गडचिरोलीच्या दाट जंगलात पहाटे पाचची वेळ आहे. हवेत एक मंद, गोडसर आणि काहीसा मादक गंध दरवळतोय. मोहाच्या झाडाखाली पडलेली ती पांढरट-पिवळी मांसल फुलं वेचण्यासाठी आदिवासी महिलांची लगबग सुरू आहे.हे दृश्य पिढ्यानपिढ्या असंच आहे, पण आज या फुलांची किंमत आणि नशीब दोन्ही एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलंय.
एकेकाळी फक्त 'गावठी दारू' काढण्यासाठी ओळखलं जाणारं महुआ किंवा मोहाचं फूल आता जागतिक बाजारात 'सुपरफूड' म्हणून मिरवत आहे. हे मान्य करायलाच हवं की, आपण ज्या गोष्टीला वर्षानुवर्षे दुर्लक्षित केलं, तिची किंमत गेल्या एका वर्षात तब्बल तीन पटीने वाढली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारताकडून ब्रिटनला होणारी याची निर्यात एका वर्षात २५ पटीने वाढली आहे. ज्या फुलाला आपण 'देशी' म्हणून हिणवलं, ते आता लंडनच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये चवीने खाल्लं आणि प्यायलं जातंय.
ब्रिटीश राजवटीत या फुलाचा इतिहास मोठा रंजक आणि तितकाच अन्यायाचा राहिला आहे. ब्रिटीश सरकारने या फुलावर चक्क बंदी घातली होती. त्यांनीदिलेलं कारण होतं की हे फूल 'अमली' आहे, पण त्यामागचा खरा हेतू भारतीय संस्कृती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला खिळ घालण्याचा होता. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. भारत सरकार आता या फुलाला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी कंबर कसून उभं राहिलंय, कारण या फुलाच्या उत्पादनात भारताची जवळपास मक्तेदारी आहे.
महुआच्या या क्रांतीमध्ये तीन मुख्य क्षेत्रं गेमचेंजर ठरणार आहेत. पहिलं म्हणजे, महुआ लिकर. मेक्सिकोने जसं 'टकीला'ला जगाच्या नकाशावर नेलं, तसंच आता महुआ दारूला 'प्रीमियम इंडियन स्पिरिट' म्हणून सादर केलं जातंय. या कॅटेगरीमध्ये दरवर्षी २२% वाढ होत आहे. आता हे केवळ गरिबांचं पेय उरलं नसून, मोठ्या ब्रँड्सनी यात रस दाखवायला सुरुवात केली आहे.
दुसरं महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे सौंदर्य प्रसाधने. महुआच्या बियांच्या तेलापासून बनणारं 'महुआ बटर' हे सध्या जागतिक कॉस्मेटिक मार्केटमध्ये चर्चेचा विषय आहे. आफ्रिकेने त्यांच्या 'शिया बटर'च्या निर्यातीवर निर्बंध आणण्याचे संकेत दिल्याने महुआसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. आपल्या महाराष्ट्रात आणि मध्य भारतात मिळणाऱ्या या तेलाचा वापर आता महागड्या लोशन्स आणि क्रीम्समध्ये 'नॅचरल मॉइश्चरायझर' म्हणून केला जातोय.
तिसरी मोठी लाट येत आहे ती म्हणजे 'हेल्थ अँड वेलनेस' उत्पादनांची. आयुर्वेदानुसार महुआ हे श्वसनविकार, पचन आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम मानलं जातं. साखर किंवा कृत्रिम गोडव्याला पर्याय म्हणून आता महुआचा वापर जॅम, मध, सरबत आणि अगदी बेकरी उत्पादनांमध्येही केला जात आहे. हे एक नैसर्गिक स्वीटनर असल्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेल्या पिढीला ते भुरळ घालतंय.
विचार करण्यासारखं असं की, भारतात महुआची जेवढी क्षमता आहे,त्यापैकी केवळ १७% फुलांची सध्या काढणी केली जाते. उर्वरित ८३% क्षमता अजूनही दुर्लक्षित आहे. उद्योजकांसाठी ही सोन्याची खाणच म्हणावी लागेल. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद या एका फुलात आहे.
जोपर्यंत एखादी गोष्ट सातासमुद्रापार जाऊन 'सर्टिफाईड' होत नाही, तोपर्यंत आपल्याला तिची किंमत कळत हेच खरं ! एका बाजूला आपण आधुनिकतेच्या गप्पा मारतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच मातीतल्या या नैसर्गिक संपत्तीला 'बदनाम' करून ठेवतो. महुआचा हा प्रवास केवळ एका फुलाचा प्रवास नसून, भारतीय परंपरेने जागतिक बाजारपेठेत मिळवलेला सन्मान आहे. आपल्या घरामागे किंवा जंगलात पडलेलं ते साधं फूल उद्या तुमच्या महागड्या परफ्यूममध्ये किंवा डाइनिंग टेबलवर असेल, यात आता शंका उरलेली नाही.
एकेकाळी ज्याला 'बंदी' घातली गेली, तेच आता 'ब्रँड' बनतंय, यालाच विज्ञानाची आणि काळाची कमाल म्हणायचं का?



