सरहद्दीच्या पलीकडून येणारा शस्त्रांचा साठा - कलकत्यातील एका धनिकाचे अपहरण- आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा ९/११ हल्ल्यासोबत असलेला थेट संबंध-कलकत्त्यातल्या अमेरीकन वकिलातीवर हल्ला -आणि शेवटी यामागे असलेल्या सूत्रधाराचा आखातीदेशातून मिळवलेला ताबा - हे सगळे एकत्र सांगणारी ही कथा आहे.
याच दरम्याम सीबीआयचे काही अधिकारी राजस्थानच्या अलवारमध्ये पोहचले होते. ट्र्कचा मालक युनुस खानही त्यांच्या ताब्यात आला. त्या दिवशी रात्री ट्रक सोडून पलायन करण्यात यशस्वी झालेल्या चौघांपैकी तिघं सीबीआयच्या हातात आले, पण चौथा इसम ज्याचं नाव अख्तर होतं तो मात्र सीबीआयला चकमा देण्यात यशस्वी झाला. (तो १० वर्षांनंतर म्हणजे २०१२ साली कोर्टातच हजर झाला.)
अशबुद्दीन, अब्दुल सुभान, युनुस खान यांची चौकशी सुरु झाली. त्यातून अकीब अली खान या नव्या प्याद्याचं नाव समोर आलं. म्हणजे पुढचा नंबर अकीब अली खानचा होता. पण तो दिल्लीहून भोपाळला त्याच्या मैत्रीणीला हुमेरा फिरदौसला भेटायला गेला होता. जगदीश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक टीम भोपाळला रवाना झाली. हुमेरा फिरदौस भोपाळच्या घोडा निकास नावाच्या गजबजलेल्या वस्तीत राहात होती. दिल्लीहून अकीब अली खान त्याची सँट्रो घेऊन गेला होता. ती एका अरुंद गल्लीत पार्क केलेली दिसली, पण हुमेराचा पत्ता हातात नसल्याने रात्रभर सँट्रोवर नजर ठेवण्याखेरीज दुसरा काहीच उपाय नव्हता. सीबीआयच्या अंदाजाप्रमाणे जर तो हुमेराकडे असेल तर कधीतरी गाडीकडे येईलच, पण तो गाडी पार्क करून आणखी कुठे गेला असेल तर ...?
पण तसं काही झालं नाही. दुसर्या दिवशी एक तरुण युवक गाडीजवळ आला. पाळत ठेवणार्या अधिकार्यांना लक्षात आलं की हाच तो अकीब अली खान. पण त्या अरुंद बोळात त्याची गाडी रोखणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तो पुढे गेल्यावर थांबून उतरेल तेव्हाच त्याला पकडणं शक्य होतं. तसंच झालं. हमरस्त्यावर आल्यावर गाडी बाजूला पार्क करून तो समोरच्या फोटो स्टुडीओत घुसला. त्याच्यापाठोपाठ सीबीयआयची टीम घुसली आणि त्यांनी अकीब अली खानला जेरबंद केलं.
एकापाठोपाठ इतक्याजणांना अटक करून साखळीची एकेक कडी उलगडत गेली. पण अजून पडद्यामागचा सूत्रधार कोण हा प्रश्न तसाच लोंबकळत होता. याचाच अर्थ असा की अकीब अली खान आणखी एक नाव पुढे करणार आणि सीबीआय त्याच्यामागे शोधत राहणार हे वाचकांनी ओळखलं असेलच.
हो, तुम्ही विचार करताय तो अगदी बरोब्बर आहे. अकीब अली खानने त्याच्या बॉसचं नाव सांगीतलं - असिफ रझा खान -कलकत्त्याचा गँगस्टर. इथे स्टोरीत एक ट्वीस्ट आहे तो असा की असिफ रझा खान आधीच पोलीसांच्या ताब्यात होता.
थोडक्यात दिल्ली पोलीसांनी एका दुसर्या गुन्ह्यात अटक केलेल्या असिफ रझा खानला बोलतं करणं हे काम सोपं होतं. पण त्यातून पुढची जी कडी उलगडली त्यावर नाव होतं 'आफताब अन्सारी'! कलकत्त्याच्या खादीम शूजच्या मालकाला-पार्थ रॉय बर्मन-ला किडनॅप करून चार कोटींची खंडणी वसूल करणारा आफताब अन्सारी! राजकोटच्या भास्कर पारेख नावाच्या हिरे व्यापार्याला किडनॅप करून काही कोटींची खंडणी वसूल करणारा, या खंडणीचा एक हिस्सा अमेरिकेतील ९/११ च्या एका मुख्य अतिरेक्याला - मोहम्मद अट्टाला पोहचवणारा आफताब अन्सारी!
आता आफताब अन्सारीचं आणि असिफ रझा खानचं नाव समोर आल्यावर अनेक मोठ्या गुन्ह्याचा शोध घेणार्या पथकांचे फोन सीबीआयकडे यायला सुरुवात झाली. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीनंतर असिफ रझा खानचा ताबा दिल्ली पोलीसांनी घेतला. एकेक करून जुन्या गुन्ह्यांचे धागे उलगडत गेले. गेले जुने गुन्हे उलगडत गेले, पण सरकारी खात्यात गोंधळ झाला नाही तर ते सरकारी खातं कसलं?
दिल्लीनंतर राजकोट पोलिसांनी असिफ रझा खानला ताब्यात घेतलं. राजकोट पोलीसांच्या चौकशीदरम्यान असिफ रझा खानने हे कबूल केलं की तो एक जिहादी आहे. पाकिस्तानात जाऊन त्यानी अतिरेकी संघटनांच्या ट्रेनिंग कँपमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. अशाच एका कँपमध्ये भारतीय संसदेवर हल्ला करण्याचा प्लॅन शिजतो आहे असं त्याच्या कानावर पडल्याचंही त्यानी सांगीतलं. ही माहिती राजकोट पोलीसांनी लगेच खात्याला कळवली पण ...... ती बातमी सरकारी यंत्रणेत कुठेतरी हरवली आणि संसदेवर हल्ला झालाच!
आता पुन्हा एकदा मूळ प्रश्नाकडे येऊया. असिफ रझा खानचा बॉस आफताब अन्सारीला अटक का झाली नाही? त्याला अटक झाली नाही, कारण तो देश सोडून कधीच दुबईला पोहचला होता. आता दुबईहून त्याला परत आणणे म्हणजे सीबीआयला नव्या चक्रव्यूहात प्रवेश करावा लागणार होता. म्हणजेच ती अटक जवळजवळ शक्यच नव्हती. कदाचित तो कधीच सीबीआयच्या ताब्यात आला नसता. पण डिसेंबर २००१ मध्ये राजकोट पोलीसांच्या ताब्यात असलेल्या असिफ रझा खानने पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला. आफताब अन्सारीला दुबईहून परत आणण्याच्या सीबीआयच्या सर्व आशा मावळल्या.
पण त्यानंतर महिनाभरात असं काही घडलं की .......जे वाचण्यासाठी तुम्हाला या लेखाचा पुढचा भाग वाचावा लागेल!
तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा






