मीनरल वॉटर, प्युरीफाईड वॉटर, डीस्टील्ड वॉटर... या सगळ्यात काय फरक आहे राव?

तब्येतीची काळजी बाळगणाऱ्या प्रत्येक माणसाला घराबाहेर पडल्या पडल्या नितांत गरजेची वाटते ती शुध्द पिण्याच्या पाण्याची बाटली. आता आपल्याकडं मिळणारं स्थानिक ब्रॅन्डचं बाटलीबंद पाणी कीती शुध्द आणि कुठून भरलेलं असतं हे इथे विचारू नका. आज आपण थोडी वेगळी माहिती बघणार आहोत. मंडळी, जर तुम्ही बाटलीबंद शुध्द पाणी विकत घेतलं तर तुम्हाला आढळेल की एखाद्या बाटलीवर प्युरीफाईड वॉटर लिहलंय, एखादीवर मीनरल वॉटर लिहलंय, एखादीवर डीस्टील्ड लिहलंय कींवा एखादीवर स्प्रिंग वॉटरही लिहीलेलं असेल. हे सगळे शुध्द पाण्याचे प्रकार आहेत आणि या सगळ्यात थोडा फरकही आहे. या आपण जाणून घेऊया...
डीस्टील्ड वॉटर
डिस्टीलेशन, म्हणजेच उर्ध्वपातन पध्दतीने हे पाणी शुध्द केलं जातं. प्युरीफाईड वॉटर मिळवण्याच्या अनेक पध्दतींपैकीच ही एक पध्दत आहे. इथे पाण्याला उच्च तापमानाला उकळून त्याची वाफ थंड करून हे पाणी मिळवलं जातं. पाण्यामध्ये विरघळलेल्या अनेक अशुद्ध घटकांचा उत्कलन बिंदू हा पाण्यापेक्षा उच्च असल्यामुळे पाण्यासोबत त्यांची वाफ होत नाही, आणि आपल्याला निव्वळ शुध्द पाणी मिळतं. पण पाण्याची वाफ झाल्यामुळे यामध्ये आवश्यक खनिज आणि क्षारांचा अभाव असतो.
उर्ध्वपातन पध्दत (स्त्रोत)
प्युरीफाईड वॉटर
प्युरीफाईड केलेलं पाणी हे कोणत्याही स्त्रोतांमधील असू शकतं. पण त्यातील प्रदूषण आणि हानीकारक घटक काढून टाकून ते शुध्द केलेलं असतं. प्युरीफाईड पाणी मिळवण्यासाठी डीस्टीलेशन, कार्बन फील्ट्रेशन, रिव्हर्स अॉसमॉसीस, डीआयोनायझेशन अशा वेगवेगळ्या पध्दती वापरल्या जातात. शुध्द पाणी मिळत असलं तरी प्रत्येक पध्दतीमध्ये काही ना काही कमतरता या आहेतच. जसं की डीस्टीलेशन प्रक्रियेत पाण्यातील अशुद्ध घटकांसोबत त्यातील क्षार-खनिजेही नाश पावतात.
स्प्रिंग वॉटर
हे पाणी थेट नैसर्गिक झरे, तसेच इतर भुमीगत शुध्द स्त्रोतांपासुन मिळवलं जातं. नैसर्गिकरीत्या यात आरोग्याला फायदेशीर ठरणारे अनेक घटक सामावेले असतात. आजकाल हे पाणी बॉटलीबंद स्वरूपात मिळत असलं तरी ते खरंच प्राकृतीक पध्दतीने मिळवलंय का ? याची शंकाच आहे.
(स्त्रोत)
मीनरल वॉटर
या शुध्द पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, सल्फर, लोह, अशा शरीराला आवश्यक घटकांसोबत विवीध खनिजांचा समावेश असतो. हे पाणीही नैसर्गिक स्त्रोतांपासुनच मिळवलं जातं. पण स्प्रिंग वॉटरएवढे या पाण्यापासून आरोग्याला फायदे मिळत नाहीत.
आता आम्ही कोणतं पाणी पिलेलं योग्य? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या लेबल्सकडे लक्ष देऊ नका. शुध्द केलेलं आणि पिण्यायोग्य असं कोणतंही पाणी तुम्ही पिऊ शकता.