नवर्याची 'चोरी' पकडणारी 'चमकदार' पावडर: अमेरिकेतील 'डिव्होर्स डस्ट' ! काय प्रकार आहे हा ?
डेटिंग ॲप वापरणाऱ्या तब्बल ६५ टक्के व्यक्ती आधीच कोणत्या ना कोणत्या रिलेशनशिप असतात किंवा विवाहित असल्याचे लपवत असतात, असा एक धक्कादायक खुलासा अमेरिकेतील एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.ही आकडेवारी वाचून कोणाचेही डोके चक्रावून जाईल, पण याच समस्येवर अमेरिकन महिलांनी एक अजब आणि तितकाच 'चमकदार' तोडगा शोधून काढला आहे.
गेल्या वर्षभरापासून अमेरिकन सोशल मीडियावर एका विशिष्ट सौंदर्यप्रसाधनाची प्रचंड चर्चा आहे, ज्याला नाव देण्यात आलंय — "डिव्होर्स डस्ट" (Divorce Dust). आता तुम्ही म्हणाल, पावडरचा आणि घटस्फोटाचा काय संबंध? पण मंडळी, ही साधीसुधी पावडर नाही, तर हा एक 'स्मार्ट ट्रॅप' आहे.
गोष्ट अशी आहे की, जेव्हा एखादी तरुणी एखाद्या अनोळखी पुरुषासोबत डेटवर जाते आणि तिला शंका येते की हा पठ्ठ्या आधीच विवाहित असावा, तेव्हा ती हे 'डिव्होर्स डस्ट' नावाचं ग्लिटर अंगाला लावून जाते. हे ग्लिटर दिसायला अत्यंत आकर्षक असलं, तरी त्याचा गुणधर्म मात्र भयंकर आहे. हे ग्लिटर शरीरावरून दुसऱ्याच्या कपड्यांवर अगदी सहजपणे ट्रान्सफर होतं.
आता इथे ट्विस्ट आहे. डेट दरम्यान तो पुरुष जर थोडा जास्त जवळ आला,तर हे ग्लिटर त्याच्या शर्टवर, कोटावर किंवा हातावर चिकटतं. गंमत म्हणजे, हे ग्लिटर एकदा कपड्यांना लागलं की ते सहजासहजी निघत नाही. याला 'Herpes of the crafts world' असंही म्हटलं जातं, कारण ते एकदा लागलं की पिच्छा सोडत नाही. असा तो पुरुष जेव्हा घरी जातो, तेव्हा त्याच्या कपड्यांवरची ती चमक त्याच्या पत्नीला स्पष्ट संदेश देते की, "तुमचा नवरा तुम्हाला फसवतोय." एका अर्थाने, ही पावडर म्हणजे फसवणूक करणाऱ्या पुरुषांच्या चोरी पकडणारी 'धूळ' आहे.
बरं मग, हा विषय फक्त इतकाच मर्यादित आहे का? तर मुळीच नाही. आजकालच्या या 'कन्झ्युमरिझम'च्या युगात कंपन्यांनी याही पुढे जाऊन विचार केला आहे. मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये महागड्या वस्तूंची चोरी रोखण्यासाठी आता 'UV चोरी-प्रतिबंधक पावडर' आणि जेल वापरले जात आहेत.
ही पावडर साध्या डोळ्यांना दिसत नाही, पण जर कोणी त्या वस्तूला हात लावला, तर ती पावडर त्याच्या हाताला लागते. नंतर जेव्हा संशयिताचे हात अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाशात तपासले जातात, तेव्हा त्याचे हात चकाकायला लागतात आणि चोर रंगेहात पकडला जातो. म्हणजे काय, तर आता तंत्रज्ञान आणि सौंदर्यप्रसाधने दोन्ही मिळून 'गुप्तहेर' बनली आहेत.
विशेष म्हणजे, जर तुम्ही आज 'नायका' (Nykaa) सारख्या भारतीय ब्यूटी मार्केटप्लेसवर जाऊन "डिव्होर्स डस्ट" शोधलं, तर तिथे "No results found" असं दिसेल. याचा अर्थ असा नाही की भारतात फसवणूक होत नाही, तर याचा अर्थ असा की भारतीय ब्यूटी ब्रँड्ससाठी ही एक मोठी मार्केटिंग संधी आहे.
नात्यात विश्वास असावा हेच खरं, पण जेव्हा विश्वास डळमळीत होतो, तेव्हा अशा 'चमकदार' क्लृप्त्या बाजारपेठ काबीज करतात.ज्या नात्यात पारदर्शकता नसते, तिथे सत्याचा उजेड पाडण्यासाठी शेवटी अशा कृत्रिम चमकीचाच आधार घ्यावा लागतो.






