मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

एका निळ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं ४७ वर्षांचं गुपित: नर्स मारिया आणि डॅनियलची भेट

4 मिनिट वाचन

एका नर्सने ४७ वर्षे जपून ठेवलेले निळे ब्लँकेट आणि त्या बाळाशी झालेली तिची हृदयस्पर्शी भेट सांगणारी एक भावूक कथा.

शेअर करा:
एका निळ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं ४७ वर्षांचं गुपित: नर्स मारिया आणि डॅनियलची भेट

एका निळ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं ४७ वर्षांचं गुपित: नर्स मारिया आणि डॅनियलची ती हृदयस्पर्शी भेट

(ही कथा AI ने बनवलेली आहे असा अनेकांचा तर्क आम्ही ऐकला आणि वाचला आहे. पण या कथेतील करुणा ही कथा खरीच असावी असा आग्रह आपले मन करते . तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा)

१९७३ ची ती हाडं गोठवणारी हिवाळ्याची रात्र.अमेरिकेतील व्हरमाँटमधल्या एका छोट्याशा हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर फक्त पांढरंशुभ्र बर्फ कोसळताना दिसत होतं. शांतता इतकी होती की, स्वतःच्या श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येईल.त्याच वेळी हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये एक १७-१८ वर्षांची मुलगी दाखल झाली. तिचे केस विस्कटलेले,डोळ्यात कमालीची भीती आणि अंगावर जखमांच्या काही खुणा होत्या. ती कोणाशीच काही बोलत नव्हती, फक्त बाळंतपणाच्या वेदनेने ती विव्हळत होती. सोबत ना कोणी नातेवाईक, ना स्वतःचं नाव सांगण्याची ताकद.

मारिया थॉमसन नावाच्या एका तरुण नर्सने त्या रात्री त्या मुलीचा हात हातात घेतला. मारियाच्या करिअरची ती नुकतीच सुरुवात होती. त्या मुलीच्या डोळ्यांतील एकटेपणा पाहून मारियाचं मन हेलावलं.रात्रभर मारिया तिच्या सोबत होती. पहाटेच्या सुमारास एका गोंडस मुलाचा जन्म झाला. बाहेर बर्फाचं वादळ शमत होतं, पण त्या मातेच्या आयुष्यातलं वादळ मात्र अजूनही कायम होतं.मारियाने त्या चिमुकल्या बाळाला एका मऊ, निळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये मायेने गुंडाळलं आणि त्याच्या कानात हळूच पुटपुटली, "बाळा, हे जग तुला कदाचित निष्ठुर वाटेल, पण तुझ्यावर प्रेम करणारं कोणीतरी नक्कीच आहे."

दुसऱ्या दिवशी सकाळी मारिया जेव्हा वॉर्डमध्ये गेली, तेव्हा तिला धक्काच बसला. ती तरुण माता कोणालाही काहीही न सांगता तिथून निघून गेली होती. तो चिमुकला जीव तिथेच एकटा पडला होता. नियमानुसार त्या बाळाला अनाथालयात पाठवण्यात आलं आणि पुढे एका जोडप्याने त्याला दत्तक घेतलं. पण जाताना मारियाने एक गोष्ट आपल्यासोबत नेली—ते निळं ब्लँकेट. तिने ते शांतपणे घडी घातलं आणि आपल्या घरी एका छोट्या लाकडी पेटीत, पलंगाखाली दडवून ठेवलं.

वर्षे सरत गेली. मारियाने त्याच हॉस्पिटलमध्ये अनेक दशकं सेवा केली, हजारो रुग्णांना बरं केलं आणि अखेर ती निवृत्तही झाली. पण ती निळी गोधडी मात्र त्या पेटीतून कधीच बाहेर आली नाही. जुन्या आठवणींची 'शिदोरी' जपून ठेवली जाते, तसंच मारियाने ते मायेचं प्रतीक ४७ वर्षे जपलं होतं. कधीतरी एकटं वाटलं की ती पेटी उघडायची, त्या कापडावरून हात फिरवायची आणि विचार करायची, "तो मुलगा कुठे असेल? कसा असेल?" तिला वाटलं होतं की हे कोडं कधीच सुटणार नाही.

तब्बल ४७ वर्षांनंतर, म्हणजेच २०२० च्या एका दुपारी मारियाच्या दारावर कोणातरी अनोळखी व्यक्तीने थाप मारली. समोर एक मध्यमवयीन गृहस्थ उभा होता, ज्याच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती. त्याचं नाव होतं डॅनियल. डॅनियलने मारियाला विचारलं, "तुम्हीच ४७ वर्षांपूर्वी त्या रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स मारिया का?" मारियाला काहीच कळेना. डॅनियलने सांगितलं की, त्याच्या दत्तक पालकांनी त्याला त्या 'दयाळू नर्स'बद्दल आणि त्या निळ्या ब्लँकेटबद्दल सांगितलं होतं. हॉस्पिटलच्या जुन्या कागदपत्रांचा मागोवा घेत तो मारियाच्या घरापर्यंत पोहोचला होता.

मारियाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने डॅनियलला घरात घेतलं आणि धावतच आपल्या बेडरूममध्ये गेली. पलंगाखालची ती जुनी पेटी बाहेर काढली आणि ४७ वर्षांपासून जपलेलं ते निळं ब्लँकेट डॅनियलच्या हातात ठेवलं. त्या कापडाचा स्पर्श होताच डॅनियलच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ज्या मायेच्या उबेत त्याने या जगातला पहिला श्वास घेतला होता, ती ऊब त्याला पुन्हा गवसली होती.

गोष्ट अशी आहे की, कधीकधी एक छोटासा निस्वार्थ निर्णय पिढ्यानपिढ्यांचं नातं जोडून ठेवतो. मारियाने ते ब्लँकेट फेकून दिलं असतं तर डॅनियलला त्याच्या भूतकाळाचा तो दुवा कधीच सापडला नसता. पण तिने ती माया जपून ठेवली होती.
एका अनोळखी बाळासाठी एका नर्सने जपलेलं ते प्रेम आणि ४७ वर्षांनंतर झालेली ही भेट, आपल्याला हेच शिकवते की जगात कितीही थंडी असली, तरी मायेची ऊब कधीच कमी होत नाही.
आपल्या आयुष्यातही अशी एखादी 'निळी गोधडी' किंवा एखादी छोटी आठवण आपण कोणासाठी जपून ठेवली आहे का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

नवऱ्याची 'चोरी' पकडणारी 'चमकदार' पावडर: अमेरिकेतील 'डिव्होर्स डस्ट' काय आहे?
लाइफस्टाइल

नवऱ्याची 'चोरी' पकडणारी 'चमकदार' पावडर: अमेरिकेतील 'डिव्होर्स डस्ट' काय आहे?

अमेरिकेत सध्या 'डिव्होर्स डस्ट' नावाचे ग्लिटर चर्चेत आहे. फसवणूक करणाऱ्या जोडीदाराला पकडण्यासाठी महिला या अजब क्लृप्तीचा वापर करत आहेत.

१८ फेब्रुवारी, २०२६

सीआयएच्या अधिकाऱ्याने चोरल्या ३३५ कोटींच्या सोन्याच्या लगडी; फोर्ट नॉक्सवर प्रश्न!
राजकारण

सीआयएच्या अधिकाऱ्याने चोरल्या ३३५ कोटींच्या सोन्याच्या लगडी; फोर्ट नॉक्सवर प्रश्न!

अमेरिकेच्या माजी सीआयए अधिकाऱ्याच्या घरात सापडलेल्या ३३५ कोटींच्या सोन्याच्या लगडी आणि फोर्ट नॉक्सच्या सुरक्षेवर उठलेले प्रश्न.

२ जून, २०२६

वर्णभेद समजून घेण्यासाठी या गोऱ्या माणसाने स्वतःच्या शरीराचा रंग बदलून टाकला
लाइफस्टाइल

वर्णभेद समजून घेण्यासाठी या गोऱ्या माणसाने स्वतःच्या शरीराचा रंग बदलून टाकला

वर्णभेदाचे चटके अनुभवण्यासाठी स्वतःची त्वचा काळी करून 'ब्लॅक लाईक मी' हे अजरामर पुस्तक लिहिणाऱ्या जॉन हॉवर्ड ग्रिफिन यांची थरारक कथा.

१७ जून, २०२६

जगभरात भारतीयांचा तिरस्कार का होतो? आर्थिक प्रगती की नागरी शिस्त?
लाइफस्टाइल

जगभरात भारतीयांचा तिरस्कार का होतो? आर्थिक प्रगती की नागरी शिस्त?

परदेशात भारतीयांच्या वाढत्या संपत्तीमुळे आणि प्रभावामुळे स्थानिकांमध्ये निर्माण होणाऱ्या आर्थिक असुरक्षिततेचा घेतलेला आढावा.

१८ फेब्रुवारी, २०२६