या गावात घरासमोर गाडी नाही तर विमान पार्क केले असते.कुठे आहे हे गाव ?
स्वतःची कार असावी आणि ती दिमाखात बाहेर उभी असावी, तिला येता-जाता लोकांनी पाहावी असे तुम्हाला वाटते का? असं स्वप्न सर्वसामान्यांनी पाहणं साहजिक आहे. जगात अशी अनेक शहरे आहेत जिथे प्रत्येकाकडे स्वतःची कार आहे. पण अमेरिकेत एक असंही शहर आहे जिथे राहणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचं विमान आहे. धक्का बसला ना? होय! आज आपण अशाच एका शहराची माहिती घेणार आहोत.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅमेरून एअरपार्कमध्ये लोक खासगी विमाने वापरतात. येथे राहणारे लोक ऑफिस आणि कामासाठी अनेकदा त्यांच्या विमानाचा वापर करतात. इथे लोक सहसा त्यांच्या कार पार्क करतात, तशीच विमानेही पार्क करतात. फोटोमधून तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक घराच्या बाहेर विमान पार्क केले आहे.
या भागातल्या रस्त्यांची रुंदी खूपच जास्त आहे. जेणेकरून यावरून विमाने सहज जाऊ शकतील. विमाने जाताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रस्त्यावरील सूचना फलक आणि घरांचे लेटरबॉक्स अधिक उंचीवर लावण्यात आले आहेत. इथे रस्त्यांची नावेही विमानांशी संबंधित ठेवली गेली आहेत. उदाहरणार्थ एका रस्त्याचे नाव 'बोईंग रोड' आहे. इथे रस्ते विमानतळापर्यंत जोडलेले आहेत. प्रत्येक रस्ता इतका रुंद आहे की विमान आणि कार एकाच वेळी जाऊ शकतात.
असे म्हटले जाते की दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेने विमान चालविण्यास भरपूर प्रोत्साहन दिले होते. इथे अनेक विमानतळ आहेत आणि उड्डाण परवाना मिळणे देखील एक सोपी प्रक्रिया आहे. यामुळे इथे विमान घेणेही सोपे झाले आहे. इथे विमानाचे मालक असणे म्हणजे कार बाळगण्याइतके सोपे असते. या भागात राहणारे सदस्य aviation शी निगडित असल्याने ते विमान उड्डाणही करतात. अर्थात तसा परवाना त्यांच्याकडे असतो. त्यामुळे ऑफिसला जातानाही ते विमानाने जातात. त्यांच्यासाठी ती मोठी गोष्ट नाही.
इकडे आपल्या शहरात प्रत्येकाची कार निघाली तर ट्रॅफिकमध्ये अडकून किंवा पार्किंग शोधण्यात आपण वैतागून जातो. जेव्हा अशी शहरं पाहतो की जिथे विमानही उडवून सहज ऑफिसला जातात तेव्हा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.
शीतल दरंदळे