काल भारताने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात आणखी एक सोन्याचे पान जोडले आहे. हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस या स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘विक्रम-1’ या भारतातील पहिल्या खासगी रॉकेटचे सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी उड्डाणानंतर भारतात खासगी अंतराळ उद्योगाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
खासगी अंतराळ उद्योगाचा हा पहिला प्रयोग नाही. या उद्योगाची सुरुवात २०२२ साली भारतातील पिक्सेल या 'स्टार्ट-अप' कंपनीने केली होती.पिक्सेल ही कंपनीने बिट्स पिलानी मधून इंजिनिअरिंग करून बाहेर पडलेले दोन इंजिनिअर क्षितिज खंडेलवाल आणि आवेश अहमद यांनी स्थापन केली आहे.२०२२ साली पिक्सेल या कंपनीने एलन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीच्या मदतीने आपला पूर्ण क्षमतेचा स्पेस 'शकुंतला' नावाचा उपग्रह आकाशात सोडला होता.
आता साहजिकच प्रश्न असा उभा राहतो की एकाच क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्कायरूट एरोस्पेस आणि पिक्सेल यांच्या कामात काय फरक आहे? स्कायरूट एरोस्पेस आणि पिक्सेल यांच्यातील मूलभूत फरक असा आहे की स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी उपग्रह आणि इतर पेलोड अवकाशात नेणारी प्रक्षेपण वाहने (रॉकेट्स/Launch Vehicles) विकसित करते, तर पिक्सेल ही कंपनी अवकाशात कार्य करणारे उपग्रह (Satellites) तयार करते. सोप्या भाषेत सांगायचे तर, स्कायरूट एरोस्पेस ही "वाहतूक करणारी" कंपनी आहे, तर पिक्सेल ही "वाहून नेल्या जाणाऱ्या उपग्रहांची निर्मिती करणारी" कंपनी आहे.
'शकुंतला' ही केवळ एक उपग्रह नव्हता. तो भारताच्या अंतराळ क्रांतीचा 'पाथफाइंडर'म्हणजे नव्या मार्गाचा मार्गदर्शक होता.१५ किलोपेक्षा कमी वजनाचा हा छोटासा क्युबसॅट (CubeSat) चक्क १५० हून अधिक रंगांच्या छटांमध्ये पृथ्वीचे हाय-रिझोल्यूशन फोटो टिपत होता.
पिक्सेलच्या 'हायपरस्पेक्ट्रल' तंत्रज्ञानामुळे साध्या डोळ्यांना न दिसणारी मिथेन वायूची गळती असो, जंगलांची कत्तल असो किंवा पिकांवर पडलेली कीड; शकुंतलाची नजर सगळीकडे होती. ६१९ दिवस अवकाशात राहून या उपग्रहाने जे डेटा संकलन केलं.त्यानंतर आज पिक्सेलचे 'फायरफ्लाय' (Firefly) मालिकेतील सहा उपग्रह अवकाशात कार्यरत आहेत.
शकुंतलाने पेरलेल्या बीजामुळेच आज पिक्सेल १०० दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी जागतिक गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहे.
एका छोट्या स्टार्टअपच्या प्रयोगातून सुरू झालेला हा प्रवास आज भारताला जागतिक 'स्पेस-हब' बनवण्याच्या दिशेने नेतोय. शकुंतला आता अवकाशात नसली, तरी तिने दिलेला डेटा आजही भारताच्या कृषी आणि पर्यावरण धोरणांना दिशा देत आहे.





