आता जिओ फोन झाला 'स्मार्ट'....नवीन जिओ फोनमध्ये काय काय असेल पाहा!!
भारताच्या डिजिटल क्रांतीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचा महत्त्वाचा वाटा आहे. जीओचे सिम आल्यापासून देशात झालेले बदल सर्वांनी पाहिले आहेत. आता पुन्हा मुकेश अंबानी नव्या ताकदीने नव्या गोष्टी घेऊन येत आहेत. जिओनंतर मुकेश अंबानी यांनी जिओ फोन बाजारात आणला होता. या छोट्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप, युट्यूब सारख्या सुविधा होत्या.
आता मुकेश अंबानी जिओ फोन नेक्स्ट घेऊन येत आहेत. हा जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल असा दावा केला जात आहे. हा फोन गुगलसोबत मिळून तयार करण्यात आला आहे. येत्या १० सप्टेंबरला गणेश चतूर्थीचा मुहूर्त साधून हा फोन विक्रीस खुला केला जाणार आहे. रिलायन्सच्या वार्षिक सभेत ही घोषणा करण्यात आली. या सभेत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे पण ऑनलाइन पद्धतीने सामील झाले होते.
इतर स्मार्टफोन्समध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा या फोनमध्ये मिळणार आहेत. कॅमेरा, व्हॉइस असिस्टंट, सिस्टीम अपडेट सर्वकाही इतर अँड्रॉइड मोबाईलमध्ये असते तसेच आणि त्याच दर्जाचे असेल असा दावा केला जात आहे. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, २जी मुक्त भारत हे आपले धोरण आहे. याखेरीज ते पुढे म्हणाले की, आजही जे ३० कोटी लोक २जी फोन्सचा वापर करतात त्यांना डिजिटल जगतात आणण्याचे ध्येय आहे.
या नव्या जिओ फोनची किंमत अजून ठरलेली नसली तरी २५०० रुपयांपर्यंत हा फोन उपलब्ध होऊ शकतो, असा दावा काही माध्यमांनी केला आहे. हा फोन सांगितल्याप्रमाणे स्वस्त आणि मस्त आहे का आणि त्यात इतर फोन्सच्या तुलनेने कोणते नवे फीचर्स असणार आहेत, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.