एकीकडे बेंगळुरू आणि मुंबईसारखी शहरं फ्लाइंग टॅक्सीच्या फक्त गप्पा मारत आहेत,तर दुसरीकडे उत्तराखंडच्या एका दुर्गम गावातल्या तरुणाने थेट हवेत उडणारं विमान तयार करून त्याची यशस्वी चाचणीही घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान फक्त चकाकणाऱ्या लॅबमध्येच जन्माला येतं, हा समज या घटनेने मोडीत काढला आहे.
उत्तराखंडमधील अल्मोडा(अल्मोरा) जिल्ह्यातील काफली खान या छोट्याशा गावातून एक क्रांतीकारी बातमी आली आहे. रवी टमटा या तरुणाने 'हॅपिडा स्कायनेक्स' (Happida Skynex) नावाचं सिंगल-सीटर इलेक्ट्रिक विमान तयार केलं आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी अल्मोडाच्या मैदानावर या विमानाने जेव्हा पहिलं उड्डाण केलं, तेव्हा उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांचे डोळे विस्फारले होते.
प्रवास ९० मिनिटांचा की १० मिनिटांचा?-रवीने हे विमान हौस म्हणून नाही, तर एका गंभीर समस्येवर उपाय म्हणून शोधलं आहे. डोंगराळ भागात ४० किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी नागमोडी रस्त्यांवरून किमान ९० मिनिटे लागतात. पण रवीचं 'हॅपिडा स्कायनेक्स' हेच अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करू शकतं. रस्ते नाहीत, वळणं नाहीत, थेट हवेतून प्रवास! सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विमान पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नच उरत नाही.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप- रवीच्या या कामगिरीची दखल खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेतली आहे. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे रवीचं अभिनंदन केलं आणि त्याला 'संपूर्ण देशातील तरुणांसाठी प्रेरणा' म्हटलं आहे. एवढंच नाही, तर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनीही या स्वदेशी तंत्रज्ञानाचं कौतुक केलं असून रवीची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रवी टमटा हे नाव विज्ञानाच्या क्षेत्रात नवीन नाही.यापूर्वी त्याने चालताना मोबाईल चार्ज करू शकणारे बूट, ईव्ही चार्जिंगचे नवनवीन कॉन्सेप्ट्स आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी 'जीपीएस स्टिक' विकसित केली आहे. हे सर्व शोध त्याने कोणत्याही मोठ्या शहरात न जाता, आपल्या गावात राहूनच लावले आहेत.
तंत्रज्ञान आणि आव्हाने-'हॅपिडा स्कायनेक्स' हे विमान मॉडिफाईड ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित आहे. सध्या हे केवळ एक प्रोटोटाइप (नमुना) आहे. याला व्यावसायिक स्तरावर आणण्यासाठी आणि सरकारी परवानग्या मिळवण्यासाठी अजून काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, विज्ञानाची कमाल आणि जिद्द असेल तर काय घडू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
भारताचा भविष्यातील विकास आता केवळ मेट्रो शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. जेव्हा हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यातून एखादं विमान झेपावतं, तेव्हा समजावं की 'न्यू इंडिया' खऱ्या अर्थाने आकार घेतोय. केवळ संसाधनांची कमतरता प्रगती रोखू शकत नाही, हे रवी टमटाने जगाला दाखवून दिलं आहे






