मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अप्सरा: जेव्हा भारताने अणू विज्ञानात संपूर्ण आशियाला मागे टाकलं!

3 मिनिट वाचन

४ ऑगस्ट १९५६ रोजी भारताने तुर्भे येथे आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कार्यान्वित करून जागतिक अणू नकाशावर स्थान मिळवले.

शेअर करा:
अप्सरा: जेव्हा भारताने अणू विज्ञानात संपूर्ण आशियाला मागे टाकलं!

१९५० च्या दशकात भारत केवळ गरिबी आणि फाळणीच्या जखमांशी लढत होता.सोबत त्याच दशकात,स्वातंत्र्यानंतर अवघ्या नऊ वर्षांत भारताने अणू विज्ञानात युरोपलाही थक्क करणारी झेप घेतली. ४ ऑगस्ट १९५६ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी तुर्भे (ट्रॉम्बे) येथील अणुशक्ती केंद्रात भारताने आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कार्यान्वित केली.

ज्या काळात भारताकडे साधी सुई बनवण्याचे तंत्रज्ञान नाही असं हिणवलं जायचं, त्या काळात आपण अणुऊर्जेचा पाया रचला होता. हे यश केवळ विज्ञानाचं नव्हतं,तर ते एका नवजात राष्ट्राच्या आत्मविश्वासाचं प्रतीक होतं. या ऐतिहासिक घटनेला आता सात दशकं पूर्ण होत असताना, भारताच्या या कामगिरीचं महत्त्व आजही तितकंच प्रकर्षाने जाणवतं.

डॉ. होमी जहांगीर भाभा हे या संपूर्ण प्रकल्पाचे मास्टरमाइंड होते. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंची खंबीर राजकीय साथ लाभली होती.भारताने ही किमया जपान आणि चीनसारख्या देशांच्याही आधी करून दाखवली.विशेष म्हणजे,या अणुभट्टीचं संपूर्ण डिझाइन आणि उभारणी भारतीय शास्त्रज्ञांनी अवघ्या एका वर्षात पूर्ण केली होती.

या अणुभट्टीला 'अप्सरा' हे नाव खुद्द पंडित नेहरूंनी दिलं होतं. निळ्या रंगाच्या पाण्यातून बाहेर पडणारा तो चेरेनकोव्ह प्रकाश (Cherenkov radiation) पाहून त्यांना स्वर्गीय अप्सरेची आठवण झाली असावी. ब्रिटनने या प्रकल्पासाठी इंधन पुरवलं होतं, पण तंत्रज्ञान आणि बुद्धी पूर्णपणे भारतीय होती. या एका घटनेने भारताला जागतिक अणू नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिलं.अप्सरा केवळ एक यंत्र नव्हतं. ते भारताच्या स्वावलंबनाचं पहिलं मोठं पाऊल होतं. या अणुभट्टीमुळे भारतात रेडिओ आयसोटोप्सची निर्मिती सुरू झाली.याचा फायदा पुढे वैद्यकीय क्षेत्रात आणि कृषी संशोधनात मोठ्या प्रमाणावर झाला. आज भारत अणू ऊर्जेत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, त्याचं मूळ याच 'अप्सरा' मध्ये दडलेलं आहे.

आजच्या दिवशी कार्यान्वित झालेली ही अणुभट्टी २० जानेवारी १९५७ रोजी राष्ट्रार्पण करण्यात आली.

अनेक पाश्चात्य देशांना वाटलं होतं की भारत या तंत्रज्ञानाचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी करेल. पण भारताने पहिल्या दिवसापासून अणू ऊर्जेचा वापर शांततेसाठी करण्याचं धोरण ठेवलं. डॉ. भाभा यांनी अणुभट्टीच्या उद्घाटनावेळी हे स्पष्ट केलं होतं. भारताची ही दूरदृष्टी आजही जगासाठी एक आदर्श मानली जाते.

आजच्या काळात आपण जेव्हा मोठ्या गप्पा मारतो, तेव्हा १९५६ सालचा हा चमत्कार विसरून चालणार नाही. कोणत्याही प्रगत संगणकाशिवाय आणि मर्यादित संसाधनांत भारतीय शास्त्रज्ञांनी हे साध्य केलं होतं. यामागचं कारण म्हणजे त्यांची विज्ञानाप्रती असलेली निष्ठा आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द.
विज्ञानाची ही कमाल आजही आपल्याला प्रेरणा देते. ७० वर्षांपूर्वी आपण आशियातलं पहिलं पाऊल टाकलं होतं, आज आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलो आहोत. हा प्रवास 'अप्सरा' पासून सुरू झाला होता, हे विसरून कसं चालेल?
आपण आपल्या पूर्वजांच्या या वैज्ञानिक वारशाचा योग्य सन्मान राखलाच पाहिजे !!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख