मुंबईकरांनी असं काय केलं की कोणालाच विश्वास बसला नाही ??
मुंबई मध्ये सकाळच्या गर्दीच्यावेळी लोकल ट्रेन पकडणे म्हणजे कोणत्याही युद्धात उडी घेण्यापेक्षा कमी नाही मंडळी. मुंबईतली लोकल आणि तिथली गर्दी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. सोशल मिडीयावर किंवा बातम्यांमध्ये मुंबईच्या लोकलची तुलना जपान किंवा चीनच्या रेल्वेशी केली जाते. तिकडे दिसणारी शिस्त आपल्याकडे नाही म्हणून खंत व्यक्त केली जाते.
राव, मुंबईची लोकसंख्या पाहता जपान किंवा चीन सारखी शिस्त आपल्या इकडे नजीकच्या काळात येईल यावर कोणाचा विश्वास बसत नाही. या गर्दीला कारण काहीही असलं तरी तिला शिस्त लावणे सोप्पे नाही. पण हे शक्य करून दाखवलं आहे बोरीवलीकरांनी.
Reddit या वेबसाईटने नुकताच एक फोटो व्हायरल केला आहे. या फोटो मध्ये बोरीवली स्थानकावर लोक चक्क लाईनीत उभे राहून ट्रेनची वाट बघतायत. Reddit ने दिलेल्या माहितीनुसार ही रांग AC लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे या प्रकारे रांग लावण्यासाठी स्वतः प्रवाशांनी पुढाकार घेतला होता.
मंडळी, हे अगदी दुर्मिळ दृश्य बघून अनेकांचा विश्वास बसला नाही. सोशल मिडीयावर याचीच चर्चा सुरु आहे. रेल्वे स्थानाकावरची गर्दी हे आता मुंबईकरांच्या अंगवळणी पडलं आहे. असं असलं तरी हे तेवढंच धोकादायक आहे. अनेकांचा यात जीव जातो. या रोजच्या समस्येवरचा तोडगा खुद्द मुंबईकरांनीच शोधून काढला हे कौतुकास्पद आहे.
3असाच प्रकार गेल्यावर्षी सुद्धा दिसून आला होता. एका महिलेने स्थानकावर रांग तयार केली आणि तिथे असलेल्या इतरांनी तिचं अनुकरण केलं होतं.
मंडळी, हा फोटो सुखद धक्का देणारा असला तरी फोटोच्या खरेपणाबाबत अजूनही शंका आहेच. शेवटी काहीही असलं तरी मुंबईकर या गोष्टीला नक्कीच मनावर घेतील आणि भविष्यात अशी शिस्त सगळ्या स्थानकांवर दिसून येईल अशी आशा आपण बाळगू शकतो.