computer

ही पुरस्कारप्राप्त फोटोग्राफर चक्क अंध मुलांना फोटोग्राफीचे धडे देत आहे !!

अनेकांना खूप काही काही करायची इच्छा असते. पण मग काहींच्या बाबतीत एक ना धड भाराभार चिंध्या असा प्रकार होतो. पण एक मुलगी धडाडीची उद्योजक आहे, फिल्ममेकर आहे, फोटोग्राफर आहे, तिच्या नावावर बर्पिज नावाच्या एक व्यायाम प्रकारातला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये विक्रम आहे, आणि ती आता अंध मुलांना फोटोग्राफी शिकवत आहे. वाचताना धाप लागली ना? ही सगळी कामं ही एक मुलगी करतेय.

दिल्लीची रिचा माहेश्वरी हिची ही गोष्ट!!! रिचा मूळची कानपुरची. तिचे वडील व्यवसायिक आहेत. लहानपणापासून फॅशनमध्ये आवड होती म्हणून तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने तिने नवनविन प्रयोग करायला सुरुवात केली.

तिच्या एका प्राध्यापकांनी तिला फोटोग्राफी करायचा सल्ला दिला. ती फक्त फोटोग्राफी शिकली नाही, तर तिने चक्क विद्यार्थीदशेतच स्वतःचा फोटोग्राफी आणि फिल्म स्टुडिओ सुरु केला. यातही महत्वाची गोष्ट ही की फोटोग्राफी शिकण्यासाठी तिने कुठला कोर्स नाही केला. ती स्वतः फोटोग्राफी शिकली. यावरून ही मुलगी किती अफलातून आहे याचा तुम्हाला अंदाज येईल.

आपल्या कामासोबत ती सामाजिक कामांमध्ये सुद्धा अग्रेसर असते. काही एनजीओंसोबत प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायांवर उपाय करण्याबाबत देखील तिने काम केले आहे. २०१४ साली या मुलीने अंधमुलांसंबंधी जागृती करण्यासाठी एका प्रकल्पावर काम केले. या दरम्यान तिच्या लक्षात आले की ही मुलं खूप हुशार असतात. त्यांना मोबाईल, लॅपटॉप चांगला हाताळता येतो. मग या मुलीने काय करावे? तर चक्क त्यांना फोटोग्राफी शिकवायला सुरुवात केली. ही मुलं त्यांचे सिक्स्थ सेन्स वापरून चांगले काम करत असतात. एक शक्ती नसली तरी इतर शक्ती आणि इंद्रिये सॉलिड काम करत असतात. त्यामुळंच की काय,पण या अंध मुलांनी फोटोग्राफीमध्ये छान प्राविण्य मिळवलं.

सतत फिरणे हा अजून एक तिचा आवडता छंद. जवळपास ५० पेक्षा जास्त देश ती फिरली आहे. जे काम करायचे ते अतिशय उत्तम करत राहणे हाच तिचा मंत्र आहे.

पाहा,या मुलीकडून काहीतरी प्रेरणा घ्या आणि असं काही करा की जेणेकरून आपण आयुष्यात काहीच केलं नाही का? असा प्रश्न मनात येऊ नये.

सबस्क्राईब करा

* indicates required