computer

अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२

काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १

अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२

जगाच्या हिशोबात अफगाणिस्तानला महत्व का आहे? अफगाणिस्तान जगाची वाटही लावू शकतं ??? काबूल एक्सप्रेस भाग -३

 

 

२००१ साली अमेरिकेनं अफगाणिस्तानवर आक्रमणच केलं होतं. तालिबान विरोधी मोर्चाला मदत करण्यासाठी अमेरिकेचं बलवान सैन्य अफगाणिस्तानात पोचलं खरं, पण मदत करण्याऐवजी अमेरिकन सैन्यानं स्वतःच तालिबानशी लढाई आरंभली. काही काळ अमेरिकेचं १.५ लाख सैन्य अफगाणिस्तानात होतं. तुलनेनं तालिबानचे गावठी सैनिक फार तर वीस पंचवीस हजार असतील. पण दीड लाखाचं अमेरिकन सैन्य आणि तितकंच अफगाण सैन्य यांना तालिबाननं २० वर्षं जाम घुमवलं, घुसळलं आणि शेवटी थकलेल्या अमेरिकन सरकारनं काढता पाय घेतला.

 

अँग्लो -अफगाण युध्द १८७९

यात नवं काहीही नाही. अफगाणी लोकांवर आक्रमण करून त्यांना जिंकणं कोणालाच कधीच जमलेलं नाही. इतिहासकार म्हणतात की अफगाणिस्तान हे साम्राज्यांचं कब्रस्तान आहे, अनेक साम्राज्यं अफगाणिस्ताननं आपल्या कबरस्तानात ठेवली आहेत.
इराण, मध्य आशिया आणि भारत यांच्यामधे अफगाणिस्तान येत असल्यानं ब्रिटिशांना अफगाणिस्तानवर ताबा हवा असे. १८३९ नंतर ब्रिटिशांनी चारेक वर्ष अफगाणिस्तानवर आक्रमण करून जिंकण्याचा प्रयत्न केला. अफगाणांनी ४७०० ब्रिटीश सैनिक कापून काढले. फक्त एक जखमी ब्रिटीश  सैनिक घोड्यावर लादल्या अवस्थेत भारतात परतला. त्यानंतर १८७८ मधे ब्रिटिशांनी पुन्हा प्रयत्न केला आणि मार खाल्ला. शेवटी १९१९ साली युद्ध करून अफगाणिस्ताननं ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं.

सोव्हीएट आक्रमण १९७९

१९७९ साली रशियन सैन्यानं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. १० वर्षानी १९८९ साली रशियन सैन्यानं १५ हजार सैनिक गमावून अफगाणिस्तानातून पळ काढला.
१९७९ साली तालिबान ही संघटना नव्हती. त्यावेळी अनेक जिहादी गट स्वतंत्रपणे रशियन सैन्याविरोधात लढत होते. त्यांना पाकिस्तान मदत करत होतं. रशियन सैन्याची हवाई ताकद आणि रणगाडे यांच्यासमोर जिहादी फक्त बंदुका घेऊन लढत होते. रशिया या कम्युनिष्ट शत्रूला हरवण्यासाठी सौदी अरेबिया आणि अमेरिका लढाईत पडले

अमेरिकेनं खांद्यावरून हवेत सोडता येणारी क्षेपणास्त्रं पाकिस्तानी सैन्याच्या मध्यस्थीनं जिहादींकडं सोपवली. त्या शस्त्राचा वापर करून जिहादींनी रशियन विमानं पाडली. रशिया हतबल झाला,पळाला. अमेरिका आणि जिहादी यांच्यातला संबंध नंतर वाढत गेला, तालिबान अमेरिकेनं जोपासलं.
पण रशिया पळाल्यावर जिहादी गट आपसात भांडू लागले. १९९० ते १९९६ या गटांचं भांडण चाललं होतं. प्रत्येक गटाला काबूलवर कब्जा हवा होता. अराजक माजलं होतं. या अराजकात मुल्ला उमरच्या तालिबांनी मुसंडी मारली.

 

अफगाणी समाजरचना

अफगाण समाज सांस्कृतीकदृष्ट्या एकसंध नाही. अफगाणिस्तानाची घडण अशी. ४२ टक्के पश्तून, २७ टक्के ताजिक,९ टक्के हजारा, ९ टक्के उझबेक, ४ टक्के ऐमाक,३ टक्के तुर्कमान, २ टक्के बलुच. त्यांचा एकसंध अफगाण समाज तयार झालेला नाही. सर्व इस्लामी असले तरी शिया आणि सुनी मारामाऱ्या आहेतच. अफगाण समाजात पश्तुन समाजात धर्माला महत्व नाही,जमात संस्कृतीला महत्व आहे. अफगाणिस्तानात ३०० पेक्षा जास्त जमाती आहेत. प्रत्येक जमात स्वतःच्या परंपरा आणि नियमानुसार वागते. मुख्य म्हणजे प्रत्येक जमातगट प्रचंड स्वतंत्र असतो आणि प्रत्येक जमातीतली प्रत्येक व्यक्ती प्रचंड स्वतंत्र असते. मेलमस्ती आणि बदला या दोन सवयी अफगाण माणसाच्या जीन्समधे घट्ट गुंतलेल्या आहेत. उपयुक्त आणि प्रेमाचा संबंध असेल तर मेलमस्ती, माणसासाठी जीव द्यायचा. धोका असेल तर बदला, थेट ठार मारून मोकळं व्हायचं अशा या दोन सवयी!!
त्यामुळंच अफगाण माणसं केव्हां एकमेकाशी दोस्ती करतील आणि केव्हा एकमेकांचा जीव घेतील ते सांगता येत नाही.

 

पाकीस्तानी दोस्ती पण संपली

अफगाण समाज आणि त्यातला बहुसंख्य पश्तून समाज म्हणूनच कधीही कोणाच्या कह्यात जात नाही, तो टोकाचा स्वतंत्र आणि स्वमग्न असतो. माजी अध्यक्ष हमीद करझाई आणि कालच पळून गेलेले अध्यक्ष अश्रफ घनी पश्तून आहेत. पण तरीही ते तालिबानचे कडवट शत्रू आहेत. रशियन लोकांशी लढत असताना तालिब पाकिस्तानच्या प्रेमात होतं. पण पाकिस्तान शेवटी अफगाणिस्तानला ताटाखालचं मांजर करू पहातंय हे पक्कं लक्षात घेऊन तालिबाननं गेली तीनेक वर्षं पाकिस्तानला सर्व विचार विनिमयातून दूर ठेवलं होतं. अफगाण तालिबाननं पाकिस्तानी तालीबान निर्माण करून पाकिस्तान सरकारला छळलं.

 

काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १

अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२

जगाच्या हिशोबात अफगाणिस्तानला महत्व का आहे? अफगाणिस्तान जगाची वाटही लावू शकतं ??? काबूल एक्सप्रेस भाग -३

सबस्क्राईब करा

* indicates required