मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

शोधसूत्र: आफताब अन्सारी ची गेम खल्लास - शेवटी भारत सरकारच्या ताब्यात आला

5 मिनिट वाचन

दुबई पोलिसांशी चतुर मुत्सद्देगिरी करत सीबीआयने कुख्यात दहशतवादी आफताब अन्सारीला भारतात कसे आणले, याची अखेरची रोमहर्षक कथा.

शेअर करा:
शोधसूत्र: आफताब अन्सारी ची गेम खल्लास - शेवटी भारत सरकारच्या ताब्यात आला

सरहद्दीच्या पलीकडून येणारा शस्त्रांचा साठा - कलकत्यातील एका धनिकाचे अपहरण- आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा ९/११ हल्ल्यासोबत असलेला थेट संबंध-कलकत्त्यातल्या अमेरीकन वकिलातीवर हल्ला -आणि शेवटी यामागे असलेल्या सूत्रधाराचा आखातीदेशातून मिळवलेला ताबा - हे सगळे एकत्र सांगणारी ही कथा आहे.

त्या दिवशी दुबईची फ्लाइट 'हाउस फुल' झाली होती.सरकारी अधिकारी आणि तो पण सीबीआयमधला,त्यालाही दुबईच्याफ्लाइटमध्ये जागा मिळेना ? बर्‍याच प्रयत्नानंतर ऐनवेळी एक जागा मिळाली आणि नीरज कुमार दुबईला पोहचले.संयुक्त अमिरातीच्या अधिकार्‍यांची बैठक दुसर्‍या दिवशी सकाळी ठरली होती.चक्र वेगाने फिरत होती पण आधी म्हटल्याप्रमाणे हस्तांतरण हा नाजूक मामला असतो. कोणत्या क्षणी वाटाघाटी फिसकटतील हे सांगणं फार कठीण असतं.बर्‍याचवेळा हस्तांतरण करणार्‍या देशाच्या अटी विघ्न म्हणून उभ्या राहतात आणि प्रयत्नांवर पाणी फिरतं.अबू सालेम या गुन्हेगाराच्या हस्तांतरणाचे प्रकरण बघा. अबू सालेम १९९३ च्या बाँबस्फोटाच्या खटल्यातला एक गुन्हेगार आणि आरोप शाबित झालेला गुन्हेगार आहे.त्याचे हस्तांतरण बरीच वर्षे एका कलमावर अडकलेले होते. ते कलम म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा ! भारतात मृत्युदंडाची सिक्षा आहे पण पोर्तुगालमध्ये मृत्युदंडाची शिक्षा नाही.त्यामुळे अबू सालेमला फाशी देणार नाही ही अट भारताने कबूल केल्यावर त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले.

दुसर्‍या दिवशी सकाळी भारतीय दूतावासाच्या कार्यालयात भारतीय राजदूत के सी सिंग आणि नीरज कुमार यांची दुबईच्या वरीष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. दुबईच्या अधिकार्‍यांना पकडलेला आरोपी आफताब अन्सारीच आहे हे पडताळून बघायचे होते. त्यासाठी दिल्ली पोलीसांनी बनवलेली त्याच्या हाताच्या ठशांची फाईल आणि पाटण्याच्या पासपोर्ट कार्यालयाने बनवलेली अंगठ्याच्या ठशाची फाईल त्यांच्याकडे सूपूर्द करण्यात आली. त्यानंतरच्या चर्चेत त्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी आफताब अन्सारीला २३ जानेवारीलच ताब्यात घेतल्याचे सांगीतले.२३ जानेवारी म्हणजे अमेरीकन दूतावासवर केलेल्या दुसर्‍याच दिवशी आफताब अन्सारीला अटक करण्यात आली. त्याला अटक करण्यात आली तेव्हा तो दुबईच्या विमानतळावर होता. पाकिस्तानला-इस्लामाबादला- जाणार्‍या फ्लाइटची वाट बघत होता. याचाच अर्थ असा की एक दिवस उशीर झाला असता तर आफताब अन्सारी कधीच भारताच्या ताब्यात पडला नसता. २३ जानेवारीला अटक करुनही भारतीय दूतावासाला बातमी ५ फेब्रुवारीला मिळाली. याचाच अर्थ असाही होता की आफताबअन्सारीला भारताच्या ताब्यात द्यायचे अथवा नाही यावर बरेच दिवस विचार करण्यात आला होता.

६ आणि ७ फेब्रुवारीचे दिवस वाट बघण्यातच गेले.काय होणार याचे दडपण नीरजकुमार यांना सतत जाणवत होते पण ८ फेब्रुवारीला सकाळीच त्यांना काम फत्ते झाल्याची बातमी के.सी. सिंग यांनी दिली.दुबईच्या सरकारने आफताब अन्सारीला प्रत्यार्पीत करण्याचा निर्णय घेतला होता.आता फक्त एका अटीची पूर्तता बाकी होती.या गुन्हेगाराला नियमित चालणार्‍या फ्लाइटने नेण्याची मनाई करण्यात आली होती. हे अपेक्षितच होते कारण त्यांना दुबई विमानतळावर प्रत्यार्पणाची जाहिरात आणि गवगवा टाळायचा होता. त्यानुसार भारत सरकारने एक स्वतंत्र 'गल्फ स्ट्रीम' विमान दुसर्‍या दिवशी दुबईला पाठवले.नीरज कुमार यांच्या मदतीसाठी सोबत पाच अधिकारी पण पाठवण्यात आले.

१० फेब्रुवारीची सकाळ ! सकाळी १० वाजता नीरज कुमार आणि सर्व अधिकार्‍यांना दुबई विमातळाच्या फारशा न वापरल्या जाणार्‍या टर्मीनलवर नेण्यात आले. हे टर्मीनल फक्त खाजगी आणि चार्टर्ड उडाणासाठी राखीव असल्याने तिथे शुकशुकाट होता. अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर भारतीय दूतावासाचे अधिकारी आणि त्यांच्यासोबत अरबी पोषाखात दुबई पोलीस तिथे पोहचले. त्यांनी निर्देश दिल्यावर सर्वजण त्यांच्या पाठोपाठ हवाई पट्टीवर पोहचले. भारतातून आलेले 'गल्फ स्ट्रीम' जेट उड्डाणाच्या तयारीत उभे होते. नीरजकुमार वगळता बाकी सर्व अधिकार्‍यांना विमानात बसण्याची विनंती करण्यात आली.अगदी एखाद्या चित्रपटातला प्रसंग असावा तसं सगळं घडत होतं.

थोड्याच वेळात दुरून एक लक्झरी बस येताना नजरेस आली. विमानाच्या बाजूला ती थांबल्यावर त्यातून डोळ्यावर पट्टी बांधलेल्या -हातकड्या घातलेल्या दोन माणसांना खाली उतरवण्यात आलं. एक दाढीवाला धिप्पाड गृहस्थ होता तर दुसरा एखाद्या कंपनीचा मॅनेजर शोभावा असा होता. दोघांच्या डोळ्यावरच्या पट्टया काढल्यावर क्षणभर त्यांचे डोळे दिपले आणि दुसर्‍या क्षणी डोळे उघडले तेव्हा त्यांना नक्की काय घडते आहे याचा अंदाज आला. त्यांचे चेहेरे पडले. ज्या देशातून त्यांनी पलायन केले होते त्या देशाच्या कायदेशीर पकडीत सापडल्याची त्यांना जाणिव झाली. खेळ संपला होता.

काही क्षणातच एक काळी मर्सिडीज गाडी आली. त्यातून भारतीय राजदूत आणि दुबईचे अधिकारी उतरले. थोड्याच वेळात कागदपत्रांची देवाणघेवाण आणि सहीशिक्के झाले.या अधिकार्‍यांशिवाय ही मोहिम पूर्णत्वास गेलीच नसती याची जाणिव असल्याने नीरज कुमार यांनी त्यांचे आभार मानले. शिष्टाचारांची देवाणघेवाण झाली. दोन्ही गुन्हेगारांना विमानात बसवण्यात आले आणि विमान भारताच्या दिशेने झेपावले.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आफताब अन्सारीच्या सोबत दुसरा गुन्हेगार कोण होता ? दुसरा इसम होता राजू उनडकट आफताब अन्सारीचा गुन्हेगारीतला सख्खा मित्र आणि अनेक गुन्ह्यांसाठी 'वॉन्टेड लिस्ट' चा मानकरी राजू उनडकट ! आफताब अन्सारीसोबत बोनस ! दोघांना प्रत्यार्पित करून दुबई सरकारने एक डोकेदुखी कायमची संपवली होती. इकडे विमानात आणि तिकडे भारतात एक जल्लोषाचे वातावरण होते. शिस्तबध्द कायदेशीर मार्गाने दोन खतरनाक देशद्रोही गुन्हेगार भारतात आणण्यात सीबीआयला यश मिळाले होते.त्यानंतरच्या काळात आफताब अन्सारीचा खटला पुढे सुरु झाला आणि आता तो मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट बघतो आहे.

वाचकहो, ऑक्टोबरच्या एका रात्री सुरु झालेली ही कथा इथे संपली.सगळे काही 'फॅमीली मॅन' 'मद्रास कॅफे'-'सरफरोश' सारख्या अनेक चित्रपटात दाखवतात तसेच जे घडले ,ते तुमच्या समोर मांडले.फरक इतकाच आहे की आम्ही जे 'फिल्ड'वर घडते ते दाखवले. चित्रपटात याला कौटुंबीक कथेची जोड दिली जाते.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

पत्रकारितेचा विद्यार्थी ते कुख्यात जिहादी: आफताब अन्सारीचा गुन्हेगारी प्रवास
राजकारण

पत्रकारितेचा विद्यार्थी ते कुख्यात जिहादी: आफताब अन्सारीचा गुन्हेगारी प्रवास

बीएचयूमधून शिकलेला आफताब अन्सारी खंडणीखोर बनून तिहार जेलमध्ये पोहोचला आणि तिथून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा म्होरक्या कसा बनला?

२५ जुलै, २०२६

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!
लाइफस्टाइल

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!

संयुक्त अरब अमिराती आपल्या नागरिकांना लग्नासाठी १७ लाख रुपये आणि मोफत जमीन का देते? जाणून घ्या तिथल्या वेल्फेअर स्टेटची माहिती.

१९ जून, २०२६

शोधसूत्र - भाग ३: सूत्रधार आफताब अन्सारी अखेर पकडला गेला
राजकारण

शोधसूत्र - भाग ३: सूत्रधार आफताब अन्सारी अखेर पकडला गेला

कोलकात्यातील अमेरिकन वकिलातीवरील हल्ला आणि खंडणी प्रकरणाचा मास्टरमाइंड आफताब अन्सारी सीबीआयच्या जाळ्यात कसा अडकला?

२४ जुलै, २०२६