आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होत आहेत? जाणून घ्या का आणि कसं होत आहे हे..
“धरती का सीना चिरकर मेरे करन अर्जुन आऐंगे”
ऐकायला कितीही भारी वाटले आणि टाळ्या घेणारे वाक्य असले तरी खरोखर धरणी दुभंगली तर काय होईल? करन अर्जुन लांबच पण ज्वालामुखी आणि लाव्हा बाहेर येईल हे त्या माउलीला माहीत नसावे.
मंडळी, शाळेत असताना भूगोल विषयात आपण पृथ्वीविषयी जुजबी माहिती घेतली असते. तुम्हाला माहीतच असेल की सध्या आपली पृथ्वी सात खंडात विभागली गेली आहे. परंतु हे सात खंड पूर्वी एकाच ठिकाणी होते. त्या एका मुख्य खंडाला पँजिया असे म्हणतात. कोट्यवधी वर्षांच्या अंतर्गत हालचालींमुळे हे एका पँजिया मधून सात खंड हळू हळू एकमेकांपासून विभाजित झाले आणि आपण सध्या बघतो तसा भौगोलिक नकाशा तयार झाला. पण हे स्थलांतर थांबले आहे का? तर नाही मंडळी. अजूनही अगदी धीम्या गतीने ते सुरूच आहे आणि नकाशा सुद्धा बदलतोच आहे. सध्या आपण पाहतो ते सात खंड पुढील प्रमाणे आहेत - आशिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया.
पण समजा आम्ही तुम्हाला सांगितले की जगाच्या नकाशावर आठवा खंड जन्मास येतोय तर? होय हे खरं आहे! एका महत्त्वाच्या भौगोलिक घडामोडीचे आपण साक्षीदार आहोत मंडळी! आफ्रिका खंडाचे विभाजन होतेय… चला या बाबत जाणून घेऊया…
केनिया देशात जबरदस्त पाऊस झाला आणि अचानक जमिनीवर पडलेली कित्येक किलोमीटरची एक लांबच लांब भेग सामोरी आली. सुरुवातीला याकडे कुणी जास्त लक्ष दिले नाही, परंतु दिवसेंदिवस या भेगेचा आकार मोठा मोठा होत गेला आणि शास्त्रज्ञांचे लक्ष इकडे वळले. अधिक अभ्यास केला असता असे आढळून आले की ही आफ्रिका खंडाला दोन भागात विभाजित करणारी नैसर्गिक रेषा तयार झाली आहे. याला शास्त्रीय भाषेत 'इस्ट आफ्रिकन रिफ्ट' म्हणतात.
आफ्रिकेच्या पूर्व भागात हे स्थित्यंतर घडत आहे. यामुळे आफ्रिकेचे दोन तुकडे पडणार असून सोमालियन आणि नुबियन असे दोन वेगवेगळे भाग तयार होणार आहेत. मंडळी, हीच ती जागा आहे जिथे मानवी जीवनाची सुरुवात झाली असे मानले जाते. मानवी अस्तित्वाच्या सर्वात जुन्या खुणा इथेच सापडल्या आहेत आणि इथूनच पुढे मानवाने वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून आपल्या बहुविध संस्कृती निर्माण केल्या आहेत असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
पण हे वाचायला जितकं सोपं वाटतं तितकं नाही मंडळी. ही एक फार धीम्या गतीने होणारी प्रक्रिया आहे. पृथ्वीच्या अंतर्भागात असलेला लाव्हा जेव्हा स्वतःचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर आतल्या बाजूने निर्माण करतो तेव्हा वरील बाजूने पृष्ठभागाला चिर पडण्यास सुरुवास होते. हे काही अल्पकाळात घडत नाही, यासाठी काही कोटी वर्ष जावे लागतात.
आफ्रिकेच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर या भेगेच्या उत्तर दिशेकडे हालचाली होण्याचा वेग कमी आहे. कारण इथे पृथ्वीचा पृष्ठभाग मजबूत आहे. तसेच आपण दक्षिणेकडे गेलो तर असे दिसते की इथे जमीन ज्वालामुखीच्या उगमावर असून मुख्य भूमिपासून तुकडा पडण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या बेतात आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की समुद्राचे पाणी या भेगेत भरण्यास सुरुवात होईल. हे पाणी जशी जागा मिळेल तसे उत्तरेकडे सरकू लागेल. पाण्याने जमीन वेढली जाऊ लागताच पूर्ण तुकडा वेगळा होईल आणि तो तुकडा मुख्य भूमिपासून दूर जाऊ लागेल. काही कालावधीनंतर तो मादागास्कर देशाला जाऊन मिळेल. या संपूर्ण घडामोडीला आणखी कोट्यवधी वर्षे लागणार आहेत.
अर्थातच ही प्रक्रिया फारच मंद गतीने होणार असून जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बघायला आपण या जगी नसणार आहोत. आपल्या पुढील कित्येक पिढ्या नंतर जेव्हा भूगोल शिकतील तेव्हा त्यांना अभ्यासात पृथ्वीवर आठ खंड आहेत असे शिकवले जाईल हे मात्र निश्चित!
तर मंडळी, ही माहिती कशी वाटली हे कमेंटबॉक्स मध्ये कळवण्यास विसरू नका…
लेखक : अनुप कुलकर्णी