computer

थोडी महाग आहे, पण ही 'स्पेसलँडर' सायकल हवी आहे का?

जर तुम्ही पट्टीचे सायकलस्वार असाल तर या सायकलचे डिझाइन बघून प्रेमातच पडाल. पण तुम्हाला माहिती आहेच की एखाद्या वस्तूच्या प्रेमात पडणं म्हणजे खिसा रिकामा होण्याची वेळ येते. पण त्याचे कारण आम्ही शेवटी सांगतो. आधी या सायकलचा इतिहास वाचूया.
ही सायकल बेंजामीन बॉडेन नावाच्या डिझायनरने १९४६ साली 'ब्रिटन कॅन मेक इट' या प्रदर्शनासाठी बनवली होती. 'स्पेसलँडर' नावाने आलेली ही सायकल बरीच लोकप्रियही झाली होती.
 

पण १९४६ म्हणजे दुसरे महायुध्द नुकतेच संपल्याचा काळ होता. ब्रिटनमध्ये आर्थिक बळ शिल्लक नव्हते म्हणून बेंजामीन अमेरिकेत गेला. तिकडे अनेकांनी या सायकलची बॉडी अल्युमिनियमऐवजी फायबरग्लासमध्ये बनवण्याचा सल्ला दिला. आणखी काही बदल घडवून  ही सायकल बाजारात येण्यास १९६० साल उजाडले. पाच वेगवेगळ्या रंगात ही स्पेसलँडर सायकल उपलब्ध झाली. जाहिरातीची धमाल झाली,  पण  सायकलीचा हवा तसा खप झाला नाही. त्यावेळी ही सायकल ९० डॉलरच्या आसपास म्हणजे महागच होती. शेवटी जेमतेम ५२२ सायकली विकल्यावर हे मॉडेल बाजाराच्या बाहेरच फेकले गेले.

आता या सायकलीच्या प्रेमात पडणे म्हणजे खिशाला भोक पाडून घेण्यासारखे का आहे ते समजून घ्या. एकदा बाजारातून नाहीशी झाल्यावर ही सायकल 'कलेक्टर आयटम' म्हणजे हौशीपोटी विकत घेणार्‍यांच्या बाजारात गेली. काही दिवसांपूर्वीच एका लिलावात ही सायकल ७००० डॉलरला विकली गेली. म्हणजे ५,२५,००० रुपयात विकली गेली. जाऊ द्या. इतक्या रुपयांत आपल्याकडे चारचाकी गाडी येते असं म्हणायचं आणि गप्प बसायचं! 

आता जी आवडती वस्तू आपल्याला मिळत नाही तिचे फोटो आपण आठवणीने बघून समाधान मानतोच की नाही? तर , बघूया स्पेसलँडरचे आणखी काही फोटो!!
 

सायकलींच्या एका म्युझियममध्ये काही अजूनही बघायला मिळतात

स्पेसलँडरची जुनी जाहिरात..

आणखी एक जाहिरात!

सबस्क्राईब करा

* indicates required