मानवी शरीरातील अंडकोषांची म्हणजे आपण रोजच्या बोलीभाषेत 'गोट्या' म्हणतो त्याची वैद्यकीय किंवा काळ्या बाजारातली किंमत शून्य रुपये आहे, तरीही या असल्या खोट्या दाव्यामुळे एका १७ वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला.भोपाळमध्ये घडलेली ही घटना सोशल मीडियावरील अंधश्रद्धेचा आणि चुकीच्या माहितीचा सर्वात भीषण चेहरा समोर आणते.
भोपाळमधील इक्बाल मैदान आणि मोती मशीद परिसरात पेन आणि की-चेन विकणाऱ्या रेहानची हत्या केवळ एका इन्स्टाग्राम रीलमुळे झाली. वडिलांच्या निधनानंतर रेहान आपल्या आईला घर चालवण्यासाठी हातभार लावत होता. त्याची आई सफाई कामगार म्हणून काम करून संसाराचा गाडा ओढत होती.६ ऑगस्ट रोजी दोन अल्पवयीन मुलांनी रेहानला गाठले. त्याला मदतीचे आमिष दाखवण्यात आले. केवळ १०० रुपयांसाठी रेहान त्यांच्यासोबत एका निर्जन ठिकाणी गेला आणि तिथेच त्याचा घात झाला.
या भीषण गुन्ह्याचा सूत्रधार २० वर्षांचा झोहैब खान असल्याचे तपासात समोर आले आहे. झोहैब हा बी.बी.ए.चा विद्यार्थी असून तो पांढरा अॅप्रन घालून स्वतःला डॉक्टर भासवायचा. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यात मानवी अंडकोष विकून १.२ कोटी रुपये कमावता येतात असा दावा केला होता. झोहैबने या रीलवर आंधळा विश्वास ठेवला आणि आपल्या मित्रांना कोट्यधीश होण्याचे स्वप्न दाखवले. या पैशांच्या हव्यासापोटी त्यांनी रेहानवर चाकू आणि ब्लेडने हल्ला केला. हत्येनंतर त्यांनी रेहानचे अंडकोष काढून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले.
मानवी अवयव प्रत्यारोपणाच्या जगात अंडकोषांना कोणतीही मागणी किंवा आर्थिक मूल्य नाही. पण या तरुणांना वाटले की कोणीतरी 'इंटरनॅशनल बायर' येईल आणि त्यांना करोडो रुपये देऊन जाईल. खरेदीदार कधीच आला नाही आणि ते कोट्यवधी रुपये केवळ एका रीलमधले आभास ठरले.
जेव्हा कोणताही खरेदीदार मिळाला नाही, तेव्हा आरोपींनी ते शरीराचे भाग फेकून दिले. एका निष्पाप मुलाचा जीव गेला, एका आईचा आधार हरवला आणि बदल्यात आरोपींच्या हाती आले ते केवळ पोलिसांच्या बेड्या.
विश्लेषकांच्या मते, सोशल मीडियाचे अल्गोरिदम अनेकदा सत्यता न पडताळता अशा घातक माहितीचा प्रसार करतात. "व्ह्यूज" मिळवण्यासाठी बनवलेले हे व्हिडिओ वास्तवात कोणाचा तरी बळी घेऊ शकतात, याचा विचार कोणीही करत नाही.
एका इन्स्टाग्राम रीलमधून सुरू झालेला हा १.२ कोटींचा भ्रम अखेर एका मुलाच्या हत्येत बदलला. ही केवळ एका गुन्ह्याची कथा नाही, तर डिजिटल जगातील खोट्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याचे भयंकर परिणाम आहेत.
लक्षात ठेवा ,तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते, पण ती खरी मानली तर त्याची किंमत एखाद्याचा जीव असू शकते.






