हा पोरगा म्हणतोय मी मंगळावरून आलोय...नक्की काय आहे भानगड ??
हॉलिवूड सिनेमे बघता ना मंडळी? त्यात एखादा एलियन दुसऱ्याच ग्रहावरून आपल्या पृथ्वीवर येतो आणि हल्ला करतो. मग आपले हिरो त्या हल्ल्यापासून पृथ्वीला वाचवतात वगैरे टाईपच्या बऱ्याच स्टोऱ्या बघितल्या असतील. ते सोडा, बॉलिवूड मधला पीके सिनेमा आठवतो? त्यातही आमिर खान हा परग्रहावरून आलेला एलियन दाखवलाय. तोच तो, “हमारे गोले पे कोई झूठ नहीं बोलता। तुम्हारे अर्थ की लुल्ली बजी हुई है।” म्हणणारा पीके!
खरंच हे शक्य असतं का मंडळी? म्हणजे या सिनेमांना कल्पनाविलास म्हणून सोडून द्यायचं की दुसऱ्या ग्रहावर पण माणसे असतील असं गृहीत धरायचं? हम तो कन्फ्युजिया गया हूँ। आता हेच बघा ना, मंगळ ग्रहावर जीवन आहे की नाही याबाबत अजूनही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कुणी म्हणतं तिथे जीवन आहे तर कुणी म्हणतं तिथे सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण अजिबात नाही! आणि समजा, एखाद्याने असा दावा केला की, तो मंगळावरून पृथ्वीवर आला आहे… ते सुद्धा कशासाठी? तर पृथ्वीला वाचवण्यासाठी! तर ???
काय म्हणाल? असेल कुणीतरी वेडा? नाही मंडळी नाही. तो कुणी वेडा नाही. भल्या भल्या शास्त्रज्ञांना त्याने चक्रावून सोडलंय…
चला तर मग जाणून घेऊया तो कोण आहे आणि त्याचं काय म्हणणं आहे…
रशियाच्या वॊल्गोग्राड शहरात राहणाऱ्या 21 वर्षीय ‘बोरीस्का क्रिप्रियानोविच’ नावाच्या मुलाचा दावा आहे की तो मंगळ ग्रहवासी आहे आणि या जन्मी पृथ्वीला वाचवण्यासाठी त्याने पृथ्वीवर जन्म घेतला आहे. आता दुसरा कुणी हे म्हणाला असता तर त्याची रवानगी वेड्याच्या इस्पितळात झाली असती. पण बोरीस्काचे बोलणे अनेकांनी गंभीरपणे घेतले आहे कारण त्याची अलौलीक प्रतिभा, जी सर्वांनाच तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. त्याचे एकूणच पृथ्वी आणि अंतरीक्षाविषयी ज्ञान इतके अफाट आहे की कित्येक वर्षे अंतरीक्षाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना सुद्धा ते नाही. विशेष म्हणजे त्याला हे कुणी शिकवलं नाही बरं! हे ज्ञान त्याला उपजतच आहे असे तो म्हणतो.
बोरीस्काची आई डॉक्टर आहे. तिच्या सांगण्यानुसार अगदी लहानपणासूनच लेकराचे पाय पाळण्यात दिसू लागले होते. इथे खरं तर पायाऐवजी मान हा शब्द वापरायला हवाय मंडळी… कारण जन्मल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यात त्याची मान व्यवस्थित धरली होती आणि कुठलाही आधार न घेता तो मान उचलून इकडे तिकडे निरीक्षण करू शकत होता. आता बोला! बरं, एवढेच नव्हे तर दोनच वर्षाचा होईपर्यंत तो लिहायला, वाचायला आणि चित्रे काढायला शिकला होता. आणि चित्रेही कोणती? तर अंतरीक्षाची आणि त्यात घडणाऱ्या विविध घडामोडींची!
जेव्हा तो बोलायला लागला आणि पालकांसोबत डायरेक्ट मंगळ ग्रहाच्या गोष्टी करू लागला तेव्हा त्यांना जाणवलं की हे पाणी काहीतरी वेगळंच आहे. कारण तोपर्यंत त्यांनी त्याच्यासमोर मंगळ ग्रहाची चर्चाच काय, पण मंगळ ग्रहाचे नाव सुद्धा घेतले नव्हते.
त्याची आई म्हणते,
“हे ज्ञान त्याला कुणी शिकवलं नव्हतं. कधी कधी तो आमच्यासमोर मांडी घालून बसायचा आणि एखाद्या शास्त्रज्ञाच्या थाटात मंगळ ग्रहाविषयी, अंतरीक्षाविषयी आणि त्यातल्या अनेक मानव सभ्यतांविषयी माहिती सांगायचा तेव्हा आम्ही आश्चर्यचकित होत असू.”
नंतर बोरीस्काने स्वतः उघड केले की तो मंगळ ग्रहावरून आलेला आहे. त्याचा पूर्वीचा जन्म मंगळावरचा होता आणि तिथे झालेल्या आण्विक युद्धामुळे त्या ग्रहावरचे जैविक वातावरण नष्ट झाले. आता पृथ्वीवरही हेच घडणार आहे, आणि ते थांबवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. एका इंटरव्ह्यू मध्ये त्याने असंही म्हंटलंय की,
“मला मरणाची भीती नाही, कारण आम्ही अमर असतो. माझ्यासारखे अनेक लोक या जगात कुठे ना कुठे राहत आहेत.”
बोरीस्काने मंगळ ग्रहाविषयी आणखी बरीच माहिती सांगितली आहे. जसे की, एकेकाळी मंगळ हा सर्वांगसुंदर आणि राहण्यायोग्य ग्रह होता. पण तिथे झालेल्या थर्मोन्यूक्लिअर वॉर मुळे सगळी उलटापालट झाली. तिथली माणसे 7 फुटापर्यंत उंच असतात आणि जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. काही माणसे अजूनही मंगळ ग्रहावर बंकर मध्ये राहत असून कधी कधी ती पृथ्वीवर फेरफटका मारण्यासाठी येत असतात. बोरीस्काच्या दाव्यानुसार इजिप्त येथील गाझाच्या पिरॅमिड्स मध्ये अनेक रहस्ये लपलेली आहेत. जर ती रहस्ये शोधून काढली तर पृथ्वीचा विनाश होणे टाळता येण्यासारखे आहे.
तर मंडळी, आता बोरीस्काच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा ते आपणच ठरवायचं आहे. तसं पाहता त्याच्या बोलण्यात थोडंफार तथ्यही आहेच म्हणा… कारण कुठलेही आण्विक युद्ध झाले तर विनाश हा अटळच आहे. बाकी सत्य शास्त्रज्ञ शोधून काढतीलच… तुम्ही मात्र ही माहिती कशी वाटली ते कमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि हो, शेअर करायला विसरू नका.
लेखक : अनुप कुलकर्णी
आणखी वाचा :
मंगळावर पहिल्यांदा पाऊल टाकणार भारतीय महिला !!!
काय सांगता ? पृथ्वीवर चक्क माणूसच एलियन आहे ??
विशाखापट्टणम मध्ये दिसलेले हे दोन एलियन आहेत तरी कोण ? वाचा या व्हिडीओ मागील सत्य !!
आपला मित्र एलियन असल्याच्या संशयावरून या तरुणाने काय केलं बघा !!