मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

गोळ्या खोट्या होत्या, पण लक्षणं खरी; मेंदूने शरीरावर कसा ताबा मिळवला?

4 मिनिट वाचन

अँटीडिप्रेसंट गोळ्या खाल्ल्याच्या केवळ कल्पनेने तरुणाचा रक्तदाब कोसळला; मानवी मन आणि शरीराचा थक्क करणारा किस्सा.

शेअर करा:
गोळ्या खोट्या होत्या, पण लक्षणं खरी; मेंदूने शरीरावर कसा ताबा मिळवला?

काही वर्षांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये घडलेली ही कहाणी वाचाच !
२६ वर्षांचा एक तरुण धावतच हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डात आला
“मला वाचवा! मी माझ्या सगळ्या गोळ्या खाऊन टाकल्या आहेत.” एवढं बोलून तो अचानक कोसळला.
त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता.अंग थरथर कापत होतं, ब्लड प्रेशर ८०/४०, टॅकीकार्डिया म्हणजे हृदयाची धडधड वेगाने होत होती, थोडक्यात शॉकमध्ये गेल्याची सर्व लक्षणं दिसत होती.
त्याला तातडीने आत घेतलं गेलं सलाईन चढवलं,त्याच्या शरीरात नेमकं काय झालं आहे याचा शोधण्यासाठी ब्लड सॅंपल घेतलं गेलं- इमर्जन्सी लॅबला पाठवलं- पण उपचार करूनही त्याचं ब्लडप्रेशर स्थिर होतच नव्हतं. पुढच्या चार तासात सतत सलाईनच्या माध्यमातून रक्तदाब नॉर्मल व्हावा म्हणून औषधं चालू असूनही रक्तदाब अस्थिर म्हणजे साधारण १००/६० इतकाच होता.

दरम्यान डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तेव्हा एक महत्त्वाची माहिती समोर आली.
हा तरुण एका नवीन अँटिडिप्रेसंट औषधाच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी झाला होता.
त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचं प्रेयसीसोबत ब्रेकअप झालं होतं.भावनेच्या भरात त्याने क्लिनिकल ट्रायल औषधाच्या सगळ्या गोळ्या एकदम घेतल्या होत्या.मात्र लगेचच त्याला आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला आणि तो स्वतःहून हॉस्पीटलात आला.

डॉक्टरांनी त्या औषधाच्या ट्रायलचे संशोधन करणाऱ्या टीमशी संपर्क साधला. आणि मग जे समोर आलं, ते अक्षरशः धक्कादायक होतं.
ट्रायलच्या randomization records तपासल्यानंतर संशोधक डॉक्टरांना कळलं की हा तरुण प्रत्यक्षात औषध घेत असलेल्या गटात नव्हताच! तो placebo group मध्ये होता.म्हणजे त्याने ज्या गोळ्या खाल्ल्या होत्या त्या औषधाच्या गोळ्या नव्हत्याच. त्या केवळ औषधासारख्या दिसणाऱ्या 'निष्क्रिय' placebo गोळ्या होत्या—त्यात औषधाचा सक्रिय घटकच नव्हता.

डॉक्टरांनी ही माहिती त्या तरुणाला सांगितली. आणि त्यानंतर जादूची कांडी फिरवावी तशी अवघ्या १५ मिनिटांत परिस्थिती पूर्णपणे बदलली.त्याचं ब्लडप्रेशर नॉर्मल झालं .हृदयाची धडधड नॉर्मल झाली तो पूर्णपणे जागा आणि ॲलर्ट झाला.आधीची त्याची सगळी लक्षणं नाहीशी झाली.आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे—या बदलासाठी त्याला कोणताही नवीन औषधोपचार किंवा अतिरिक्त उपचार दिला गेला नव्हता.फक्त त्याला नवीन माहिती दिली गेली होती....

थोडक्यात हा ‘Placebo’ नव्हे, तर त्याचा उलटं—‘Nocebo Effect’ होता
Placebo Effect म्हणजे एखाद्या निष्क्रिय गोष्टीवर औषधासारखा विश्वास ठेवला आणि त्यामुळे शरीरात सकारात्मक बदल घडून आला, तर त्याला placebo effect म्हणतात.
पण त्याचा एक सावत्र भाऊ आहे—Nocebo Effect. एखादी गोष्ट आपल्याला नुकसान करणार आहे,असा ठाम विश्वास मनात निर्माण झाला आणि त्या विश्वासामुळे प्रत्यक्ष शरीरात नकारात्मक बदल घडले, तर त्याला नोसीबो इफेक्ट म्हणतात.
या तरुणाला वाटत होतं की त्याने मोठ्या प्रमाणात औषध घेतलं आहे. त्यामुळे त्याच्या मनाने शरीराला जणू धोक्याचा इशारा दिला. आणि त्याचा परिणाम केवळ कल्पनेपुरता राहिला नाही.त्याच्या शरीरात खरोखरच शारीरिक बदल झाले—रक्तदाब घसरला, हृदयाची गती वाढली, घाम फुटला, थरथर झाली आणि तो शॉकमध्ये गेला.जे त्याच्या डोक्यात सुरू झालं होतं त्याचा परिणाम शरीरावर प्रत्यक्ष आणि मोजता येण्यासारखा झाला होता.

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमन सम्राट आणि तत्त्वज्ञ Marcus Aurelius यांनी एक विचार मांडला होता—“आपल्या विचारांची गुणवत्ता आपल्या आयुष्याची गुणवत्ता ठरवते.”आपल्या विचारांचा परिणाम फक्त आपल्या भावनांवर किंवा जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होत नाही तर आपले विचार आपल्या शरीरावरही परिणाम करू शकतात.
आपल्या मनातल्या विचारांमुळे निर्माण होणारे संकेत शरीरातील रसायनांवर, हार्मोन्सवर, हृदयाच्या ठोक्यांवर, रक्तदाबावर आणि इतर शारीरिक प्रक्रियांवर परिणाम करू शकतात.म्हणजेच— मन शरीरापासून वेगळं नाही.
आपल्याला वाटतं, “हे फक्त माझ्या मनात आहे.” पण मनातला विचार कधी कधी एक वास्तविक जैविक संकेत बनतो,ज्याची किंमत कधी कधी आपल्या शरीराला मोजावी लागते.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

८२ वर्षांच्या आजीच्या पोटातला 'दगड' एक लिटर कोका-कोलाचा एनिमा देऊन फोडण्याचा अजब प्रयोग!
आरोग्य

८२ वर्षांच्या आजीच्या पोटातला 'दगड' एक लिटर कोका-कोलाचा एनिमा देऊन फोडण्याचा अजब प्रयोग!

८२ वर्षांच्या महिलेच्या पोटातील कडक झालेली विष्ठा फोडण्यासाठी डॉक्टरांनी कोका-कोलाच्या एनिमाचा अनोखा आणि यशस्वी प्रयोग केला.

३० जुलै, २०२६

मुलांच्या विष्ठेवर ऑटिझमचे संशोधन: एक अनोखा वैज्ञानिक प्रयोग!
विज्ञान

मुलांच्या विष्ठेवर ऑटिझमचे संशोधन: एक अनोखा वैज्ञानिक प्रयोग!

लहान मुलांच्या विष्ठेतील सूक्ष्मजीवांचा वापर करून ऑटिझमवर उपचार शोधण्यासाठी हैदराबादमध्ये सुरू असलेले अनोखे संशोधन.

२२ सप्टेंबर, २०२६