भारतातला पहिला इग्लू कॅफे काश्मीरमध्ये सुरु झालाय....काय काय आहे या कॅफेत पाहा !!
भारताचा स्वर्ग काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा इग्लू कॅफे सुरू झाला आहे. हा भारतातील पहिलाच इतका मोठा इग्लू कॅफे आहे. यंदा काश्मीर खोऱ्यात थंडी व हिमवृष्टीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. परंतु या बर्फाचा वापर करून ही नवीन कल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आली आहे. इग्लू कॅफे म्हणजे फक्त बर्फाचा वापर केलेले घुमटाकृती छोटेखानी हॉटेल. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हा कॅफे उभा केला आहे.
तरुण हॉटेल व्यवसायिक वसीम शाह यांचे हे हॉटेल आहे. त्यांनी असं हॉटेल स्वित्झर्लंड, कॅनडा आणि फिनलंड येथे पाहिले होते. भारतातही असे काही करावे असे त्यांना वाटले. आशियात इतके मोठे इग्लू कॅफे अजूनपर्यंत कुठेच नाही. इग्लू कॅफेमध्ये टेबल, खुर्च्या बर्फापासून बनवल्या आहेत. एकाचवेळी १६ जणांच्या जेवणाची व्यवस्था इथे आहे. २२ फूट रुंद आणि १२.५ फूट उंच असे या कॅफेचे आकारमान आहे. सलग २० दिवसांत हे कॅफे बांधले आहे. सध्या हिमवृष्टी थांबल्यामुळे अनेक पर्यटक या कॅफेला भेट देत आहेत.
इथे कॉफीसोबतच काव्हा या गरम पेयाचाही आस्वाद घेता येतो. चिकन, मटण, बिर्याणी, पनीर सारखे पदार्थही आहेत. अतिशय थंड वातावरणामुळे एक तासापेक्षा जास्त येथे बसता येत नाही.
देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक गुलमर्गमध्ये बांधलेले हे अनोखे इग्लू कॅफे पाहण्यासाठी येतील, अशी आशा कॅफे मालक वसीम शाह यांना आहे. सध्या चांगले वातावरण असल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही सुरू झाला आहे. गुलमर्ग हे स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे. हे कॅफे अजून एक आकर्षक ठिकाण बनेल यात शंका नाही.
लांब परदेशात जाण्यापेक्षा असा मस्त कॅफे भारतात असणं म्हणजे खवय्यांसाठी पर्वणी आहे. तुम्हाला आवडेल अश्या कॅफेला भेट द्यायला? नक्की कळवा आणि शेयर करायला विसरु नका.
लेखिका: शीतल दरंदळे