मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जागतिक फॅशनने चोरलेल्या भारतीय संकल्पना: प्राडा आणि राल्फ लॉरेनचा 'वारसा' चोरी!

3 मिनिट वाचन

कोल्हापुरी चप्पल ते जोधपुरी ट्राउझर्स, जागतिक फॅशन ब्रँड्सनी भारतीय संस्कृतीचा वापर करून स्वतःचे लेबल कसे लावले, याचा हा पर्दाफाश.

शेअर करा:
जागतिक फॅशनने चोरलेल्या भारतीय संकल्पना: प्राडा आणि राल्फ लॉरेनचा 'वारसा' चोरी!

जागतिक फॅशनने चोरलेल्या भारतीय संकल्पना : प्राडाच्या महागड्या चपला आणि राल्फ लॉरेन झुमके म्हणजे चोरलेल्या वारशाचा हिशोब !!तुम्ही जर असा विचार करत असाल की 'लक्झरी फॅशन' ही केवळ पॅरिस आणि मिलानची देणगी आहे, तर तुम्ही पूर्णपणे चुकत आहात. जागतिक फॅशन विश्वाचा खरा पाया हा युरोपात नाही, तर भारताच्या मातीत शेकडो वर्षांपासून रचला गेला आहे. आपण ज्याला 'ब्रँडेड' समजून हजारो रुपये मोजतो, त्यातील अनेक गोष्टी प्रत्यक्षात आपल्या कोल्हापूरच्या गल्लीतून किंवा केरळच्या किनाऱ्यावरून चोरलेल्या संकल्पना आहेत.
पाश्चात्य फॅशन हाऊसेसनी भारतीय वारशाचा वापर केला, पण त्याचे श्रेय देण्याचे मात्र नेहमीच टाळले. गेल्या वर्षी इटालियन ब्रँड 'प्राडा'ने (Prada) जेव्हा ९३० डॉलर्सना (सुमारे ७७,००० रुपये) 'कोल्हापुरी चपला' विकायला काढल्या, तेव्हा जगभरात संताप व्यक्त झाला. या चपलांना त्यांनी 'म्युल्स' असे नाव दिले होते, पण त्यात कोल्हापूरचा साधा उल्लेखही नव्हता. वस्तुस्थिती अशी आहे की, हा भारताच्या बौद्धिक संपदेवर झालेला सरळ दरोडा होता

हा प्रकार काही नवीन नाही, तर हा एक शतकानुशतके चालत आलेला ट्रेंड आहे. १८९७ सालची गोष्ट आहे, जेव्हा जोधपूरचे महाराज प्रताप सिंह एका पोलो टूर्नामेंटसाठी इंग्लंडला गेले होते. त्यांच्या टीमने घातलेली राइडिंग ट्राउझर्स लंडनच्या फॅशन वर्तुळात इतकी गाजली की, ब्रिटिशांनी त्याला थेट 'जोधपुर्स' (Jodhpurs) हे नाव दिले. आज जगभरातील प्रत्येक घोडेस्वार जे कपडे घालतो, त्याचे मूळ राजस्थानच्या वाळवंटात आहे, हे किती जणांना माहित आहे?

यामागचं कारण शोधलं तर आपण १७ व्या शतकापर्यंत मागे जातो. केरळमधील कालिकत (कोझिकोड) येथून जाणारे सुती कापड इंग्लंडमध्ये इतके लोकप्रिय झाले होते की, तिथल्या स्थानिक उद्योगांना वाचवण्यासाठी ब्रिटीश सरकारने या कापडाच्या आयातीवर बंदी घालणारा कायदा करावा लागला. त्यांनी या कापडाला शहराच्या नावावरून 'कॅलिको' (Calico) असे नाव दिले. आज हे कापड जागतिक फॅशनचा अविभाज्य भाग आहे, पण त्याचे भारतीय कनेक्शन इतिहासाच्या पानात लुप्त झाले आहे.

अगदी 'बॅन्डाना' (Bandana) हा शब्द सुद्धा 'बंधन' या संस्कृत शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ 'बांधणे' असा होतो. ही आपली प्राचीन 'बांधणी' कला आहे. ही कला आधी पश्चिमेकडे गेली, तिथे काउबॉय लोकांनी ती स्वीकारली आणि ९० च्या दशकातील रॅप संस्कृतीने तिला 'कूल' बनवले. मूळ भारतीय असलेल्या या कलेला आज 'वेस्टर्न' फॅशन म्हणून ओळखले जाते, हे दुर्दैव आहे.

आकडेवारी सांगते की, भारतीय हस्तकलेचे मूल्य जागतिक बाजारपेठेत अब्जावधी डॉलर्स आहे. जेव्हा राल्फ लॉरेनने (Ralph Lauren) विनापरवाना 'झुमके' लाँच केले किंवा प्राडाने कोल्हापुरी चपला चोरल्या, तेव्हा भारतीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली झुंज कामाला आली. आजचा भारतीय ग्राहक सजग आहे आणि आपल्या संस्कृतीचे व्यापारीकरण करणाऱ्यांना जाब विचारण्याची ताकद ठेवतो.
आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली ही कला केवळ प्रदर्शन नाही, तर ती आपली ओळख आहे. आता वेळ आली आहे की, जगाने भारताला केवळ 'कच्चा माल' पुरवणारा देश न मानता, फॅशनची गंगोत्री म्हणून अधिकृत मान्यता द्यावी.आपल्या हक्काच्या कलेवर दुसऱ्यांचे लेबल लागताना पाहून आपण अजून किती काळ शांत बसणार आहोत?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

जगातील सर्वात 'कुरूप' बूट, ज्याने उभा केला अब्जावधींचा ब्रँड: क्रॉक्सची अजब यशोगाथा
लाइफस्टाइल

जगातील सर्वात 'कुरूप' बूट, ज्याने उभा केला अब्जावधींचा ब्रँड: क्रॉक्सची अजब यशोगाथा

सुरुवातीला फॅशनचा अपमान ठरवून हिणवल्या गेलेल्या क्रॉक्सने स्वतःच्या बेढबपणालाच ताकद बनवत अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य कसे उभे केले?

२४ जुलै, २०२६

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!
लाइफस्टाइल

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!

दोन रेशमी रुमालांपासून सुरू झालेला 'ब्रा'चा प्रवास आणि त्याचा जागतिक फॅशन व व्यापारावर झालेला परिणाम सांगणारा रंजक इतिहास.

३० मे, २०२६

नऊवारी ते पाचवारी साडी: राजमाता इंदिरादेवींनी घडवलेली फॅशन क्रांती
लाइफस्टाइल

नऊवारी ते पाचवारी साडी: राजमाता इंदिरादेवींनी घडवलेली फॅशन क्रांती

नऊवारी साडीची जागा पाचवारीने कशी घेतली आणि कूचबिहारच्या राजमाता इंदिरादेवींनी शिफॉन साडीला कशी प्रतिष्ठा मिळवून दिली, याचा रंजक इतिहास.

२० एप्रिल, २०२६

महुआ: एकेकाळी 'बदनाम' झालेलं फुल, आता लंडनच्या पबपासून ब्युटी पार्लरपर्यंत गाजतंय!
लाइफस्टाइल

महुआ: एकेकाळी 'बदनाम' झालेलं फुल, आता लंडनच्या पबपासून ब्युटी पार्लरपर्यंत गाजतंय!

देशी दारूसाठी ओळखले जाणारे मोहाचे फूल आता जागतिक बाजारात प्रीमियम लिकर, सुपरफूड आणि कॉस्मेटिक्ससाठी कसे गाजते आहे?

१३ जुलै, २०२६

आधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?
लाइफस्टाइल

आधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?

८० टक्के खरेदीचे निर्णय स्त्रिया घेत असतानाही जाहिरातदार आणि ब्रँड्स अजूनही स्त्रियांना दुय्यम ग्राहक का समजतात, यावर परखड भाष्य.

२ जुलै, २०२६

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!
लाइफस्टाइल

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!

लोक गिफ्ट व्हाउचर्स विसरल्यामुळे किंवा मुदत संपल्यामुळे कंपन्या 'ब्रेकेज'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा नफा कसा कमावतात?

२० जून, २०२६