्कराने दिलेलं टोपण नाव आहे. त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची खरी ओळख उघड केली जात नाही. मात्र रशिया त्याबद्दलही काही अफवा पसरवत आहे. आपली पत्नी आणि अवघ्या एक वर्षाच्या मुलाला आपल्या देशातील नागरिकांच्या सुरक्षा दलाच्या भरोशावर सोडून वाली ९ मार्च रोजी युक्रेनच्या मदतीसाठी तिथे दाखल झाला आहे. मोठमोठ्या रशियन टँक्सना नेस्तनाबूत करण्यासाठी काय करता येईल यावर सध्या त्याचा विचार सुरू आहे. अरबी भाषेत ‘वाली’ शब्दाचा अर्थ होतो रक्षणकर्ता. वाली खरोखरच आपल्या कृतीतून हा शब्द जगतो आहे.

वाली म्हणतो तसं पाहायला गेलं तर मला लोकांचा जीव घेणं आवडत नाही, पण वेळ आलीच तर मी कुणावरही दया-माया दाखवत नाही. कीव्ह हस्तगत करण्याची रशियाची महत्वाकांक्षा त्यांना चांगलीच महागात पडू शकते. हे युद्ध म्हणजे स्टालिनग्राडची पुनरावृत्ती असेल असंही वाली म्हणतो. वाली युक्रेन सैन्यात सामील झाल्याच्या बातमीने रशियन सैन्य चांगलेच हादरून गेलेलं आहे असं दिसतय. म्हणूनच वालीला युक्रेन मध्ये दाखल होऊन जाऊन चार दिवस झाले नाहीत तोवरच रशियन सैन्याने तो शहीद झाल्याच्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे.

 

पण, वाली आपले काम अगदी नेटाने करत आहे. अशा अफवा पसरवल्याने आपण जिवंत आहोत, हे सांगायला तो स्वतःहून पुढे येईल आणि मग आपोआपच रशियन सैन्याला त्याचा ठिकाणा कळेल अशा उद्देशाने रशिया या अफवा पसरवत आहे. वालीही हे डावपेच चांगलेच जाणतो.

एक नेमबाज दिवसातून चार-पाच बळी सहज घेऊ शकतो. अगदी निष्णात नेमबाज दिवसातून दहा तरी बळी नक्कीच घेऊ शकतो. वालीची क्षमता मात्र यापेक्षाही तगडी आहे. एका दिवसात सरासरी ४० बळी घेतल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंद आहे. यावरून वालीला जगातील सर्वात खतरनाक स्नायापर का म्हटले जाते ते स्पष्ट होते.

वालीच्या येण्याने युक्रेनला नक्कीच थोडा दिलासा मिळाला असेल. तरीही लवकरात लवकर हे युद्धाचं संकट दूर व्हावं हीच प्रार्थना!

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required