computer

साऊथ कोरियाचा 'रेनकोट किलर' - यू यंग चूल. एक पंथ त्याला चक्क संत मानतो?

वर्ष : सप्टेंबर २००३ ते जुलै २००४.

स्थळ : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल.

हे संपूर्ण वर्ष पोलिसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारं ठरलं होतं. अवघं पोलीसदल चिंतामग्न होतं. त्यांच्या चिंतेचं कारण होतं क्रूरपणे हत्या करणारा यू यंग चूल नावाचा माथेफिरू. सप्टेंबर २००३ ते जुलै २००४ या काळात यू ने अनेक लोकांची हत्या केली होती. त्याचं लक्ष्य होतं श्रीमंत व्यक्ती आणि महिला. श्रीमंत 'सावज' हेरायचं, लपतछपत त्यांच्या आलिशान घरांमध्ये शिरायचं आणि घरातल्या लोकांना मारून टाकायचं अशी त्याची पद्धत होती. याशिवाय तो वेश्यांना त्याच्या घरी बोलावून घेऊन बाथरूममध्ये त्यांचा खेळ खलास करायचा. दहा महिने त्याने खून करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे पोलीस पुरते गोंधळून गेले होते. त्यांच्यावर मात करणारा हा माणूस होता तरी कोण? त्याचा ठावठिकाणा काय होता? हे प्रश्न त्यांना छळत होते. याच प्रश्नांची उत्तरं देणारी ही क्राईम स्टोरी. दक्षिण कोरियाचा रेनकोट किलर या नावाने (कु)प्रसिद्ध असलेल्या यू यंग चूल नावाच्या सीरियल किलरची गोष्ट.

या यू चा जन्म दक्षिण कोरियातल्या एका खेडेगावात झाला. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. म्हणूनच की काय जवळपास राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबाबद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला. हळूहळू त्याला श्रीमंत लोकांबद्दल अढीच बसली. सगळे पैसेवाले एकजात शत्रू झाले त्याचे. दरम्यान त्याची पावलं गुन्हेगारीच्या वाटेकडे वळली होती. १९८८ आणि १९९१ मध्ये तो पहिल्यांदा चोरीच्या आरोपांत गुन्हेगार म्हणून पुढे आला. त्यानंतर १९९३ मध्ये खोट्या सह्या करणे, दरोडा, चोरी या गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. अपराधांची ही कमान सतत चढतीच राहिली. शेवटी सन २००० मध्ये एका १५ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगवास झाला.

तुरुंगात तर त्याच्या तिरस्काराला अजून धुमारे फुटायला लागले. आतापर्यंत लोकांचा द्वेष करणं ही केवळ एक भावना होती, आता या द्वेषातून त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू झाला. याच काळात कोरियन सिरीयल किलर जेऑन्ग डू येऑन्ग याच्यावरचा लेख त्याच्या वाचनात आला. या सीरियल किलरने श्रीमंत लोकांना लक्ष्य केलं होतं. यूनेही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवायचं ठरवलं. फक्त आपल्या सावजांच्या यादीत त्याने श्रीमंत लोकांच्या जोडीला बायकांचीही भर घातली. त्याचं कारण होतं तो बायकांचाही तिरस्कार करायचा. एका मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या त्याच्या बायकोने त्याला सोडचिठ्ठी दिली होती, त्यातूनच हा तिरस्कार त्याच्या मनात निर्माण झाला असावा.

२००३ मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर लगेचच त्याने त्याच्या पहिल्या खुनाच्या कटास सुरुवात केली. शस्त्र विकत घेऊन कुत्र्यांना मारत त्याने त्याचा सराव केला. यानंतर २४ सप्टेंबर २००३ या दिवशी म्हणजेच तुरुंगातून सुटून आल्यानंतर तब्बल १३ दिवसांनी त्याने पहिला खून केला. जेऑन्गप्रमाणेच यूलाही श्रीमंत लोकांना मारायची इच्छा होती. तो सेऊलच्या श्रीमंत वस्तीत गेला आणि तिथे एका दुमजली घरात घुसला. या घरात ली डेओक सु हे ७२ वर्षीय प्राध्यापक आणि त्यांची ६८ वर्षीय बायको राहत होते. या दाम्पत्याच्या काही लक्षात येण्याआधीच त्याने हातोडी घेऊन त्यांच्यावर प्रहार केला. एवढ्यावरच न थांबता ते मरेस्तोवर तो त्यांना मारत राहिला. एक खून करून पचवल्यावर त्याला चांगलाच आत्मविश्वास आला. तेव्हापासून त्याने वेगाने लोकांना ठार मारायला सुरुवात केली. त्याने ऑक्टोबरमध्ये ३ जणांच्या कुटुंबावर हल्ला करून ठार मारलं. नोव्हेंबरमध्येही तिघांचा जीव घेतला. यात एका नोकराला हकनाक जीव गमवावा लागला.

एवढे खून होत असताना पोलीस मात्र अंधारात चाचपडत होते. पीडितांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. खुन्याने त्यांच्या घरातील मौल्यवान गोष्टी चोरल्या नव्हत्या. काही पायांचे ठसे आणि धूसर सीसीटीव्ही फुटेज एवढंच काय ते त्यांच्या हाताशी होतं. त्यावरून खुन्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं.

इकडे यूने एका वेगळ्या वर्गावर लक्ष केंद्रित केलं. हा वर्ग होता सेक्स वर्कर्सचा. एकतर श्रीमंत अशा ज्येष्ठ नागरिकांच्या हत्याकांडाने पोलीस हादरले होते आणि खुन्याचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडत होते. आणि तसाही त्याच्या घटस्फोटापासूनच तो बायकांचा तिरस्कार करत होता. त्याने बायकोला ठार मारण्याचा विचारही केला होता. पण त्याच्या तिरस्कारात खरी भर पडली ती त्याची प्रेयसी त्याला सोडून गेल्यावर. त्याची बायको मसाज पार्लरमध्ये आणि प्रेयसी टेलिफोन रूममध्ये काम करत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये वेश्याव्यवसाय जोरदार होता. म्हणून यू वेश्यांना लक्ष्य बनवायला लागला. सेऊल मसाज पार्लरमधील सेक्स वर्कर्सना तो त्याच्या अपार्टमेंटमध्ये बोलवायचा. या महिलांना बाथरूममध्ये नेऊन त्यांच्याबरोबर संबंध ठेवून नंतर तो लांब दांड्याच्या हातोड्याने त्यांना मारायचा. हा हातोडा त्याने खास बनवून घेतला होता. नंतर तो त्यांच्या शरीराचे सोळासतरा तुकडे करायचा. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांची बोटं तोडून टाकायचा. नंतर शरीराचा उर्वरित भाग कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये भरून या पिशव्या तो शहराबाहेरच्या टेकडीवर पुरायचा.

 

यात एक गोम अशी होती, की त्याने इतर काही लोकांचेही खून केले होते. यात एक रस्त्यावरचा विक्रेता होता. तो पुरुष होता आणि श्रीमंतही नव्हता. कापडाच्या दुकानात काम करणाऱ्या एका तरुणीला त्याने ती वेश्या असल्याच्या केवळ संशयावरून मारलं होतं.
तो इतका विचित्र होता की त्याच्या बळींच्या शरीराचे काही भाग तो खात असे. ही गोष्ट केल्याने आत्मा 'विशुद्ध' होतो अशी त्याची धारणा होती. मे आणि जुलै २००४ या काळात त्याने किमान ११ महिलांना ठार मारलं होतं. या मारलेल्या महिलांपैकी एकही महिला श्रीमंत नव्हती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा फार गाजावाजा झाला नाही. मात्र मसाज पार्लरच्या मालकांना काहीतरी खटकत होतं. कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटत होतं.

गुन्हेगार कितीही हुशार असो, तो एखादी तरी चूक करतोच. याला यूही अपवाद नव्हता. त्याने मसाज पार्लरमध्ये फोन करताना त्याच्या बळींपैकी एकीचा फोन वापरला. त्याची ही चूकच त्याला महागात पडली. मसाज पार्लरच्या मालकाने आलेला फोन हा संशयास्पद रीतीने गायब झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा आहे हे ओळखलं. त्याने लगेच पोलिसांना कळवलं. पोलिसांनी यू ला पकडण्यासाठी अधिकाऱ्याला पाठवलं आणि त्याच्या मदतीने व्यवस्थित नियोजन करून त्याला मसाज पार्लरच्या कर्मचाऱ्यांनी पकडलं. जेव्हा तो त्याच्या सावजाला भेटण्यासाठी मोटेलमध्ये ठरलेल्या ठिकाणी आला, तेव्हा मसाज पार्लरच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांकडे सुपूर्द केलं.

पण यू साधा नव्हता! त्याच्याच दाव्यानुसार, तो १४० आयक्यू असलेला एक स्मार्ट मनुष्य होता. पोलिसांच्या कचाट्यात सापडल्यावर त्याने त्याला फीट आल्याचं नाटक केलं आणि पोलिसांच्या तावडीतून निसटला. पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. पण यावेळी पोलीस कोणताही चान्स घेणार नव्हते. बारा तासांतच तो पोलिसांच्या ताब्यात आला.

दुसऱ्या अटकेनंतर त्याने स्वतःचे सगळे गुन्हे कबूल केले. पीडितांची शवं कुठे आहेत हे दाखवण्यासाठीपण तो तयार झाला. या सगळ्या काळामध्ये त्याने पिवळा रेनकोट घातला होता. परिणामी प्रसारमाध्यमांनी त्याला 'रेनकोट किलर' हे नाव दिलं. पुढे जाऊन त्याने जे काय केलं त्याबद्दल माफी मागितली, पण म्हणून केलेल्या कृत्याबद्दल त्याला अजिबात पश्चात्ताप नव्हता. एवढंच नाही, तर आपण पकडलं गेलो नसतो तर अजूनही खून केले असते असं त्याने सांगितलं. वेश्याव्यवसायाशी संबंधित नसलेल्या लोकांनाही मारल्याची कबुली त्याने दिली. त्याने एकूण २६ लोकांना मारल्याची कबुली दिली आहे. डिसेंबर २००४ मध्ये यू यंग चूल याला २० हत्यांसाठी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

दक्षिण कोरियामध्ये फाशीवर स्थगिती असल्यामुळे तो सध्या तिथल्या डीटेन्शन सेंटरमध्ये कैदेत आहे. २००८ मध्ये त्याच्या कृष्णकृत्यांवर आधारित 'द चेसर' हा सिनेमा आला. नुकताच २०२१ मध्ये याच विषयावरचा 'द रेनकोट किलरः चेसिंग अ प्रिडेटर इन कोरिया' हा माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला.

यू च्या या गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांनी त्याला तुरुंगवासाशिवाय काहीच मिळालं नाही. शेवटी कुठलाही गुन्हा परफेक्ट क्राईम असू शकत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. या सगळ्यावर अजून एक कडी म्हणजे यू ला संत ठरवणारा एक पंथ जगात अस्तित्वात आहे. व्हीजे असं नाव असलेल्या या धर्मात यू सारख्यांना मानणारे अनेक अनुयायी आहेत. त्यांच्या मते यू आणि त्याच्यासारखेच इतर नऊ कर्तबगार(?) पुरुष जग जिंकणार आहेत!!

पण सेऊलच्या रहिवाशांसाठी यू कायम रेनकोट किलर म्हणूनच स्मृतीत राहणार आहे.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required