कान्हामध्ये मिळालाय वाघाचा वाघाला खातानाचा फोटो. जाणून घ्या काय प्रकरण आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाच्या मृत्यूचे नवीन कारण ऐकायला मिळत होते. नरभक्षण म्हणजेच चक्क वाघच वाघाला मारून खातोय. तसा काही प्राण्यांमध्ये हा प्रकार या पूर्वीही पाहायला मिळालाय, पण वाघांमध्ये हा प्रकार आजवर कधीही पाहण्यात आलेला नव्हता. आपल्या वनखात्याचे ट्रॅक रेकॉर्ड बघता हे त्यांनी एखाद्या शिकाऱ्याला वाचवण्यासाठी तर हे कारण काढले नाही ना असे वाटत होते.
पण आता कान्हामधल्या फॉरेस्ट रेंजर्सने आपल्याला पुरावा सादर केला आहे. त्यांच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये चक्क वाघ वाघाला खातानाचा फोटो काढण्यात आला आहे. तर घडलं असं आहे की एका मेलेल्या वाघाच्या प्रेतावर ते लक्ष ठेऊन बसले होते. त्यांनी पुढे जे पाहिलं ते खरंच अंगावर काटा आणणारं होतं. त्यांना दुसरा वाघ येऊन या वाघाचे मांस खाताना दिसला.
वनविभगाच्या मते मेलेला वाघ हा दोन वर्ष वयाचा T ३६ होता आणि त्याला किसली रेंजमध्ये T ५६ या वाघाने मारले. ही त्यांच्यातली आपला-आपला एरिया ठरवण्यासाठी केलेली फाईट आहे. अजूनही T ५६ हा आपल्या शिकारीजवळ बसून आहे आणि त्याचमुळे या वाघाचे शव वन विभागाला मिळालेलं नाही.
१०० पेक्षा जास्त वाघ असणाऱ्या कान्हामधली ही वाघ खाल्ला जाण्याची पाचवी घटना आहे. शिकारीची कमतरता हे वाघांत वाघांनाच खाण्याचं लक्षण तयार होण्यासाठी कारणीभूत असावे असं काही अभ्यासकांचं मत आहे. वाघांनी आपलं स्थान पक्कं करण्यासाठी इतर वाघांना मारणे हे कॉमन आहे, पण फक्त वाघांना मारून खाणे हे बघण्यात नाही. एकूणच वाघांच्या अशा वागण्याचा अभ्यास करायची गरज आहे.