मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

शोधसूत्र - भाग ३: सूत्रधार आफताब अन्सारी अखेर पकडला गेला

6 मिनिट वाचन

कोलकात्यातील अमेरिकन वकिलातीवरील हल्ला आणि खंडणी प्रकरणाचा मास्टरमाइंड आफताब अन्सारी सीबीआयच्या जाळ्यात कसा अडकला?

शेअर करा:
शोधसूत्र - भाग ३: सूत्रधार आफताब अन्सारी अखेर पकडला गेला

२२ जानेवारी २००२. -दिल्लीत्या दिवशी सकाळी भारतभेटीवर आलेल्या एफबीआयचे डायरेक्टर रॉबर्ट म्युलर यांच्या स्वागतासाठी सीबीआयने एक ब्रेकफास्ट मिटींग आयोजीत केली होती. या मिटींगला सीबीयसह गृह खात्याचे उच्च अधिकारी पण उपस्थित होते.नीरजकुमार यांनाही या मिटींगचे आमंत्रण होते.त्यांच्या शेजारी गृह खात्याचे सचिव कमल पांडे बसले होते. मिटींग सुरु झाली आणि थोड्याच वेळात कमल पांडे यांचा सहाय्य्क आत आला. त्यानी वाकून हलक्या आवाजात कमल पांडे यांना सागीतलं ' सर, कलकत्त्यातील अमेरीकन वकीलातीवर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे'. ' फरहान मलीक' नावाच्या एका अतिरेक्याने हा हल्ला केल्याचा संशय आहे ' नीरजकुमार गृहसचिवांच्या बाजूस बसलेले असल्याने त्यांच्या कानावर पण हा निरोप पडला. वरीष्ठांची परवानगी घेऊन ते मिटींगच्या बाहेर पडले आणि सीबीआयच्या मुख्यालयात पोहचले.
पहिला फोन त्यांनी कलकत्त्याच्या राजीव कुमारना ( सीआयडी) केला. राजीव कुमार आणि नीरज कुमार यांनी 'बर्मन किडनॅपींग' केसचा तपास सोबत केला होता. राजीव कुमार यांच्याकडून त्यांना माहिती कळली ती अशी की त्या दिवशी सकाळच्या वेळेस मोटरसायकलवरून आलेल्या अतिरेक्यांनी अमेरीकन वकीलातीच्या प्रवेशद्वारावर गोळ्यांच्या फैरी झाडल्या होत्या. शिफ्ट बदलाची वेळ होत असताना हे घडल्यामुळे पोलीस नि:शस्त्र होते. त्यामुळे हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याआधीच चार पोलीस गतप्राण झाले होते. हा हल्ला झाल्यावर काहीच मिनिटात राजीव कुमार यांच्या घरच्या फोनची घंटी वाजली.फोनवर बोलणार्‍या 'फरहान मलीक' नावाच्या इसमाने त्यांना हल्ल्याची माहिती देऊन आपली संघटना हल्ल्याची जबाबदारी स्विकारत असल्याचा निरोप दिला.

पण तो आवाज राजीव कुमार यांच्या ओळखीचा होता.या पूर्वी कलकत्त्याच्या खादीम शूजचे मालक पार्थ प्रतीम रॉय बर्मन यांचे अपहरण करून चार कोटीची खंडणी वसूलणार्‍या आफताब अन्सारीचा तो आवाज होता. 'फरहान मलीक' हे नाव ऐकल्यावर त्याला उत्तर देताना राजीव कुमार यांनी त्याच्या खर्‍या नावाचा म्हणजे आफताब अन्सारीचा उल्लेख केल्यावर तो फोन कट झाला.हा आवाज त्यांच्या ओळखीचा होता.'बर्मन'अपहरणाच्या खंडणी मागण्याच्या अनेक तासाच्या कॉलचे रेकॉर्डींग राजीव कुमार आणि नीरज कुमार या दोघांनीही अनेक वेळा ऐकले होते. साहजिकच सकाळी आलेल्या इसमाने ' मी फरहान मलीक बोलतोय ' म्हटल्यावर तो आवाज आफताब अन्सारीचा आहे हे त्वरीत त्यांच्या लक्षात आलं.राजीव कुमार आणि नीरज कुमार यांच्या चर्चेनंतर त्यांनी पुढचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरवला.

त्या प्लॅनप्रमाणे नीरज कुमार यांनी राजीव कुमार यांच्या लँडलाईनवर फोन करणार्‍या व्यक्तीचा फोन नंबर मिळवण्याची खटपट सुरु झाली. दुसरीकडे त्यांनी हैद्राबादच्या पासपोर्ट अधिकार्‍यांना फोन लावला. आफताब अन्सारीचा मूळ भारतीय पासपोर्ट हैद्राबादमधून दिला गेला होता. त्या पासपोर्टची फाईल मागवण्यात आली. इकडे ज्या फोन नंबर वरून राजीव कुमार यांना फोन आला होता तो फोन नंबर तोच होता जो पार्थ प्रतीम बर्मनच्या खंडणी प्रकरणात वापरला गेला होता.म्हणजे हल्ला घडवून आणणारा सूत्रधार दुसरा कोणी नाही तर 'आफताब अन्सारी'च आहे हे पक्के झाले.

आता पुढची व्यूहरचना फारच महत्वाची होती.आतापर्यंत आफताब अन्सारीने जे काही केले ते भारत सरकार विरुध्द केले होते पण त्या दिवशी म्हणजे २२ जानेवारीला अमेरीकन वकीलातीवर हल्ला करून त्याने अमेरीकन सरकारविरुध्द पण हल्लाबोल केला होता. याचा फायदा घेऊन आता अमेरीकन सरकारच्या मार्फत दुबईच्या सरकारवर दबाव आणणे थोडे सोपे झाले होते. पण असा दबाव आणण्यासाठी नीरजकुमार यांचा हुद्दा पुरेसा नव्हता. हे प्रकरण परराष्ट्र खात्याच्या पातळीवरचे होते. दुपारपर्यंत हैद्राबादवरून आफताब अन्सारीच्या पासपोर्ट अर्जाची फाईल दिल्लीला पोहचली.तोपर्यंत संयुक्त अरब अमीरातीच्या प्रतिनिधींना आफताब अन्सारीचा फोन नंबर कळवून त्याच्यावर लक्ष ठेवण्याची विनंती अमीरातीत असलेल्या भारतीय दूतावासाला करण्यात आली.

तरीपण हे जे केले ते पुरेसे नव्हते . वकीलातीवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण ताजे असेपर्यंतच पुढे काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते. नीरज कुमार यांनी या सर्व प्रकरणाची फाईल बनवून सीबीआयच्या डायरेक्टर यांच्यासमोर सादर केली. २६/२७ ऑक्टोबरच्या रात्री गुजरात सीमेवरून जप्त केलेला शस्त्रसाठा- असीफ रझा खानचा एनकाउंटर- अमेरीकन वकीलातीवरचा हल्ला - आफताब अन्सारीचा आलेला फोन असे सगळे मुद्दे गुंफून त्या फाईलमध्ये आफताब अन्सारीच्या उद्योगांची यादी जोडण्यात आली.त्यासोबत नीरज कुमार यांणि असेही म्हटले की या आफताब अन्सारीला वेळीच पकडले नाही तर हा दुसरा 'दाऊद इब्राहीम' होण्याची शक्यता आहे. त्यांची ही भीती अवाजवी नव्हती हे पुढच्या काही दिवसातच सिध्द झाले पण आपण आता २२ जानेवारीच्या घडामोडींवरच लक्ष केंद्रीत करू या.

त्यानंतरच्या काही तासात वेगवान म्हणता येतील अशा हालचाली झाल्या.त्याचा वेग सरकारी कामकाजाला न शोभणारा होता. सीबीआयचे डायरेक्टर थेट पंतप्रधानांच्या कार्यालयात गेले.पंतप्रधानांना या प्रकरणाची पूर्ण माहिती देण्यात आली.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पराराष्ट्र खात्याचे सचिव ब्रजेश मिश्रा यांना बोलावून अमेरीकन सरकारसोबत बोलणी करायचा आदेश दिला. हे सगळे होता होता संध्याकाळ झाली होती.
रात्री आठ वाजता नीरज कुमार घरी पोहचत आहेत तोच त्यांना परराष्ट्र खात्यातून फोन आला आणि आफताब अन्सारीची फाईल दिल्लीतल्या अमेरीकन वकीलातीकडे सोपवण्याचा आदेश देण्यात आला. नीरज कुमार यांनी त्वरीत ती फाईल दिल्लीतल्या अमेरीकन वकीलातीत पोहचवली.आता फक्त अमेरीकन सरकार काय करते याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.या दरम्यान एक आठवडा निघून गेला.

५ फेब्रुवारी २००२ .
दिल्लीच्या सीबीआयच्या मुख्यालयात सीबीअयचे डायरेक्टर , इतर वरीष्ठ अधिकारी आणि जॉइंट इंटेलीजन्स कमीटीची मिटींग सुरु होती.अचानक नीरज कुमार यांचा मोबाईल वाजला. अरब अमिरातीतील भारतीय वकीलातीतून थेट भारतीय राहदूत के.सी. सिंग यांचा फोन होता. त्यांनी एकाच वाक्यात नीरज कुमार यांना निरोप दिला
" आप का बंदा पकड लिया है, आप जल्दी दुबई आ जाओ "
अनेक वर्षं हुलकावणी देणारा आफताब अन्सारी अखेर पकडला गेला होता.
वाचकहो, कहाणी इथे संपत नाही. आफताब अन्सारीला पकडून भारतात आणेपर्यंत प्रत्येक दिवस जोखमीचा होता. गुन्हेगारांचे आंतरराष्ट्रीय हस्तांतरण हा एक मोठा झमेला असतो.कोणत्या क्षणाला माशी शिंकेल ते सांगता येत नाही.यापुढची कथा ऐकण्यापूर्वी या दोन्ही भागात वारंवार जो पार्थ प्रतीम रॉय बर्मनच्या किडनॅपींगचा उल्लेख झाला आहे ते प्रकरण आणि आफताब अन्सारीचा गुन्हेगारीतला उदय हे आम्ही पुढच्या भागात सांगणार आहोत.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

पत्रकारितेचा विद्यार्थी ते कुख्यात जिहादी: आफताब अन्सारीचा गुन्हेगारी प्रवास
राजकारण

पत्रकारितेचा विद्यार्थी ते कुख्यात जिहादी: आफताब अन्सारीचा गुन्हेगारी प्रवास

बीएचयूमधून शिकलेला आफताब अन्सारी खंडणीखोर बनून तिहार जेलमध्ये पोहोचला आणि तिथून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा म्होरक्या कसा बनला?

२५ जुलै, २०२६

शोधसूत्र: आफताब अन्सारी ची गेम खल्लास - शेवटी भारत सरकारच्या ताब्यात आला
राजकारण

शोधसूत्र: आफताब अन्सारी ची गेम खल्लास - शेवटी भारत सरकारच्या ताब्यात आला

दुबई पोलिसांशी चतुर मुत्सद्देगिरी करत सीबीआयने कुख्यात दहशतवादी आफताब अन्सारीला भारतात कसे आणले, याची अखेरची रोमहर्षक कथा.

२७ जुलै, २०२६

जगभरातल्या गुन्हेगारांना असतो इंटरपोलच्या 'कलर कोड्स'चा धसका!
लाइफस्टाइल

जगभरातल्या गुन्हेगारांना असतो इंटरपोलच्या 'कलर कोड्स'चा धसका!

रेड कॉर्नर नोटीसव्यतिरिक्त इंटरपोल गुन्हेगार आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध रंगांच्या नोटिसा कशा वापरते ते जाणून घ्या.

२७ जून, २०२६