मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ब्लू झोनमधील लोक शंभर वर्षं कसे जगतात?

5 मिनिट वाचन

ओकिनावापासून सार्डिनियापर्यंत जगातील 'ब्लू झोन्स'मधील लोक शंभर वर्षांचे निरोगी आयुष्य कसे जगतात? जाणून घ्या त्यांची जीवनशैली.

शेअर करा:
ब्लू झोनमधील लोक शंभर वर्षं कसे जगतात?

ब्लू झोनमध्ये राहणारी लोकं शंभर वर्षं जगतात आणि आपण पन्नाशीत ‘कंबर कडक झाली’ म्हणतो!

आपल्याकडे पन्नाशी उलटली की शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्वतःचं मत असतं.

सकाळी उठताना गुडघा म्हणतो, “आज जरा सावकाश.”

कंबर म्हणते, “काल सोफ्यावर चुकीच्या पद्धतीने बसलास त्याची शिक्षा आज भोग.”

मान म्हणते, “मोबाईल खाली धरून पाहण्याची सवय सोड.”

आणि जिना दिसला की हृदय म्हणतं, “लिफ्ट आहे ना!”

जगात काही ठिकाणी लोक शंभर वर्षांचे होऊनही चालत असतात,काम करत असतात,बाग सांभाळत असतात, मित्रमंडळींना भेटत असतात आणि पुढच्या दिवसाची योजना करत असतात.
ही ठिकाणं म्हणजे ‘ब्लू झोन्स’.

जगाच्या वेगवेगळ्या भागांत आढळणाऱ्या या समुदायांमध्ये दीर्घायुष्य असलेल्या लोकांचं प्रमाण तुलनेने जास्त आढळून आलं आहे. जपानमधील ओकिनावा, इटलीतील सार्डिनिया, कोस्टारिकेतील निकोया, ग्रीसमधील इकारिया आणि अमेरिकेतील लोमा लिंडा या पाच ठिकाणांचा या संदर्भात विशेष उल्लेख केला जातो.या लोकांकडे दीर्घायुष्याचं एखादं गुप्त औषध नाही. कुणी सकाळी उठून ‘१०० वर्षांची हमी’ असलेली गोळी घेत नाही.त्यांची कमाल बहुधा त्यांच्या दैनंदिन जीवनात आहे.

ओकिनावा : जगण्यामागे कारण असावं
जपानमधील ओकिनावामध्ये ‘इकिगाई’ हा शब्द प्रसिद्ध आहे—म्हणजे साधारणपणे जगण्यामागचा अर्थ किंवा उद्देश.
आपण सकाळी उठतो कारण ऑफिसला जायचं असतं.
रविवारी उठतो कारण आज ऑफिस नाही.
निवृत्त झाल्यावर?
“आता कशासाठी उठायचं?” हा प्रश्न काही जणांना पडतो.
ब्लू झोनची कल्पना मात्र उलटी आहे. वय वाढलं म्हणून जीवनाचा उपयोग संपत नाही. उलट, आपल्या दिवसाला काहीतरी कारण असतं.
कुणासाठी ते नातवंडं असतात, कुणासाठी बाग, कुणासाठी शेती, कुणासाठी मित्र, तर कुणासाठी एखादं छोटंसं काम.

सार्डिनिया : जिमला जाण्याऐवजी डोंगर चढा!
इटलीतील सार्डिनियाच्या काही भागांत दीर्घायुषी लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात. विशेषतः पुरुषांच्या दीर्घायुष्याबाबत या भागाचा उल्लेख केला जातो.
त्यांच्या जीवनशैलीत एक गोष्ट विशेष लक्षात येते—नैसर्गिक हालचाल.
आपल्याकडे चालण्यासाठीही कारण लागतं.
सार्डिनियात मात्र दैनंदिन जीवनातच चालणं मिसळलेलं आहे. डोंगराळ परिसर, घरकाम, शेती, दैनंदिन कामं—यामुळे शरीराला सतत हालचाल मिळते.
म्हणजे व्यायामासाठी वेगळा एक तास काढण्याऐवजी संपूर्ण दिवसच व्यायामासारखा जगला जातो.

निकोया : सकाळी उठण्याचं कारण
कोस्टारिकेतील निकोया द्वीपकल्पात ‘Plan de Vida’ म्हणजे जीवनाचा उद्देश ही कल्पना चर्चेत येते.
इथल्या पारंपरिक आहारात बीन्स,मका आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थांचा मोठा वाटा आहे. बाहेरची कामं,शेती आणि नियमित हालचाल हेही जीवनाचा भाग आहेत.
आपण मात्र सकाळी उठल्यावर सर्वप्रथम फोन शोधतो.
निकोयामध्ये कदाचित एखादा माणूस कोंबड्यांचा आवाज ऐकून उठत असेल.

इकारिया : आयुष्याला थोडा ब्रेकही हवा
ग्रीसमधील इकारिया बेटावर पारंपरिक भूमध्य आहार, चालणं, सामाजिक संबंध आणि विश्रांती यांचा उल्लेख केला जातो.
विशेषतः दुपारची विश्रांती किंवा झोप ही तिथल्या जीवनशैलीचा एक भाग आहे.
आपल्याकडे दुपारी पंधरा मिनिटं डोळे मिटले तरी प्रश्न येतो— काढा,दिवसा पण झोपा काढा !

लोमा लिंडा : कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा येथे Seventh-day Adventist समुदायाच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला आहे. वनस्पतीप्रधान आहार, नियमित हालचाल, विश्रांती, धार्मिक श्रद्धा आणि मजबूत सामाजिक आधार हे त्यातील काही पैलू आहेत.
यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते—माणूस एकटा निरोगी राहत नाही.
कुटुंब, मित्र, शेजारी, समुदाय—ही माणसाच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्याची मोठी संपत्ती असू शकते.
आज सोशल मीडियावर आपले पाचशे मित्र असतात; पण आजारी पडलो की औषध आणायला दोन माणसं सापडतात का, हा खरा प्रश्न!

मग या ब्लू झोन्सचं रहस्य काय?
त्यात नैसर्गिक हालचाल, जीवनाचा उद्देश, तणाव कमी करणाऱ्या सवयी, वनस्पतीप्रधान आहार, अति न खाणं, कुटुंबाला महत्त्व देणं आणि सामाजिक संबंध जपणं यांचा समावेश होतो.
यातलं विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी ऐकायला अत्यंत साध्या आहेत.आणि “फक्त सात दिवसांत आयुष्य बदला” असं सांगणारं कुठलंही YouTube thumbnail नाही!
चालणं, साधं खाणं, कमी ताण घेणं, आपल्या माणसांमध्ये राहणं आणि आयुष्याला काहीतरी अर्थ असणं—इतकंच.

ब्लू झोन्समधील लोक शंभर वर्षे जगतात याचं एकच कारण या सवयी आहेत,असं विज्ञानाने सिद्ध केलेलं नाही. आनुवंशिकता, आरोग्यसेवा, सामाजिक परिस्थिती आणि इतर अनेक घटकांचा त्यात वाटा असू शकतो.
पण या प्रदेशांकडून मिळणारा धडा तरी विचार करण्यासारखा आहे.
आपण आयुष्य वाढवण्यासाठी काय करतो?
गोळ्या, तपासण्या, supplements, gadgets, fitness apps...
आणि कधी कधी आयुष्य जगण्यासाठी मात्र वेळच ठेवत नाही.
कदाचित ब्लू झोन आपल्याला शंभर वर्षं जगण्याची हमी देत नसेलही
ते साधा प्रश्न विचारतात—
“तुम्ही जितकी वर्षं जगणार आहात, ती वर्षं 'जगण्यासारखी' जगणार आहात का?”

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!
लाइफस्टाइल

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!

नवरात्रीनिमित्त भारताच्या वस्त्रवैभवाचा वेध: नर्मदा काठच्या महेश्वरमधील ऐतिहासिक महेश्वरी साडी आणि राणी अहिल्याबाईंचे योगदान.

११ ऑक्टोबर, २०२६

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६