मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भारताला २१ व्या शतकाची कवाडे उघडून देणारी ती १५० मिनिटांची चर्चा!

3 मिनिट वाचन

राजीव गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यातील १५० मिनिटांच्या बैठकीने भारतात पीसीओ, कॉम्प्युटर आणि दूरसंचार क्रांतीची मजबूत पायाभरणी कशी केली?

शेअर करा:
भारताला २१ व्या शतकाची कवाडे उघडून देणारी ती १५० मिनिटांची चर्चा!

दिल्लीचा साऊथ ब्लॉक.१९८४ सालची एक काळवंडलेली दुपार. पंतप्रधान कार्यालयात एक तरुण पंतप्रधान आणि त्यांच्या समोर अमेरिकेहून आलेला एक जिद्दी इंजिनिअर बसला होता. भेटीसाठी वेळ ठरली होती फक्त ३० मिनिटांची, पण चर्चेचा ओघ असा काही वाढला की घड्याळाचे काटे अडीच तास कधी पुढे सरकले, हे कोणालाच कळलं नाही.

हा तरुण पंतप्रधान म्हणजे राजीव गांधी आणि समोरचे इंजिनिअर होते सॅम पित्रोदा.आज २० ऑगस्ट, राजीव गांधींचा जन्मदिन.ज्या काळात भारतात टेलिफोन मिळवण्यासाठी चक्क १०-१० वर्ष वाट पाहावी लागायची, त्या काळात राजीव गांधींनी भारताला २१ व्या शतकाचं स्वप्न दाखवलं.

आज आपण 5G आणि एआयच्या गप्पा मारतोय,पण वस्तुस्थिती अशी आहे की १९८४ मध्ये टेलिफोन ही केवळ श्रीमंतांची चैन होती. शहरातल्या काही मोजक्या घरांमध्येच तो काळा खणखणणारा फोन दिसायचा. गावागावात संपर्क साधणं हे तर दिव्यच होतं. राजीव गांधींनी पित्रोदांचं म्हणणं केवळ ऐकून घेतलं नाही, तर त्यांना पूर्ण पाठबळ दिलं. त्यातूनच 'सी-डॉट' (C-DOT) या संस्थेचा जन्म झाला. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रचंड दबाव असतानाही, राजीव गांधींनी स्वदेशी तंत्रज्ञानावर भर दिला. या एका निर्णयाने भारताच्या संदेश वाहनाचे चित्रच बदलून टाकले.

खेड्यापाड्यात पोहोचलेले ते पिवळ्या रंगाचे पीसीओ (PCO) बूथ ही राजीव गांधींच्या दूरदृष्टीची पहिली पावती होती. ज्या देशाला साधी वायर जोडायला वर्ष लागायची, तिथे 'एसटीडी' (STD) सुविधेमुळे गाव आणि शहरं एकमेकांशी जोडली गेली. आजच्या 'डिजिटल इंडिया'चा पाया हा त्याच पीसीओ बूथमध्ये रचला गेला होता.

१९८० च्या दशकात कॉम्प्युटरबद्दल भारतात प्रचंड भीती होती. कॉम्प्युटर आले तर लोकांच्या नोकऱ्या जातील, अशी ओरड तेव्हाचे विरोधक करत होते. अनेकांनी तर कॉम्प्युटरला 'श्रीमंतांचं खेळणं' म्हणून हिणवलं होतं. पण राजीव गांधी ठाम होते. त्यांनी कॉम्प्युटरवरचे आयात शुल्क कमी केले आणि सॉफ्टवेअर धोरणात क्रांतिकारी बदल केले.

आज भारत जागतिक स्तरावर 'आयटी हब' म्हणून ओळखला जातो, त्यामागे याच धाडसी निर्णयांचा वाटा आहे. आकडेवारी सांगते की, जर त्यावेळी कॉम्प्युटर क्रांतीची बीजं पेरली गेली नसती, तर आज आपण सॉफ्टवेअर एक्स्पोर्टमध्ये जगात आघाडीवर नसतो.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या जयंतीनिमित्त देशभरात तंत्रज्ञान आणि युवा सक्षमीकरणावर विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.राजकीय वर्तुळात आजही त्यांच्या धोरणांवरून वाद-प्रतिवाद होत असले, तरी भारताला आधुनिकतेचा रस्ता त्यांनीच दाखवला, हे नाकारता येणार नाही.

राजकारणात हार-जीत होतच असते, पण एखादा नेता जेव्हा भविष्यात डोकावून पाहतो, तेव्हाच देशाचा चेहरामोहरा बदलतो. राजीव गांधींनी केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवण्यासाठी यंत्रणा उभी केली. आजच्या हाय-स्पीड इंटरनेटच्या युगात वावरताना, त्या काळापासून सुरु झालेला 'बैलगाडी ते उपग्रह' प्रवास थक्क करणारा आहे.

भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीचा नकाशा ज्या हातांनी कोरला, त्या आधुनिक भारताच्या शिल्पकाराला आजचा दिवस मानाचा मुजरा देण्याचा आहे.तंत्रज्ञानाचा वापर सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी कसा करता येतो, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे राजीव गांधींनी दिलेली डिजिटल दिशा !!!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख