१९४१ सालची ती 'लक्स' जाहिरात; जेव्हा लीला चिटणीस यांनी 'ब्युटी'ची व्याख्याच बदलली!
आजचे सुपरस्टार्स एका जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये घेतात आणि तरीही त्यात अनेकदा कृत्रिमता जाणवते.मात्र, १९४१ मध्ये जेव्हा लीला चिटणीस 'लक्स'च्या जाहिरातीत झळकल्या,तेव्हा तो केवळ एक व्यावसायिक करार नव्हता.एका बाजूला पारंपारिक चौकटीत अडकलेला समाज होता आणि दुसऱ्या बाजूला जाहिरात विश्वात पाऊल ठेवणारी पहिली भारतीय अभिनेत्री. हा विरोधाभास त्या काळी क्रांतीपेक्षा कमी नव्हता.
लक्स आणि लक्स सारखी इतर सौंदर्य प्रसाधनं आणि बॉलीवूडचं नातं आज जितकं घट्ट आहे,त्याचं बीज या एका जाहिरातीने रोवलं होतं.१९४० च्या दशकापर्यंत लक्सच्या जाहिरातींमध्ये फक्त हॉलिवूडच्या अभिनेत्री दिसायच्या.भारतीय चेहरा या ब्रँडसाठी वापरणं ही त्या काळी मोठी रिस्क मानली जात होती. पण लीला चिटणीस यांच्या मोहक सौंदर्याने हा पाश्चिमात्य पगडा एका झटक्यात मोडीत काढला.
१९४१ च्या त्या ऐतिहासिक प्रिंट जाहिरातीत लीलाजींचा एक कृष्णधवल फोटो होता. खाली मजकूर होता - " 10पैकी 9 चित्रपट तारका लक्स वापरतात." ही टॅगलाईन इतकी प्रभावी ठरली की भारतीय बाजारपेठेत लक्सने आपली मक्तेदारी निर्माण केली. या एका मोहिमेनंतर लक्सची विक्री भारतात ३०० टक्क्यांनी वाढली होती.
जाहिरात विश्वातील तज्ज्ञ आता पुन्हा एकदा 'रेट्रो मार्केटिंग' कडे वळताना दिसत आहेत. युनिलिव्हरने नुकतंच त्यांच्या आर्काइव्हमधून या मूळ जाहिरातीचं डिजिटल रिस्टोरेशन केलं आहे. सोशल मीडियावर लीला चिटणीस यांची ही ८५ वर्षांपूर्वीची जाहिरात सध्या तुफान व्हायरल होतेय.
पूर्वीच्या काळात साबण म्हणजे फक्त अंघोळीचं साधन नव्हतं, तर तो सौंदर्याचा 'पासपोर्ट' मानला जायचा. लक्सने सुरुवातीला स्वतःला 'सोप ऑफ सुपरस्टार्स' म्हणून प्रोजेक्ट केलं. मात्र, काळानुसार त्यांनी आपली रणनीती बदलली. आता हा ब्रँड 'सुपरस्टार बनण्यासाठी' लक्सची गरज असल्याचं सांगतो. ही ब्रँडिंगमधील मोठी झेप आहे.विचार करा, इंटरनेट आणि टीव्ही नसतानाही एका प्रिंट जाहिरातीने संपूर्ण देश व्यापला होता. आजच्या 'इन्फ्लुएन्सर' युगात आपल्याला खरंच अशा नैसर्गिक सौंदर्याची आणि अस्सल जाहिरातींची आठवण येते का?
काळ बदलला, जाहिरातींचे रंग बदलले, पण १९४१ च्या त्या साध्याशा दिसणाऱ्या जाहिरातीने भारतीय स्त्रीला जे आत्मभान दिलं, त्याची तोड आजही नाही.




