१८६१ मध्ये एका ब्रिटीश धर्मप्रचारकाला केवळ एका नाटकाचा इंग्रजी अनुवाद केल्याबद्दल १,००० रुपये दंड आणि एक महिना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ही शिक्षा झाली होती रेव्हरंड जेम्स लॉन्ग यांना, आणि ते नाटक होतं दीनबंधू मित्रा यांचं 'निल दर्पण'. एका नाटकाने एका बलाढ्य साम्राज्याला इतकं हादरवून सोडलं की, त्यांना थेट अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला घालणारा कायदा करावा लागला.
आजच्या डिजिटल युगात जेव्हा आपण सेन्सॉरशिप आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्बंधांवर चर्चा करतो, तेव्हा १८७६ च्या 'ड्रॅमॅटिक परफॉर्मन्सेस ॲक्ट'ची मुळं याच नाटकात दडलेली आहेत हे विसरून चालणार नाही. 'निल दर्पण' हे केवळ एक नाटक नव्हतं, तर तो निळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या रक्ताचा आणि अश्रूंचा दस्तऐवज होता.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात बंगालमधील शेतकरी एका भयानक चक्रव्यूहात अडकले होते. ब्रिटीश व्यापारी निळीच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार करत होते. तांदूळ पिकवणाऱ्या जमिनीत जबरदस्तीने निळ पेरण्यास भाग पाडलं जायचं. याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल पाहून दीनबंधू मित्रा यांचं मन विदीर्ण झालं आणि त्यांनी १८६० मध्ये 'निल दर्पण' हे नाटक लिहिलं.
या नाटकाने बंगालमध्ये क्रांतीची ठिणगी टाकली. नाटकातलं 'गोलक बसू' आणि 'नोबिन माधव' ही पात्रं घराघरात पोहोचली. निळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, महिलांवर होणारे अत्याचार आणि ब्रिटीश न्यायव्यवस्थेचा फोलपणा या नाटकाने चव्हाट्यावर आणला. हे नाटक जेव्हा पहिल्यांदा रंगमंचावर आलं, तेव्हा प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.असं सांगीतलं जातं की या नाटकाचा रंगमंचावर प्रयोग चालू असताना त्या नाटकातल्या ब्रिटीश अधिकाऱ्याचा प्रवेश बघताना ईश्वरचंद्र विद्यासागर यांना इतका संताप आला की हे केवळ नाटक आहे हे विसरून त्यांनी पायातला जोडा रंगमंचावर भिरकावला.
या नाटकाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की, रेव्हरंड जेम्स लॉन्ग या धर्मप्रचारकाला ते इंग्रजीत अनुवादित करण्याचा मोह आवरला नाही. त्यांना वाटलं की, जर हे नाटक इंग्रजी भाषेत आलं, तर इंग्लंडमधील सुसंस्कृत जनतेला भारतात काय चाललंय याची जाणीव होईल. त्यांनी मायकल मधुसूदन दत्त यांच्या मदतीने या नाटकाचा 'Indigo Planting Mirror' या नावाने अनुवाद केला.
हा अनुवाद प्रसिद्ध होताच ब्रिटीश प्रशासनात खळबळ माजली. निळीचे मळेवाले (Planters) संतापले. त्यांनी जेम्स लॉन्ग यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरला. न्यायाधीशांनी लॉन्ग यांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कालीप्रसन्न सिंहा या भारतीय समाजसुधारकाने लॉन्ग यांचा १,००० रुपयांचा दंड जागेवरच भरला.
या घटनेमुळे 'निल दर्पण'ची चर्चा सातासमुद्रापार पोहोचली. युरोपात या नाटकाची दखल घेतली गेली आणि ब्रिटीश सरकारवर दबाव वाढला. अखेर १८६० मध्ये 'इंडिगो कमिशन' (Indigo Commission) स्थापन करण्यात आलं. या कमिशनसमोर अनेक शेतकऱ्यांनी साक्ष दिली. या साक्षीतून समोर आलेलं सत्य इतकं भीषण होतं की, कमिशनला मान्य करावं लागलं की निळीची शेती ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची नसून ती एक जुलूमशाही आहे.
ब्रिटीशांना एका गोष्टीची खात्री पटली होती की, भारतीय रंगभूमी ही त्यांच्या सत्तेसाठी सर्वात मोठा धोका आहे. वृत्तपत्रांपेक्षाही नाटकांचा प्रभाव सामान्य जनतेवर जास्त पडत होता. कारण नाटक हे साक्षर आणि निरक्षर अशा दोन्ही वर्गांपर्यंत पोहोचत होतं. या नाटकाने दिलेला धक्का इतका मोठा होता की, पुढच्या १५ वर्षात ब्रिटीश सरकारने नाटकांवर नियंत्रण मिळवण्याची तयारी सुरू केली.
'निल दर्पण'ने ब्रिटीश कायद्याच्या पुस्तकात एका काळ्या कायद्याची भर घातली. १८७६ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक यांनी 'Dramatic Performances Act' (नाट्य प्रयोग नियंत्रण कायदा) लागू केला. या कायद्यानुसार, कोणत्याही नाटकाचा प्रयोग करण्यापूर्वी पोलिसांची किंवा प्रशासनाची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं. जर नाटक 'राजद्रोही' किंवा 'अश्लील' वाटलं, तर त्यावर बंदी घालण्याचे अधिकार सरकारला मिळाले.
हा कायदा म्हणजे भारतीय कलाकारांच्या तोंडाला लावलेलं कुलूप होतं.कलेचा आवाज कधीच दाबता येत नाही. 'निल दर्पण'नंतर अनेक नाटकांनी छुप्या पद्धतीने ब्रिटीश सत्तेवर टीका करणं सुरूच ठेवलं. ऐतिहासिक आणि पौराणिक कथांच्या आडोशाने ब्रिटीशांविरुद्ध जनमत तयार करण्याचं काम मराठी आणि बंगाली रंगभूमीने समर्थपणे पेललं.
आजही 'निल दर्पण'चं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही जेव्हा जेव्हा सत्तेकडून कलेवर निर्बंध आणले जातात, तेव्हा १८७६ च्या त्या काळ्या कायद्याची आठवण येते. 'निल दर्पण' हे केवळ निळीच्या शेतकऱ्यांचं दुःख नव्हतं, तर ते भारतीय रंगभूमीचं पहिलं 'राजकीय' बंड होतं.त्या काळात बंगालमधील निळीच्या मळ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. शेतकऱ्यांनी संघटित होऊन निळ पिकवण्यास नकार दिला. हा भारताच्या पहिल्या मोठ्या शेतकरी आंदोलनाचा विजय होता. आणि या विजयाचा पाया एका नाटकाने रचला होता, ही गोष्ट आजही थक्क करणारी आहे.
एका अनुवादकाने एका साम्राज्याला कायदे बदलायला भाग पाडलं,हे जागतिक इतिहासातलं दुर्मिळ उदाहरण आहे. दीनबंधू मित्रा यांनी पाहिलेलं ते स्वप्न आणि जेम्स लॉन्ग यांनी सोसलेला तुरुंगवास आजही आपल्याला एकच गोष्ट सांगतो - सत्य जेव्हा रंगमंचावर येतं, तेव्हा सिंहासनांना तडे जातातच.आजच्या काळात 'निल दर्पण'सारखं एखादं नाटक समाजातील अन्यायाविरुद्ध इतकी मोठी क्रांती घडवू शकतं का? की आजची कला केवळ मनोरंजनापुरतीच मर्यादित उरली आहे?
लेखक :रामदास
(हा लेख पुण्यनगरी वृत्तपत्रात काल म्हणजे २५ जुलै रोजीप्रकाशित करण्यात आला होता.)






