मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

छापून आलेली प्रत्येक गोष्ट सत्य मानण्याची सवय किती धोकादायक? बाथटब हॉक्सची कथा!

3 मिनिट वाचन

१९१७ मध्ये पत्रकार एच. एल. मेन्केन यांनी रचलेली बाथटबची खोटी बातमी वर्षानुवर्षे सत्य का मानली गेली, हे सांगणारा बोधप्रद लेख.

शेअर करा:
छापून आलेली प्रत्येक गोष्ट सत्य मानण्याची सवय किती धोकादायक? बाथटब हॉक्सची कथा!

छापून आलेली (आणि आता समाज माध्यमावर वाचनात येणारी) प्रत्येक गोष्ट सत्य मानण्याची समाजाची सवय किती धोकादायक असू शकते हे सांगणारी “बाथटब हॉक्स”ची कथा !
अमेरिकेत एच. एल. मेन्केन नावाचे उपरोधिक लेखक आणि समाजावर स्पष्ट शब्दात टिका करणारे पत्रकार होते.१९१७ साली त्यांनी एक अतिशय गाजलेला आणि आजही पत्रकारितेच्या इतिहासात चर्चिला जाणारा खोडसाळ लेख लिहिला—.
नेमकं काय होतं हे या लेखात ?

मेन्केन यांनी New York Evening Mail या वृत्तपत्रात एक लेख प्रकाशित केला. त्या लेखात त्यांनी असा दावा केला की-अमेरिकेत बाथटब ही गोष्ट फार उशिरा आली,सुरुवातीला डॉक्टर आणि समाज यांचा बाथटबला कडाडून विरोध होता,काही शहरांत बाथटबवर बंदी होती,राष्ट्राध्यक्ष मिलार्ड फिलमोर यांनी व्हाइट हाऊसमध्ये पहिला बाथटब बसवला आणि त्यामुळे तो “समाज मान्य” झाला. हे सगळं त्यांनी इतिहासासारखं, तपशीलांसह आणि अत्यंत विश्वासार्ह भाषेत मांडलेलं होतं.

आता यात खोटं काय होतं ? खरं तर, या लेखातील बहुतेक सगळी माहिती बनावट होती.लोक किती सहजपणे “छापील शब्दावर” विश्वास ठेवतात, हे दाखवण्यासाठी मेन्केन यांनी हा लेख मुद्दाम खोडसाळपणे लिहिला होता—
पुढे गंमत काय झाली?
१ अनेक नामांकित वृत्तपत्रांनी हा लेख तपासणी न करता पुन्हा छापला.
२ इतिहासकार, राजकारणी आणि “तज्ज्ञ” लोकांनीही हे “तथ्य” म्हणून स्वीकारलं.
३ वर्षानुवर्षे बाथटबच्या इतिहासाबद्दल लिहिताना ही खोटी माहिती वापरली गेली.

मग सत्य कधी बाहेर आलं?
काही वर्षांनंतर मेन्केन यांनी स्वतःच कबूल केलं की हा लेख पूर्णपणे हॉक्स (फसवणूक) होता. तेव्हा त्यांनी उपरोधिकपणे म्हटलं की, लोकांना जे वाचायला छापून मिळतं, त्यावर विश्वास ठेवायला फार आवडतं!

आपण काय बोध घ्यायचा ?“बाथटब हॉक्स” हा केवळ एक विनोद नव्हता.एखादी गोष्ट आत्मविश्वासाने, भरपूर तपशीलांसह आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन सांगितली म्हणून ती खरी ठरत नाही.कधी कधी खोटे इतके व्यवस्थित सजवलेले असते की ते सत्यापेक्षाही अधिक विश्वासार्ह वाटते.आणि म्हणूनच एखादी बातमी ,एखादा लेख वाचून झाला की फॉरवर्ड करण्यापूर्वी आपणच आपल्याला एक साधा प्रश्न विचारायचा .“मी हे वाचले आहे; पण ते तपासले आहे का?”

फॉरवर्ड करण्याच्या सवयीवर बोभाटाने एक वेगळी पण पूरक Think Twice संकल्पना मांडली आहे. तो लेख आपण शनिवारी वाचूया !

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!
लाइफस्टाइल

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!

नवरात्रीनिमित्त भारताच्या वस्त्रवैभवाचा वेध: नर्मदा काठच्या महेश्वरमधील ऐतिहासिक महेश्वरी साडी आणि राणी अहिल्याबाईंचे योगदान.

११ ऑक्टोबर, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६