नीरव मोदीला लंडन मध्ये सुरक्षित ठेवणारा 'गोल्डन व्हिसा' आहे तरी काय ?
मंडळी, २०१८ साली पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याने देशात खळबळ माजली होती. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी घोटाळा उघड होण्यापूर्वीच देशातून पळून गेला होता. नुकतंच तो लंडन मधल्या रस्त्यांवर खुलेआम फिरताना दिसला. त्याचे व्हायरल झालेले व्हिडीओ तुम्ही पण बघितले असतीलच.
हा व्हिडीओ बघून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार, की एवढा मोठा घोटाळेबाज युके मध्ये कोणत्याही बंधनाशिवाय कसा काय फिरू शकतो. याचं कारण आज आम्ही सांगणार आहोत.
Exclusive: Telegraph journalists tracked down Nirav Modi, the billionaire diamond tycoon who is a suspect for the biggest banking fraud in India's historyhttps://t.co/PpsjGeFEsy pic.twitter.com/v3dN5NotzQ
— The Telegraph (@Telegraph) March 8, 2019
मंडळी, स्विस बँका ज्या प्रमाणे काळा पैसा देशाच्या बाहेर सुरक्षित ठेवण्याचं काम करतात तसंच एक खास व्हिसा घोटाळेबाजांना देशाबाहेर सुरक्षित ठेवण्याचं काम करतो. या व्हिसाचं नाव आहे ‘गोल्डन व्हिसा’. याच व्हिसाच्या मदतीने नीरव मोदी लंडनला पळून जाण्यात यशस्वी ठरला.
चला तर गोल्डन व्हिसा विषयी सविस्तर माहिती घेऊया.
१. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी २००८ साली गोल्डन व्हिसा अस्तित्वात आला. युके मध्ये पैसा गुंतावणाऱ्या धनाड्यांना हा खास व्हिसा दिला जातो.
२. गोल्डन व्हिसाने युरोपियन युनियन आणि स्वित्झर्लंडच्या बाहेरील श्रीमंतांना युके मध्ये कायमचं बस्तान बसवण्याचा हक्क मिळतो.
३. गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी एका व्यक्तीला जवळजवळ २.५ मिलियन डॉलर्स म्हणजे आजच्या डॉलरच्या रेट प्रमाणे १७,२४,०७,५०० रुपये गुंतवावे लागतात. पुढील ५ वर्षांच्या कालावधीत ती व्यक्ती कायमच्या वास्तव्याची मागणी करू शकते.
४. लवकरात लवकर नागरिकत्व मिळवण्यासाठी ५ मिलियन किंवा १० मिलियन गुंतवावे लागतात. एवढा पैसा ओतल्यानंतर २ ते ३ वर्षात युके मध्ये कायमचं वास्तव्य करता येतं.
५. पहिल्या क्रमांकाच्या गुंतवणूकदारांच्या पत्नी आणि मुलांना देखील युके मध्ये वास्तव्य करता येतं.
६. एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की त्या व्यक्तीला कायमचं नागरिकत्व मिळत नाही.
७. युके मध्ये व्यवसाय उभारता येत असला तरी गोल्डन व्हिसा मिळालेली व्यक्ती मालमत्ता व्यवसायात उतरू शकत नाही.
गोल्डन व्हिसा म्हणजे घोटाळेबाजांना पळून जाण्यासाठी एक नवीन पळवाट आहे असं फार पूर्वीपासून म्हटलं जात होतं. हे खरं असल्याचं नीरव मोदीने पटवून दिलं. अशा पळवाटांनी नीरव मोदी सारख्या गुन्हेगारांना पकडणे आणखी अवघड होऊन बसलंय.
आणखी वाचा :
या ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...