घोड्याच्या पायाला बोटे का नसतात ? काय आहे उत्तर ?
मंडळी, मोठमोठ्या गोष्टीकडे बघताना लहानसहान गोष्टी दुर्लक्षित होतात. आता घोड्याचंच घ्या. घोडा हा इतिहासातला महत्वाचा प्राणी. आपल्यातल्या बर्याचजणांनी घोड्यावर रपेट मारली असेल, घोड्याची नाल दारावर लावली असेल, पण तुम्ही कधी घोड्याच्या पायांकडे बघितलं आहे का ? तिथे बोटे का नसतात ? एकच एक मोठं अर्धगोल बोट आपल्याला दिसतं. तसं पाहायला गेलं तर ही खूपच साधी गोष्ट आहे, पण तितकीच महत्वाची आहे. चला तर आज जाणून घेऊया घोड्याची बोटे गेली तरी कुठे !!
मंडळी, घोड्याच्या बोटांचा तपास घेण्यासाठी आपल्याला साधारण करोडो वर्ष मागे जावं लागेल. घोड्याचा एक पूर्वज होता. त्याचं नाव हायराकोथेरीयम. हायराकोथेरीयम हा साधारण कुत्र्याच्या आकाराचा प्राणी होता. त्याच्या पुढच्या पायांना ४ बोटे होती तर मागच्या पायांना ३ बोटे होती.
त्यावेळी पृथ्वीचं तापमान उबदार होतं. अशा वातावरणात जंगलांची चांगली वाढ झालेली होती. सगळीकडे मोठमोठी झाडी होती. अशा वातावरणात हायराकोथेरीयम अनेक वर्षांपासून राहत होता. दाट झाडांमुळे त्याला अन्न आणि शत्रूंपासून संरक्षण मिळायचं.
पुढच्या काळात म्हणजे आजपासून ३.५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचं तापमान बदललं. हे तापमान आजच्या सारखं होतं. पृथ्वीवरचं जंगली भाग कमी झाला. जंगल कमी झालं म्हणून हायराकोथेरीयम प्राणी नष्ट झाला. पण तोवर घोड्याचे इतर पूर्वज आले होते. त्यातलाच एक होता पॅराहिपस. हा प्राणी काहीसा जर्मन शेफर्ड सारखा दिसायचा. त्याच्या पायाला ३ बोटे होती.
जंगल कमी झाले तसा पॅराहिपस सपाट मैदानी भागात आला होता. मैदानी भागात गवत उगत असल्याने त्याचं अन्न बदललं. पण तो झाडाची पाने आणि गवत असं दोन्ही खायचा. हे समजून घेण्याचं कारण म्हणजे इथून पुढे आजचा घोडा तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते.
मैदानी भागात आल्याने शत्रूपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास वेगाने पळणे हाच एक मार्ग राहिला होता. त्याप्रमाणे पॅराहिपसच्या शरीरात बदल होत गेले. पायांची रचना बदलली आणि उर्जा साठवण्याची गरज पण वाढली. गवतातून धावण्या इतकी उर्जा मिळत नाही, पण आकाराने मोठ्या असलेल्या प्राण्यांना उर्जा साठवता येते. परिणामी पॅराहिपसच्या शरीराचा आकार वाढला. अशा पद्धतीने उत्क्रांत होत आजचा घोडा तयार झाला आहे.
पायाचं काय ?
मंडळी, आम्ही एवढं सगळं ऐकवलं मग मुद्द्याचं कधी बोलणार असा प्रश्न पडला ना ? आपण आता मुद्द्यावरच येत आहोत. हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात ५ कोटी वर्षापूर्वीच्या घोड्यांच्या पायाच्या हाडांचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास अगदी हायराकोथेरीयम पासूनच्या सर्व पिढ्यांचा होता. या अभ्यासात असं आढळलं की घोड्याच्या शरीराचा आकार वाढला तसतसा त्याच्या ३ बोटांमध्ये बदल होत गेला. सगळा भार हा मधल्या बोटावर आला. या कारणाने मधल्या बोटाचा आकार वाढला. पुढे जाऊन अशी परिस्थिती निर्माण झाली की बाजूची २ बोटे अडथळा निर्माण करू लागली.
तर, बोटं नाहीशी होण्याचं हे एक कारण झालं. दुसरं कारण थोडं वेगळं आहे. कुत्रा किंवा मांजरीचा पायाचा तळवा बघितला तर आपल्याला मऊ भाग दिसतो, पण हा भाग घोड्याच्या पायांना नसतो. घोड्याला दुडक्या चालीने धावण्यासाठी हा मऊ भाग नाहीसा झालेला आहे. आणि बोटे नाहीशी झाल्याशिवाय हा भाग नष्ट होणे शक्यच नव्हतं.
मंडळी, उत्क्रांतीत घोड्याची पुढची बोटे नाहीशी झाली असली तरी मागच्या बाजूला अजूनही बोटे असल्याच्या खुणा दिसतात. हा भाग केसांनी वेढलेला असतो.
राव, अजूनही उत्क्रांती थांबलेली नाही. विज्ञानाच्या मते काही दिवसात मागची बोटे पण नाहीशी होऊ शकतात.
मंडळी, एकंदरीत घोड्याची ओळख असलेला त्याचा वेग उत्क्रांत होण्याची ही प्रक्रिया आहे.
आणखी वाचा :
रेसच्या लंगड्या घोड्यांना मारून का टाकलं जातं ??
झाशीच्या राणीचा घोडा हवेत उधळलेला, तर शिवाजीमहाराजांच्या घोडयाचा पाय दुमडलेला का असतो?