महिलांच्या कपड्यांमधील 'ब्रा' हा प्रकार आज आपण ज्या स्वरूपात हा कपडा पाहतो, त्याला केवळ १००-१२५ वर्षांचा इतिहास आहे. आजच्या दिवशी, म्हणजे ३० मे १८८९ रोजी, आधुनिक 'ब्रेसियर'चा पहिला प्राथमिक नमुना वापरात आला असं मानलं जातं.
पुरुषांना या कपड्याबद्दल जितकं कुतूहल असतं,तितकीच या विषयातील त्यांची माहिती शून्य असते. दुसरीकडे,स्त्रियांसाठी हा विषय 'कंटाळवाणा पण अनिवार्य' असा आहे. घराबाहेर पडताना तो एक आधार असतो, तर घरी आल्यावर तो उतरवून ठेवणे हा जगातील सर्वात मोठा सुटकेचा नि:श्वास असतो. यालाच स्त्रियांचे 'ब्रा'सोबतचे 'Love-Hate Relationship' म्हणतात.
'ब्रा'चा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही एका नावावर थांबत नाही. १९१२ मध्ये ऑट्टो टिटझलिंग नावाच्या व्यक्तीने एका ऑपेरा सिंगरसाठी हा प्रकार शोधल्याचा दावा केला जातो, पण तो खोटा ठरला. १८७४ मध्ये क्लारा क्लार्कने 'इम्प्रूव्हड कॉर्सेट' बनवले होते, जे आजच्या ब्राच्या जवळ जाणारे होते.
खऱ्या अर्थाने आधुनिक ब्राचे पेटंट १९१४ मध्ये मेरी फेल्प्स जेकबने मिळवले. तिने चक्क दोन रेशमी रुमाल आणि एक गुलाबी रिबीन जोडून हा प्रकार तयार केला होता. तिथून पुढे २० व्या शतकात या कपड्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. अमेरिका आणि युरोपमध्ये हे फॅशनचे अविभाज्य अंग बनले.
सुरुवातीला ब्राचे मोजमाप ठरलेले नसायचे. १९३० च्या दशकात पहिल्यांदा 'कप साईज' ही संकल्पना अस्तित्वात आली. 'एस. एच. कॅम्प अँड कंपनी'ने महिलांच्या स्तनांच्या आकारानुसार त्यांना A, B, C आणि D अशी अक्षरे दिली. आज हेच वर्गीकरण जगभर प्रमाण मानलं जातं.
१९४० च्या दशकात 'टोर्पेडो' आकाराच्या ब्रा प्रसिद्ध झाल्या होत्या. पुढे १९९० मध्ये प्रसिद्ध गायिका मॅडोनाने पुन्हा एकदा हा ट्रेंड आणला. तिने ब्राला अंतर्वस्त्र न ठेवता चक्क बाहेरून घालण्याचा ड्रेस बनवून फॅशन जगतात खळबळ माजवून दिली होती.
व्यापाराच्या दृष्टीने पाहिले तर हे मार्केट आज हजारो कोटींचे आहे. १९९४ मध्ये 'वंडरब्रा'ची एक जाहिरात आली होती, ज्यावर मॉडेल इव्हा हर्झिगोवाचा फोटो होता आणि खाली लिहिले होते- 'हॅलो बॉईज'. ही जाहिरात पाहून चालकांचे लक्ष विचलित झाल्यामुळे अनेक कार अपघात झाले होते, असा दावा केला जातो.
१९७७ मध्ये पहिल्यांदा 'स्पोर्ट्स ब्रा' बाजारात आली, ज्यामुळे महिला खेळाडूंचे आयुष्य सोपे झाले. त्याच वर्षी 'व्हिक्टोरियाज सिक्रेट' नावाच्या कंपनीचा जन्म झाला. ही कंपनी दरवर्षी अशा ब्रा बनवते ज्यावर हिरे जडलेले असतात. जमिले बुंडचेनने परिधान केलेल्या एका सेटची किंमत चक्क १५ दशलक्ष डॉलर्स इतकी होती.
आजच्या काळात ब्रा केवळ एक कपडा राहिलेला नाही, तर तो एक प्रचंड मोठा उद्योग आहे. शरीराची ठेवण राखण्यासाठी ती आवश्यक असली, तरी वाढत्या वयानुसार मिळणारा आधार हाच तिचा मुख्य उपयोग उरतो. तरीही, दिवसाच्या शेवटी तो हुक काढल्यानंतर मिळणारा आनंद कोणत्याही लक्झरीपेक्षा मोठा असतो, हे मात्र नक्की.
ज्या कपड्याने जागतिक अर्थकारण आणि फॅशन बदलली, त्यामागचा हा प्रवास निव्वळ सौंदर्याचा नसून सोयीचा आणि विज्ञानाचा सुद्धा आहे.एका साध्या रुमालापासून सुरू झालेला हा प्रवास आज स्मार्ट फॅब्रिक्सपर्यंत पोहोचला आहे, हे विशेष.






