दातात अडकलेल्या पॉपकॉर्नमुळे चक्क ओपन हार्ट सर्जरी करावी लागली ?
लेखाचं नाव वाचून गोंधळलात ? हे प्रकरण तसंच काहीसं आहे. जास्त वेळ न दवडता काय घडलंय ते वाचूया.
ब्रिटनचा अॅडम मार्टिन हा सिनेमा बघत पॉपकॉर्न खात होता. एक पॉपकॉर्न त्याच्या मागच्या दाढेत अडकलं. त्याने आधी हाताने पॉपकॉर्न काढण्याचा प्रयत्न केला, पण तो निघाला नाही. मग त्याने वेगवेगळ्या पद्धती आजमावून पाहिल्या. पेनाचे झाकण, टुथपिक, तार, खिळा, अशा गोष्टी वापरून तो तीन दिवस पॉपकॉर्न काढण्याचा प्रयत्न करत होता. पण काही केल्या दातातलं पॉपकॉर्न निघायला तयार नव्हतं.
हे घडलं २०१९ सालच्या सप्टेंबरमध्ये. यानंतर एका आठवड्याने अॅडमच्या शरीरात बदल दिसू लागले. रात्री घामाच्या धारा वाहायला लागल्या, डोके दुखी वाढली, थकवा जाणवू लागला. ही लक्षणे तशी कोणत्याही आजाराची असू शकतात, पण अॅडमच्या बाबतीत त्या एका पॉपकॉर्नने त्याचा घात केला होता.
पॉपकॉर्न काढण्याच्या प्रयत्नात अॅडमच्या दाढेला जबर इजा झाली होती. त्यामुळे इन्फेक्शन तयार झालं होतं. परिणामी त्याला endocarditis चा त्रास सुरु झाला. Endocarditis मध्ये हृदयाच्या आतील बाजूस इजा पोहोचते. Endocarditis औषधांनी बारा होतो पण काहीवेळा शस्त्रक्रिया करावी लागते.
अॅडमच्या बाबतीत या इन्फेक्शनने हृदयाला गंभीर दुखापत केली होती. उपचारासाठी एकच पर्याय होता तो म्हणजे ओपन हार्ट सर्जरी. शस्त्रक्रियेत हृदयाच्या आतील डाव्या बाजूचं झडप दुरुस्त करण्यात आलं.
अॅडमची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्याने म्हटलं की मी डेंटिस्टकडे गेलो नाही ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. अॅडमने केलेली चूक तुम्ही आम्ही बऱ्याचदा करतो. पण एकदा डेंटिस्टकडे गेलात तर पुढचा त्रास टाळता येऊ शकतो.