मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

एका टीव्ही शोमुळे केंद्रिय मंत्र्याला द्यावा लागला होता राजीनामा: 'जनवाणी'चा तो ऐतिहासिक ध

3 मिनिट वाचन

१९८५ मध्ये दूरदर्शनच्या 'जनवाणी' कार्यक्रमात जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने केंद्रीय मंत्री चंदूलाल चंद्राकर यांना राजीनामा द्यावा लागला होता.

शेअर करा:
एका टीव्ही शोमुळे केंद्रिय मंत्र्याला द्यावा लागला होता राजीनामा: 'जनवाणी'चा तो ऐतिहासिक ध

ही गोष्ट आहे १९८५ सालची. आज ४० वर्षांनंतर आपण उत्तरदायित्वाच्या (Accountability) गप्पा मारतो आहोत, तेव्हा 'जनवाणी' या कार्यक्रमाचा संदर्भ येणे अपरिहार्य ठरते. विनोद दुआ हे देशातील त्या काळचे पहिले मोठे टीव्ही अँकर. त्यांनी दूरदर्शनवर 'जनवाणी' नावाचा एक धाडसी प्रयोग सुरू केला होता. यात जनतेला समोर बसवून थेट मंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जात असे.

या कार्यक्रमात पाच वेळा खासदार राहिलेले आणि स्वतः एक ज्येष्ठ पत्रकार असलेले चंदूलाल चंद्राकर सहभागी झाले होते.ते त्यावेळी केंद्रीय मंत्री होते. राष्ट्रीय स्तरावर दबदबा असलेल्या चंद्राकर यांना विनोद दुआ आणि सामान्य जनतेने प्रश्नांच्या माऱ्यात असे पकडले की त्यांना साधी उत्तरे देणेही कठीण झाले. कॅमेऱ्यासमोर त्यांची झालेली ही अडचण थेट कोट्यवधी प्रेक्षकांनी पाहिली.

या घटनेचे पडसाद थेट पंतप्रधान कार्यालयात उमटले.त्यावेळी काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता. अंबिका सोनी आणि इतर काही मंत्र्यांनी राजीव गांधींची भेट घेतली. "दूरदर्शन आपल्या पैशावर चालते आणि तिथेच आपल्या मंत्र्यांचा असा अपमान होतोय," अशी तक्रार त्यांनी केली. विनोद दुआ यांनी मंत्र्यांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारले, ते अनेकांना अपमानास्पद वाटले होते.

अशा टीव्ही शो मधून सरकारची प्रतिमा डागाळली जाण्याची भीती होती. राजीव गांधींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. आपल्या मंत्र्याला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, ही बाब त्यांना खटकली. अखेर या एका कार्यक्रमातील खराब कामगिरीमुळे चंदूलाल चंद्राकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. एका मुलाखतीमुळे मंत्रिपद जाण्याचे हे भारतीय इतिहासातील दुर्मिळ उदाहरण आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, १९८५ चा 'जनवाणी' कार्यक्रम हा लोकशाहीच्या ताकदीचा पुरावा होता. सरकार कोणाचेही असो, जनतेला उत्तर देणे हे मंत्र्यांचे कर्तव्य असते. जेव्हा एखादा मंत्री आपल्या खात्याच्या कामाबद्दल अनभिज्ञ असतो, तेव्हा त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार उरत नाही, हे राजीव गांधींनी त्यावेळी कृतीतून दाखवून दिले होते.

काळ बदलला तरी जनतेचा रोष आणि उत्तरदायित्वाची मागणी बदललेली नाही. ४० वर्षांपूर्वी एका अँकरच्या प्रश्नांनी मंत्री बदलला होता, तर आज 'जनरेशन झेड' (Gen Z) च्या डिजिटल रेट्यामुळे सरकारला निर्णय बदलावे लागत आहेत. सत्ता कितीही मोठी असली तरी ती जनतेच्या प्रश्नांपुढे छोटीच असते, हेच यातून सिद्ध होते. १९८५ मध्ये विनोद दुआ यांनी जे काम एका स्टुडिओतून केले, तेच काम आज सोशल मीडिया आणि तरुणाईची रस्त्यावरील आंदोलने करत आहेत.

सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे ही लोकशाहीची गरज आहे की केवळ राजकीय नाईलाज ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख