मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जठराची शस्त्रक्रिया केली की डायबेटिस बरा होतो का?

5 मिनिट वाचन

वजन कमी होण्याआधीच रक्तातील साखर कशी नियंत्रणात येते? जाणून घ्या रू-एन-वाय गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियेमागील हार्मोनल विज्ञान.

शेअर करा:
जठराची शस्त्रक्रिया केली की डायबेटिस बरा होतो का?

जठराचा काही भाग वेगळा केला तर डायबेटिस जातो का ?हे वाचल्यावर बुचकळ्यात पडल्यासारखं वाटतं हे खरंच आहे पण हे खरं आहे.
या शस्त्रक्रियेला Roux-en-Y gastric bypass असं म्हणतात. पण लक्षात घ्या हा विषय केवळ दोन ओळीत समजण्यासारखा नाही. आता सविस्तरपणे समजून घेऊ या !

कल्पना करा... एखादा रुग्ण अनेक वर्षांपासून टाइप-२ डायबेटीसशी झुंज देतोआहे. गोळ्या सुरू आहेत. इन्शुलीन घेतो आहे.आहारावर बंधनं आहेत. रक्तातल्या साखरेचे आकडे वर-खाली होत आहेत. अशावेळी काही डॉक्टर अखेर एक शस्त्रक्रिया सुचवतात—Roux-en-Y gastric bypass. ती शस्त्रक्रिया होते.
आणि आश्चर्य म्हणजे, वजन कमी होण्याची वाट न पाहताच रक्तातील साखर खाली येऊ लागते! ही काही जादू नाही. पण शरीरशास्त्राच्या दृष्टीने हा नक्कीच एक विलक्षण धडा आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की गॅस्ट्रिक बायपास केल्यानंतर टाइप-२ डायबेटीसमध्ये सुधारणासुरू होऊ शकते.

मग नेमके घडते तरी काय? जठर छोटे होते; पण बदल आतड्यांत होतो!
गॅस्ट्रिक बायपासमध्ये जठराचा मोठा भाग अन्नाच्या नेहमीच्या मार्गातून बाजूला केला जातो आणि जठराचा छोटासा भाग आतड्याच्या पुढील भागाशी जोडला जातो. त्यामुळे केवळ पोटाची क्षमता कमी होत नाही; अन्न आतड्यांपर्यंत पोहोचण्याची पद्धतच बदलते.

आणि इथे सुरू होते खरी कहाणी. आपलं आतडं फक्त अन्न शोषून घेणारी नळी नाही. ते एक प्रकारचे हार्मोनल कमांड सेंटर आहे.
अन्न आतड्यात पोहोचल्यानंतर GLP-1, GIP, PYY यांसारखे हार्मोन्स स्रवतात. यातील GLP-1 विशेष महत्त्वाचा आहे. तो स्वादुपिंडाला गरजेनुसार इन्सुलिन सोडण्यास मदत करतो आणि रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण सुधारतो.
गॅस्ट्रिक बायपासनंतर या हार्मोनल प्रतिसादात लक्षणीय बदल होऊ शकतात.संशोधनात बायपास शस्त्रक्रियेनंतर जेवणानंतरचा GLP-1 प्रतिसाद वाढल्याचे आणि ग्लुकोज नियंत्रण सुधारल्याचे आढळले आहे.

मग वजन कमी होण्याआधीच साखर का कमी होते? हा प्रश्नच या संपूर्ण विषयाचा गाभा आहे.
सामान्यतः आपण विचार करतो— वजन कमी >इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते > रक्तातील साखर कमी होते.
पण gastric bypass मध्ये समीकरण काहीसे वेगळे दिसते ते असे
आतड्यांचा मार्ग बदलतो > हार्मोनल संदेश बदलतात > इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते > रक्तातील साखर कमी होऊ लागते.नंतर वजन कमी होण्याचा परिणाम त्यात आणखी भर घालतो.

यकृताचाही म्हणजे आपल्या लिव्हरचाही यात मोठा वाटा आहे टाइप-२ डायबेटीसमध्ये यकृत अनेकदा शरीराला गरज नसतानाही ग्लुकोज रक्तात सोडत राहते. गॅस्ट्रिक बायपासनंतर शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता आणि ऊर्जा-वापराच्या प्रक्रियांमध्ये बदल होतात. परिणामी यकृताकडून होणारी अतिरिक्त ग्लुकोज निर्मिती कमी होण्यास मदत होऊ शकते.
म्हणजे या शस्त्रक्रियेत केवळ पोटाचा आकार बदलत नाही; स्वादुपिंड, यकृत, आतडे आणि मेंदू यांच्यातील चयापचयाचे संदेशही बदलतात.

पण मग डायबेटीस कायमचा बरा झाला असा याचा अर्थ होतो का ?
नाही, वैद्यकीय भाषेत याला “diabetes remission” म्हणतात; “diabetes remission” म्हणजे कोणत्याही औषधोपचाराशिवाय रक्तातील साखरेची पातळी किमान तीन महिने सामान्य किंवा मधुमेहाच्या पातळीपेक्षा खाली राहणे होय.
पण हा “कायमचा इलाज” असेही नाही.
अमेरिकन डायबेटीस असोसिएशनच्या २०२६ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार metabolic surgery मुळे टाइप-२ डायबेटीसमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण मोठ्या प्रमाणात सुधारू शकते आणि अनेक रुग्णांमध्ये remission होऊ शकते. मात्र कालांतराने काही रुग्णांमध्ये डायबेटीस पुन्हा दिसू शकतो.

आणि म्हणूनच ही शस्त्रक्रिया “साखरेची जादूची गोळी” नाही
Metabolic surgery ही मोठी शस्त्रक्रिया आहे. तिच्यासाठी योग्य रुग्णाची निवड, शस्त्रक्रियेचा धोका, पोषण, जीवनसत्त्वे, दीर्घकालीन वैद्यकीय तपासणी आणि वजनाचे व्यवस्थापन—या सगळ्यांचा विचार करावा लागतो.

आणि या सगळ्यात सर्वात रंजक गोष्ट कोणती?
आपण इतकी वर्षे डायबेटीसचा शोध रक्तात घेत होतो.
पण शरीर म्हणते— “रक्तात साखर दिसते खरी; पण तिची गोष्ट कदाचित आतड्यांपासून सुरू होते!”
म्हणूनच प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतो—
डायबेटीसचा इलाज पोटात सापडला आहे का? उत्तर आहे—पूर्णपणे नाही.
पण एवढे मात्र नक्की... केवळ स्वादुपिंडात नाही तर डायबेटीसच्या रहस्याची एक महत्त्वाची किल्ली आपल्या जठरात आणि आतड्यांत नक्कीच दडलेली आहे.

आता एक प्रश्न मनात येतो तो असा की जठराचं पुढे काय होतं जठराचा उरलेला भाग (याला ‘गॅस्ट्रिक रिमनंट’ म्हणतात) शरीरात त्याच्या नेहमीच्या जागीच राहतो; मात्र त्यातून अन्न पुढे जात नाही.
तो जिवंत आणि शरीराशी जोडलेला राहतो :जठराच्या या उरलेल्या भागाला त्याचा रक्तपुरवठा आणि पचनसंस्थेच्या खालच्या भागाशी असलेले नैसर्गिक संबंध कायम राहतात.
तो पाचक रस तयार करत राहतो :अन्नाचा मार्ग बदलला असला तरी हा जठराचा बायपास केलेला भाग पचनासाठी आवश्यक असलेले आम्ल, एन्झाइम्स आणि विविध हार्मोन्स नेहमीप्रमाणे तयार करत राहतो.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका
लाइफस्टाइल

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

१६ ऑक्टोबर, २०२६