'पटकथा' गदिमांच्या जन्माची- जन्मताच मृत घोषित करण्यात आलेल्या या अर्भकानं मराठी साहित्यात एक नवा इतिहास रचला..

लेखक- सुमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू)
आज १ ऑक्टोबर २०१७,गदिमांची ९८वी जयंती. गदिमांना जन्मताच मृत घोषित करण्यात आले होते. लहान मूल असल्यामुळे दफनासाठी खड्डाही खोदण्यात आला,पण सर्वात वर बसलेल्या पटकथाकाराची 'पटकथा' सुरु होण्याआधीच संपेल कशी! गदिमांच्या जन्माची रंजक कथा....
आपल्या हिंदू संस्कृतीत 'व्दिज' (दोन जन्म) ही संकल्पना आहे.आपण प्रथम मातेच्या पोटातून गर्भअवस्थेतून जेव्हा बाहेर येतो तो आपला पहिला जन्म,पुढे वर्णानुसार माणूस जेव्हा ज्ञान,शिक्षण,संस्कार प्राप्त करतो व आपल्या आत्म्याची खरी ओळख करुन घेतो तो त्याचा दुसरा जन्म मानला जातो म्हणून आपण 'व्दिज'. गदिमा स्व:ताला 'त्रिज' म्हणायचे कारण त्यांचा तीनदा जन्म झाला होता!.
त्यावेळचा सातारा तर आत्ताच्या सांगली जिल्हातले 'शेटफळ' हे गदिमांचे आजोळ. हे गाव गायकवाडांचे,अस्सल मराठी वस्ती. गदिमांचे आजोबा (आईचे वडील) त्या गावचे कुळकर्णी.
गदिमांच्या आधी सर्वात मोठी बहिण,नंतर झालेला मुलगा पाळण्यातच वारला त्यामुळे गदिमांच्या आईने नुसती खडी साखर खाऊन सोळा सोमवार केले,मुलगा झाला पण तो जन्मताच मेलेला....
'१ ऑक्टोबर १९१९' हवा बिघडलेली होती,जोरात पाऊस पडत होता. माणदेशात पाऊस दुर्मिळ तिथे अशी कथा प्रचलित आहे की 'राम-लक्ष्मण-सीता' वनवासात असताना तिथे आले होते व झाडाखाली जेवायला बसले. तितक्यात पाऊस आला,रामाला राग आला व त्याने जो बाण मारला त्यानंतर माणदेशात जो पाऊस गायब झाला आहे तो आजगायत! लाडकी लेक 'बनूताई' प्रसूती वेदना सोसत होती, बाहेर चिंताक्रांत वडिल (गदिमांचे आजोबा) फेर्या मारत होते,त्या काळात प्रसुती घरातच होत असत व हे काम बेमालूमपणे सुईणी किंवा गावातली जाणती स्त्री करत असे.
प्रसूती करणारी प्रौढ स्त्री बाहेर आली,कोणीतरी अधिरपणे विचारले...
"काय झालं?"
"झालं,पण देवाने दिलं ते कर्मानं नेलं!."
"व्यंकोबाची मर्जी" असे म्हणत गदिमांचे आजोबा उठले.
"बाळंतिणीला सांभाळा,तो मासांचा गोळा परसदारी निजवून टाका..".
परसदारी खोरी-कुदळी वाजायला लागल्या,खड्डा तयार होऊ लागला. आईला अजून पूर्ण जाग आली नव्हती. इकडे मात्र म्हातारी सुईण मात्र चिंताक्रांत झाली होती. बाजेवरचे पोर तासाभरात मातीखाली दडपले जाणार होते. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने शेगडीसाठी केलेला विस्तव तव्यावर घेतला आणि बाळाच्या बेंबीजवळ नेला,आणि काय आश्चर्य बाळाने टाहो फोडला "कोहम कोहम...."
"मूल जिवंत आहे......मूल जिवंत आहे...."
सगळी कडे आरडाओरडा झाला,गावभर आरोळी उठली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. दफनासाठी खणलेला खड्डा धरणीला आस लागू नये म्हणून जिंवंत कोंबडयाने बुजवण्यात आला,आणि गदिमांचा पुनर्जन्म झाला...गदिमा 'त्रिज' झाले... "गजाननाची" पटकथा आत्ता तर सुरु झाली होती....कारण पुढे एक महाकवी जन्माला येणार होता!.

गदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक पानेसुध्दा पुरणार नाहीत असे अष्टपैलू व्यक्तीमत्व. "ज्योतीने तेजाची आरती" या उक्तीनुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...
महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक,कलाकार,मराठी माणूस.. ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो. जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा'. अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर!.
गदिमांचा जन्म 'शेटफळे' या त्यांच्या आजोळी झाला, तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीमध्ये 'माडगुळे' या गावात गेले. गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते. वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुरवातीला 'ब्रम्हचारी','ब्रँडीची बाटली' सारख्या काही चित्रपटात सहाय्यक नटाच्या (Extra Artist) भूमिका केल्या. भक्त दामाजी (१९४२) व पहिला पाळणा (१९४२) चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. लोकशाहीर रामजोशी(१९४७) चित्रपटापासून खर्या अर्थाने 'कथा,पटकथा,संवाद,गीते ग.दि.माडगूळकर' असा ब्रॅंड निर्माण झाला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत 'अनभिषक्त सम्राटपद' निर्माण केले. मराठी चित्रपटात 'कथाकार', 'पटकथाकार', 'संवादलेखक', 'गीतकार', 'अभिनेता','निर्माता' अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला.
मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रामजोशी','वंदे मातरम, 'पुढचे पाऊल','गुळाचा गणपती','लाखाची गोष्ट', 'पेडगावचे शहाणे','ऊनपाऊस', 'सुवासिनी','जगाच्या पाठीवर','प्रपंच', 'मुंबईचा जावई','देवबाप्पा' सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता. गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.
मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान अजोड आहे. त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. प्राचीन मराठी काव्याला अर्वाचीन काळात गदिमांनी अधिक समृद्ध केले. संतकाव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांचा स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील मनाला भिडणारा लयताल,शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून गदिमांची गीते निर्माण झाली.

गदिमांच्या नुसत्या गीतांचा आढावा घ्यायचा झाला तर ...
'गोरी गोरी पान','एका तळ्यात होती बदके पिले सुरेख','मामाच्या गावाला जाऊया' सारखी पार लहान मुलांच्या तोंडी असणार्या गीतांपासून ते अगदी गणपतीत हक्काचे स्थान मिळवून असलेल्या 'नाच रे मोरा' या सारख्या अनेक बालगीतांचा समावेश होतो. चित्रपट गीते म्हटली तर 'एक धागा सुखाचा', 'जग हे बंदीशाळा', 'या चिमण्यांनो परत फिरा रे', 'राजहंस सांगतो', 'घन घन माला नभी दाटल्या', 'बुगडी माझी सांडली ग', 'फड सांभाळ तुर्याला आला', 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी', 'विठ्ठला तू वेडा कुंभार' यासारखी हजारो गीते गदिमांनी लिहिली. 'माझा होशील का?' सारखे गाणे तर अगदी दक्षिण भारतापर्यंत गाजले. सुप्रसिध्द अभिनेत्री वैजयंती माला यांचे ते आवडते गीत झाले होते!
हिंदी चित्रपटसृष्टीतही २५ पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला. व्ही.शांताराम यांचा 'दो आंखे बारह हाथ', 'नवरंग', 'गूंज ऊठी शहनाई', 'तूफान और दिया' हे चित्रपट गदिमांचेच! अगदी गुरुदत्तच्या 'प्यासाची मूळ कथा असो, राजेश खन्नाचा 'अवतार' असो वा अलिकडचा अमिताभ बच्चनचा 'ब्लॅक'.. मूळ संकल्पना गदिमांच्याच लेखणीतून ऊतरलेली होती. हिंदीतल्या अनेक चित्रपटांना गदिमांच्या कथेचा आधार घ्यावा लागला होता-आहे. सुप्रसिध्द पटकथाकार व गीतकार 'गुलजार' गदिमांबद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की 'मला ग.दि.माडगूळकर म्हणण्यापेक्षा 'गदिमा' हेच नाव जास्त आवडतं, कारण गदिमा म्हटलं की ते मला "मॉं की गोदी मे" सारखं वाटतं!!
मराठी साहित्यात गदिमांनी कवी,कथालेखक,कादंबरीकार,नाटककार,संपादक अशा सर्व क्षेत्रात वावर केला. आरंभी वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम केले. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची 'सुगंधी-वीणा' 'जोगिया', 'चार संगीतिका', 'गीतरामायण', 'काव्यकथा', 'चैत्रबन', 'गीतगोपाल', 'गीतसौभद्र' अशी काव्यनिर्मिती झाली. गदिमांच्या निधनानंतर अलिकडच्या काळात 'वैशाखी', 'पूरिया', 'अजून गदिमा', 'नाच रे मोरा' असे काव्य-चित्रपटगीत-बालगीत संग्रह संकलीत करण्यात आले आहेत.
याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङमय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. 'लपलेले ओघ', 'बांधावरल्या बाभळी', 'कृष्णाची करंगळी', 'बोलका शंख', 'वेग आणि इतर कथा', 'थोरली पाती', 'तुपाचा नंदादीप', 'चंदनी उदबत्ती', 'भाताचे फूल', 'सोने आणि माती', 'तीन चित्रकथा', 'कलावंताचे आनंद पर्यटन (प्रवासवर्णन)', 'तीळ आणि तांदूळ' सारखे लघुकथा संग्रह, 'वाटेवरल्या सावल्या','मंतरलेले दिवस' आत्मचरित्रपर लिखाण, 'दे टाळी ग घे टाळी', 'मिनी', 'शशांक मंजिरी', 'नाच रे मोरा' सारखे बालवाङमय, 'तुलसी रामायण' (गद्य भाषांतर) व 'शब्दरंजन', 'अक्षर', 'धरती' सारख्या मासिकांचे संपादन,'आकाशाची फळे', 'ऊभे धागे आडवे धागे' सारख्या कादंबर्या,'युध्दाच्या सावल्या', 'परचक्र' सारखी नाटके. अशी जवळजवळ ३७ पुस्तके गदिमांच्या नावावर आहेत. प्रत्येक चित्रपटाची कथा ही कादंबरीच असते. गदिमांनी अशा १५७ पटकथा लिहिल्या. त्यांची जर पुस्तके काढली तर गदिमांच्या नावावर २०० पेक्षा जास्त साहित्यकृती जमा होतील!

गदिमांनी स्वातंत्रलढयातही भाग घेतला होता. खूप मोठया कुटुंबाची जबाबदारी,त्यात अठराविश्वे दारिद्र्य, यामुळे गदिमांनी स्वातंत्रलढयात प्रत्यक्ष उडी न घेता शाहिरी कवने, पोवाडे लिहून जनजागृती केली. सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी शाहिर निकमांसारख्यांनी त्याकाळात गदिमांची कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्यात रान ऊठवले होते.
गदिमांनी राजकारणासारख्या कोरडया क्षेत्रातही मुक्त वावर केला. ते साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून जवळजवळ १२ वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करणार असायचे, तेव्हा ते ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक आमदार खास त्याचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत असत. गदिमांनी स्वातंत्र चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे त्यांची नाळ त्या वेळच्या कॉंग्रेस पक्षाशी जोडलेली होती. तरीपण त्यांच्या मित्र-परिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता. अगदी स्व.यशवंतरावजी चव्हाण असोत, शरदरावजी पवार असोत किंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत... सर्वांनाच ते आपले वाटायचे. स.गो.बर्वे, सुशीलकुमार शिंदे, राम नाईक, मनोहर जोशी... सर्वच त्यांच्या परिवाराचेच सदस्य होते.
गदिमांना 'महाकवी' व 'आधुनिक वाल्मिकी' ही पदवी ज्याच्यामुळे प्राप्त झाली ते महाकाव्य गीतरामायण. 'गीत रामायण' हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला. १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केंद्र सुरु झाले. श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते. नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला. रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे. गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे. गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलगु, मल्याळी, संस्कृत,कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. गदिमांनी श्रीकृष्ण चरित्रावर लिहिलेले 'गीतगोपालही' गीतरामयणाच्या तोडीस तोड आहे.

पुरस्काराच्या बाबतीत तर गदिमांची 'देता घेशील किती दोन करांनी तू' अशी अवस्था व्हायची. गदिमांना भारत सरकारने 'पद्मश्री' (१९६९) हा किताब बहाल केला. ते 'संगीत नाटक अकादमी' व 'विष्णुदास भावे सुवर्णपदक' या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९६९ ला ग्वाल्हेरला झालेल्या 'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे' अध्यक्षपद, १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे' ते अध्यक्ष होते. त्यांच्या अनेक चित्रपटांना कथा,पटकथा,संवाद,गीते लेखनासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले. अनेक पुस्तकांना राज्य व क्रेंद्र शासनाचे पुरस्कार लाभले.
१४ डिसेंबर १९७७ म्हणजे मृत्यूच्या पराभवाचा दिवस. कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह. इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल. स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते. अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत, कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते.
पु.ल.देशपांडे गदिमा पुरस्कार घेताना म्हणाले होते की "आपल्या मनात जेथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तेथे गदिमांचे स्थान आहे.".
गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून,साहित्यातून,चित्रपटातून,गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत.
...सुमित्र माडगूळकर (गदिमांचे नातू)
FB,Whatsapp वर Share करताय?,जरुर करा,पण लेखकाचे नाव काढून नको.. ही विनंती!.
https://www.facebook.com/sumitr.madgulkar
https://www.gadima.com/
https://www.facebook.com/gdmadgulkar