१३ अब्ज प्रकाशवर्षे दूर चमकतोय फुटबॉलचा 'किंग'; जाणून घ्या अवकाशातल्या CR7 ची थरारक गोष्ट!
हे अंतर इतकं अफाट आहे की तिथे पोहोचण्याची कल्पना करणंही आपल्या मेंदूच्या पलीकडे आहे. एका बाजूला पृथ्वीवरच्या एका स्टेडियममध्ये हिरवळीवर फुटबॉलला खेळणारा एक खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला विश्वाच्या टोकावर धगधगणारी एक आकाशगंगा.या दोन टोकाच्या गोष्टींचा काय संबंध असू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.
२०१५ मध्ये खगोलशास्त्रज्ञांना अवकाशाच्या अथांग गर्तेत एक कमालीची तेजस्वी आकाशगंगा सापडली. या आकाशगंगेचं नाव आहे 'Cosmic Redshift 7'. पण शास्त्रज्ञांनी तिचं लाडकं नाव ठेवलं 'CR7'. येस्स, तुम्ही ओळखलंत ते अगदी बरोबर आहे! पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या सन्मानार्थ या गॅलेक्सीला हे नाव देण्यात आलं आहे.
ही आकाशगंगा साधीसुधी नाही. ती विश्वाच्या सुरुवातीच्या काळातली,म्हणजे जेव्हा हे ब्रह्मांड अगदी बाळसं धरत होतं, तेव्हाची आहे. नुकत्याच समोर आलेल्या जेम्स वेब टेलिस्कोपच्या (JWST) अहवालानुसार, या CR7 गॅलेक्सीमध्ये विश्वातले सर्वात पहिले तारे दडलेले असू शकतात. हे तारे म्हणजे जणू देवाने विश्वात लावलेले पहिले दिवेच!
जसा मैदानात रोनाल्डो आपल्या वेगाने प्रतिस्पर्ध्यांना चकवतो, तशीच ही गॅलेक्सी आजही शास्त्रज्ञांना चकवतेय. तिची प्रचंड चमक ही केवळ ताऱ्यांमुळे आहे की तिच्या केंद्रस्थानी एखादं महाकाय 'ब्लॅक होल' बसलंय, यावर संशोधकांमध्ये आजही मोठी खडाजंगी सुरू आहे.
ही गॅलेक्सी आपल्या आकाशगंगेपेक्षा (Milky Way) कित्येक पटीने जास्त प्रकाश उत्सर्जित करते. २०२६ च्या ताज्या संशोधनानुसार, या गॅलेक्सीमधील वायूंचे ढग आणि तिथली ताऱ्यांची निर्मिती पाहता, ती विश्वाच्या इतिहासातील सर्वात 'स्टायलिश' आणि शक्तिशाली गॅलेक्सी मानली जात आहे.जेव्हा आपण या गॅलेक्सीला पाहतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात १३ अब्ज वर्षांपूर्वीचा भूतकाळ पाहत असतो. म्हणजे जेव्हा पृथ्वी अस्तित्वातही नव्हती, तेव्हाचा हा प्रकाश आज आपल्यापर्यंत पोहोचला आहे.
मैदानातला रोनाल्डो कधीतरी निवृत्त होईल, त्याचे विक्रम कदाचित भविष्यात कोणीतरी मोडेलही. पण अवकाशाच्या या टोकावर रोनाल्डोच्या नावाने चमकणारा हा 'CR7' मात्र अनंत काळासाठी विश्वाचा राजा म्हणून असाच तळपत राहणार आहे. माणसाचं नाव ताऱ्यांवर कोरणं काय असतं, याचं हे सर्वात तेजस्वी उदाहरण आहे.




