टाईम्सच्या कव्हरवर झळकलेली ही १५ वर्षांची भारतीय मुलगी कोण आहे? तिने केलेलं काम नक्कीच कौतुकास्पद आहे !!
2020 संपत आलं आहे. इतिहासातील सर्वात दुर्दैवी वर्ष म्हणता येईल अशा घटना या एका वर्षांत घडल्या आहेत. पण काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत हेही विसरून चालणार नाही. काही निवडक लोकांनी आपल्या कामाने हे वर्ष सुसह्य केलंय.
टाईम मॅगझिन अशाच भन्नाट लोकांना आपल्या कव्हरवर स्थान देत असते. अनेकदा असे होते की टाईमच्या कव्हरवर फोटो छापून आल्यावर आपल्याच देशाच्या लोकांची माहिती आपल्याला होते.यंदाही असाच एक अनोळखी चेहरा टाईम्सच्या कव्हर वर आहे. १५ वर्षीय गीतांजली राव या भारतीय- अमेरिकन मुलीने टाइम्सच्या कव्हरवर स्थान मिळवले आहे. हॉलिवूड सुपरस्टार अँजेलीना जोलीने तिची मुलाखत घेतली आहे.
गीतांजलीची निवड कीड ऑफ द इयर म्हणून झाली आहे. जगभरातील ५,००० मुलींमधून तिची निवड करण्यात आली. गीतांजली ही पहिली ‘कीड ऑफ द इयर’ ठरली आहे. तिला हा बहुमान तिच्या भन्नाट शोधांसाठी देण्यात आला आहे.
एवढ्या कमी वयात तिने पाण्यातल्या शिशाचं प्रमाण ओळखण्यासाठी सेन्सर तयार केले आहे. सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे असा तिचा आग्रह आहे. या सेन्सरचे नाव तिने टेथिस असे ठेवले आहे. गीतांजली सांगते की, याआधी पाण्यातील शिसे ओळखण्यासाठी पाण्याला लॅबमध्ये नेऊन तिथे परीक्षण करावं लागायचं, पण या सेन्सरच्या मदतीने हे काम सोपे होणार आहे. अतिशय कमी खर्चात तयार केलेले हे मोबाईलच्या आकाराचे मशीन पाण्यात टाकल्याबरोबर पाण्यातील शिशाचे प्रमाण सांगते.
याखेरीज गीतांजलीने अफूचे व्यसनी आणि सायबरबुलिंगच्या निशाण्यावर आलेल्या लोकांसाठी देखील संशोधन केले आहे. सायबरबुलिंग रोखण्यासाठी तिने काइंडली नावाचे ऍप तयार केले आहे. काइंडली हे क्रोमच्या एक्सटेन्शनच्या रूपानेही उपलब्ध आहे. काइंडलीमध्ये असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सायबरबुलिंग हे तत्काळ कळून येते.
तर वाचकहो, परवा आलेली रणजीत दिसले यांच्या पुरस्काराची बातमी आणि आता अवघ्या १५ वर्षीय गीतांजलीच्या यशाच्या बातमीने २०२० वर्षाने जाताजाता काही चांगल्या गोष्टीही दिल्या असं म्हणायला हरकत नाही.