मनात राग खदखदतोय ? संताप व्यक्त करायचाय ? तुच्छता दाखवायची आहे ? आता न लाजता - न घाबरता बिनधास्त शिव्या द्या कारण शिवीगाळ म्हणजे 'अश्लीलता' नाही?
शिवी देणारा माणूस आपल्याला संस्कारहीन वाटतो, पण तो कायद्याच्या नजरेत गुन्हेगार ठरतोच असं नाही. सार्वजनिक ठिकाणी उच्चारलेला प्रत्येक घाणेरडा शब्द तांत्रिकदृष्ट्या 'अश्लील' (Obscene) नसतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
हे प्रकरण तमिळनाडूतील ऑगस्ट २०१७ मधील एका जमिनीच्या वादातून सुरू झालं होतं. मणी नावाच्या आरोपीने तक्रारदाराला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. या प्रकरणात आरोपीने वापरलेले शब्द 'अश्लील' होते का, हा कळीचा मुद्दा होता.
न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने यावर ऐतिहासिक भाष्य केलं. कायद्याच्या भाषेत 'अश्लीलता' ही 'असभ्यता' किंवा 'शिवीगाळ' यापेक्षा पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे. केवळ संताप व्यक्त करण्यासाठी वापरलेले शब्द गुन्हेगारी अश्लीलतेच्या कक्षेत येत नाहीत. आयपीसी (IPC) कलम २९४(ब) नुसार गुन्हा सिद्ध होण्यासाठी काही अटी पूर्ण होणं आवश्यक असतं. ते शब्द केवळ घाणेरडे असून चालत नाही, तर ते कामुक असावेत किंवा ऐकणाऱ्याच्या मनात विकृती निर्माण करणारे असावेत. यालाच कायद्याच्या भाषेत 'प्रुरियंट इंटरेस्ट' असं म्हटलं जातं.न्यायालयाने स्पष्ट केलं की, शिवीगाळ ऐकून एखाद्याला धक्का बसू शकतो किंवा तिरस्कार वाटू शकतो. पण केवळ धक्का बसला म्हणून त्या शब्दांना 'अश्लील' ठरवून शिक्षा देता येणार नाही. अश्लीलता सिद्ध करण्यासाठी ते शब्द ऐकणाऱ्याला भ्रष्ट किंवा विकृत करण्याची क्षमता ठेवतात का, हे पाहणं गरजेचं असतं.
आपल्या महाराष्ट्रातही ग्रामीण भागात किंवा रागाच्या भरात अनेकदा शिव्यांचा वापर सहजतेने होतो. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता 'शिवी' आणि 'गुन्हा' यातील पुसट रेषा अधिक ठळक झाली आहे. असभ्य असणं आणि कायद्याने गुन्हेगार असणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.यामागचं मुख्य कारण असं की, कायद्याची व्याख्या अतिशय सूक्ष्म आणि तांत्रिक असते. समाजात ज्याला आपण 'शिवी' म्हणतो, ती कायद्याच्या निकषांवर नेहमीच 'अश्लील' ठरत नाही. त्यामुळे केवळ शिवीगाळ केली म्हणून अश्लीलतेचा गुन्हा दाखल करणं आता कठीण होणार आहे.
सभ्यतेच्या चौकटीत शिवीगाळ नक्कीच बसत नाही, पण प्रत्येक असभ्य कृतीला तुरुंगाची हवा दाखवता येणार नाही. कायद्याची ही सूक्ष्म दृष्टी समजून घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. शेवटी, शब्दांचा वापर आपण कशासाठी करतो, यावरच त्याचं कायदेशीर भवितव्य अवलंबून असतं.
कायद्याने दिलेली ही सवलत आपण भाषेची मर्यादा ओलांडण्यासाठी वापरणार की सामाजिक सभ्यता जपण्यासाठी?






